प्रतिनिधी | संगमनेर27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेसचा विचार शाश्वत आहे. जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्ती करा. आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला अनुकूल वातावरण असल्याने तरुणांना सक्रिय करत संघटन वाढवा. असे आवाहन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना अतिथी गृहावर शनिवारी जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत आमदार थोरात बोलत होते.
आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, मधुकर नवले, उत्कर्षा रुपवते, डॉ. एकनाथ गोंदकर, युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे, ज्ञानदेव वाफरे, मिलिंद कानवडे, दादा वाकचौरे, आकाश नागरे, सोमेश्वर दिवटे उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, जिल्ह्यात बाजार समितीमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळाले. आगामी सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढवायच्या असल्याने कार्यकर्त्यांना मोठी संधी आहे. भाजपने केलेल्या चुकांमुळे जनतेत नाराजी आहे. ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा. जिल्ह्यात कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यांना सक्रिय करा. मंडल पातळीवर विविध सेलच्या नियुक्ती करून नवीन चेहऱ्यांना संधी द्या. त्यांना जबाबदाऱ्या द्या. समाज माध्यमातून काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवा. माणसे जोडण्याचा काँग्रेसचा विचार आपले भांडवल असल्याने एकजुटीने काम करा. कर्नाटकच्या निकालाने काँग्रेसच्या विजयाची सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. आमदार कानडे म्हणाले, देशात महागाई, भ्रष्टाचार वाढला आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. भाजप जनतेच्या भावनेशी खेळत असल्याने राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील, यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहा, असे आवाहन त्यांनी केले. नागवडे म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष जिल्ह्यात अधिक भक्कम होईल, यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक सक्रियतीने काम करावे. यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, उत्कर्षा रुपवते, मधुकर नवले, स्मितल वाबळे, ज्ञानदेव वाफारे यांची भाषणे झाली.
समाज माध्यमांचा प्रभावी वापर करा
२०१४ मध्ये भाजपने समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत सत्ता मिळवली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकशाही व देश विकासाचा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी समाज माध्यम सर्व प्लॅटफॉर्मचा अधिकाधिक वापर करावा, अशा सूचना आमदार बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.