औरंगाबाद6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्ये सुरू असणाऱ्या ऑनलाईन जुगाराची माहिती मिळाल्याने ग्रामसेवक एस.एन. रोहकले यांनीसुद्धा तातडीने दोन्ही गाळ्यांना टाळे ठोकत गाळे ‘सील’ केले. पुर्वी चोरून-लपून सुरू असणारे अवैध धंदे आता उघड्यावर, मुख्य मार्गावर आणि थेट ग्रामपंचायत प्रशासनाच्या गाळ्यातून सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
अवैध धंद्यातील वर्चस्ववादातून रांजणगावातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात 13 जानेवारीला जुगार खेळण्यावरून दोन गट आपसांत भिडल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातूनच एकाच्या डोक्यात तलवारीचा वार करून एकजण गंभीर जखमी झाला. या प्रकरणी दहा जणांविरोधात वरीष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यातील गाळा क्र.9 हा 11 ऑक्टोबर 2018 मध्ये तर, गाळा क्रमांक – 4 हा 21 डिसेंबर 2022 मध्ये दर महा 1500 रूपये प्रमाणे भाडे तत्वावर देण्यात आला. त्यासाठी अनामत रक्कम म्हणून 50 हजार रूपये घेण्यात आले असल्याची माहिती ग्रामसेवक रोहकले यांनी दिली. दरम्यान 94 हजार रूपये भाडे थकल्याने गाळा क्रमांक 9 तर गाळा क्रमांक 4 मध्ये ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाल्याने दोन्ही गाळे नुकतेच 9 जानेवारी रोजी सील करण्यात आले.
धक्कादायक माहिती अशी की, 10 बाय 12 फुट साईज असणाऱ्या दत्तनगर फाटा येथील मुख्य मार्गावर ग्रामपंचायतच्या 19 गाळ्यांपैकी खरेदे केलेल्या गाळ्यांचे मालक त्यांचे गाळे महिना 3 ते 5 हजार रूपये भाडेतत्वावर देतात. तिथे नाममात्र दरामध्ये ग्रामपंचायत गाळा कसा काय उपलब्ध करून देते, त्यात अवैध धंदा चालतो आणि हे दोन्ही गाळे मालक कोणत्या व्यावसायाकरिता गाळा ताब्यात घेणार आहेत, त्यासाठी लागणारी एनओसी याबाबत ग्रामपंचायतकडे कुठलिही माहिती नसल्याचे ग्रामसेवक रोहकले सांगतात.
ज्या – ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू होते त्या परिसरातील इतर व्यावसायीक व रहिवासी नागरिकांना गुंड प्रवृत्तीच्या नागरिकांचा त्रास होतो. शिवाय ग्रामपंचायतचे गाळे एखाद्या गरजू, होतकरू व्यक्तीला नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून न देता, अवैध जुगारासाठी सहज उपलब्ध करून दिले. त्यामुळे ग्राहकांवर परिणाम झाला. पण सांगता कोणाला ? गुंडांच्या नादी कोणा लागणार? शिवाय यातील काहींचे थेट राजकीय लोकांशी लागेबांधे असल्याने पोलिसांचेही त्यांच्याकडे येणे – जाणे सुरू असते त्यामुळेच सर्व व्यापारी व नागरिक काही एक न बोलता किंवा तक्रार करता मुकाट्याने सहन करतात अशी माहिती येथील व्यापारी नागरिकांनी दिली.