पंजाब किंग्सने थाटात विजय मिळवत गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला

पंजाब किंग्स्ने थाटात विजय मिळवत गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला
पंजाब किंग्स्ने थाटात विजय मिळवत गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखला

नवी मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ४८ व्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सला आठ विकेट्सनं पराभूत केलं आहे. गुजरातने ठेवलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीला आलेला जॉनी बेअरस्टो १ धावेवर बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बाद केले. मात्र त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि भानुका राजपक्षेने दमदार फलंदाजी करण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली. दरम्यान, शिखर धवनने आपले अर्धशतकही पूर्ण केले. मात्र लॉकी फर्ग्युसनने राजपक्षेला ४० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या लिव्हिंस्टोनने षटकार आणि चौकारांची बरसात करत झपाट्याने धावा करण्यास सुरूवात केली. त्याने १० चेंडूत ३२ धावा ठोकत सामना १६ व्या षटकातच जिंकून दिला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजराची सुरुवात खराब झाली. गुजरातचे दोन्ही सलामीवीर ३४ धावांवर माघारी गेले. शुभमन गिल ९ धावांवर धावबाद झाला. तर २१ धावा करणाऱ्या वृद्धीमान साहाला रबाडाने बाद केले. दरम्यान, कर्णधार हार्दिक पांड्या डाव सावरण्यासाठी मैदानावर आला. मात्र त्याला ऋषी धवनने अवघ्या १ धावेवर बाद करत गुजरातला मोठा धक्का दिला.

यानंतर आलेल्या डेव्हिड मिलर आणि साई सुदर्शन यांनी भागीदारी रचत डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र लिव्हिंगस्टोनने मिलरला ११ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. ठराविक अंतराने विकेट पडत असल्याने गुजरातची धावगती मंदावली. दरम्यान, रबाडाने पुन्हा एकदा गुजरातला धक्के देण्यास सुरूवात केली. कसिगो रबाडाने १७ व्या षटकात राहुल तेवतिया (११) आणि राशिद खानला (०) बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याला सामनावीराचा पुरस्कारप्रदान करण्यात आला.

Advertisement

त्यानंतर प्रदीप सांगवान २ तर लोकी फर्ग्युसन ५ धावांची भर घालून माघारी परतला. दरम्यान, एका बाजूने झुंजार फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५० चेंडूत केलेल्या ६५ धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात ८ बाद १४३ धावा केल्या. पंजाबकडून कसिगो रबाडाने ३३ धावात ४ विकेट घेतल्या. तर धवन, अर्शदीप, लिव्हिंगस्टोनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

Advertisement