नाशिक29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत काॅंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार डाॅ. सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ए.बी.फाॅर्म दिलेला असतानाही त्यांनी ऐनवेळी स्वत:चा अर्ज न भरल्याने पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणात न राहिल्याने पक्षाची माेठी नामुष्की झाली. त्यानंतर केंद्रीय काॅंग्रेस समितीने निलंबीत केले. या कारवाईनंतर आमदार डाॅ. सुधीर तांबे यांची पहिली प्रतिक्रीया समोर आली आहे. माझ्यावर पक्षाकडून अन्याय झाल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.
पक्षाकडून अन्याय; न्यायावर विश्वास – सुधीर तांबे
काॅंग्रेस पक्षाने केलेली निलंबनाची कारवाई ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. पक्षाच्या केंद्रीय शिस्तपालन समितीच्या चाैकशीअंती सत्य समाेर येईल, न्यायावर माझा पुर्ण विश्वास आहे. केंद्रीय समितीने आपल्याला चाैकशीला बाेलावल्यास त्याठिकाणी हजर राहून आपली भूमिका मांडणार आहे.
अधिकृत भूमिका मांडणार
तूर्ततरी या विषयावर आपली एवढीच प्रतिक्रीया असली तरी दाेन दिवस थांबून पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत अर्ज माघारीनंतर नेमके काेण काेण रिंगणात राहते, त्यानंतर आपली अधिकृत भूमिका देखील मांडणार आहे. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीसाठी त्यांना भाजपाने पाठींबा द्यावा, यासाठी आपण भाजपा पक्षश्रेष्ठींकडे कुठेही मागणी केलेली नाही, तसेच काॅंग्रेसला साेडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील अफवाच आहेत.
चौकशी होईपर्यंत निलंबन
केंद्रीय काॅंग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने डाॅ. तांबे यांच्यावर पक्षाशी प्रतारणा केल्याचा ठपका ठेवत त्यांची चाैकशी हाेईपर्यंत पक्षातून निलंबीत करण्यात येत असल्याचे प्रसिद्ध पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. यांसदर्भात, पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नाना पटाेले यांच्या संमतीनुसार, केंद्रीय शिस्तपालन समितीचे सदस्य तथा महासचिव तारीक अन्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आमदार डाॅ. तांबे यांची पुढील चाैकशी पुर्ण हाेईपर्यंत निलंबन करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
काॅंग्रेसचा सलग तीनदा विजय
नाशिक पदवीधर मतदारसंघ हा डाॅ. तांबे यांच्या रूपाने काॅंग्रेसने भाजपकडून तब्बल 30 वर्षांचा असलेला बालेकिल्ला निस्ताभूत करून सलग तीन वेळेपासून काॅंग्रेसचे वर्चस्व हाेते. मात्र, ऐनवेळी डाॅ. तांबे यांनी उमेदवारी न करता सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने पक्षाचा जिव्हारी लागले आहे.