न्यायालयीन लढाई जोकोव्हिच जिंकला!न्यायालयाकडून व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे; ऑस्ट्रेलियन सरकारचा पुन्हा इशारा

Advertisement

एपी, मेलबर्न

टेनिस कोर्टावर एरव्ही हुकमत गाजवणारा सर्बियन खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचने सोमवारी ऑस्ट्रेलियन न्यायालयात विजयाची नोंद केली. वैद्यकीय सवलत हा आधार घेऊन लसीकरणाविना मागील बुधवारी मेलबर्न येथे दाखल झालेल्या जोकोव्हिचचा व्हिसा ऑस्ट्रेलियन सरकारने रद्द केला होता. मात्र, सोमवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीचा निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला; परंतु त्याचा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झालेला नसून ऑस्ट्रेलियन सरकारने दुसऱ्यांदा त्याचा व्हिसा रद्द करण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement

जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियातून परत पाठवणीच्या खटल्याप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. न्यायाधीश अँथनी केली यांनी ऑस्ट्रेलियन सरकारचा जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय मागे घेतानाच त्याला मेलबर्न येथील अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमधून अर्ध्या तासात सोडण्याचे आदेश दिले. तसेच व्हिसा रद्द करण्यापूर्वी त्याला वकिलांशी बोलण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याची टिप्पणीही न्यायाधीशांनी केली. ऑस्ट्रेलियातील दोन वैद्यकीय मंडळ आणि ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ संघटनेने जोकोव्हिचला लसीकरणात वैद्यकीय सवलत दिली होती. याचे पुरावे त्याने मेलबर्न विमानतळावरील अधिकाऱ्यांना दिले. त्याने आणखी काय करणे अपेक्षित होते? असा प्रश्नही न्यायाधीशांनी उपस्थित केला.

आता निकाल जोकोव्हिचच्या बाजूने लागला असला, तरी परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांना (इमिग्रेशन मिनिस्टर) त्याचा व्हिसा पुन्हा रद्द करण्याचा अधिकार आहे. ते याबाबत विचार करतील, असे सरकारी वकील ख्रिस्तोफर ट्रान यांनी न्यायाधीश केली यांना सांगितले. परकी नागरिकविषयक खात्याच्या मंत्र्यांनी त्यांचा अधिकार वापरल्यास जोकोव्हिचचा व्हिसा पुन्हा रद्द होईल आणि त्याला मायदेशी पाठवले जाऊ शकेल.

Advertisement

जोकोव्हिचने स्पर्धेत खेळावे – नदाल

न्यायालयाने निकाल सांगितल्यानंतर या प्रकरणाबाबत अधिक चर्चा करणे योग्य नसून जोकोव्हिचला १७ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली पाहिजे, असे स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालला वाटते. ‘‘जोकोव्हिचने केलेल्या कृतीशी मी सहमत आहे की नाही, यापेक्षा न्यायालयाने निकाल दिला, हे जास्त महत्त्वाचे आहे. त्याला ऑस्ट्रेलियन स्पर्धेत खेळण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे,’’ असे नदाल म्हणाला.

Advertisement

The post न्यायालयीन लढाई जोकोव्हिच जिंकला! appeared first on Loksatta.Source link

Advertisement