आयपीएलच्या १५व्या हंगामातील ३४व्या लढतीत राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत याने केलेल्या वर्तवणूकीची शिक्षा त्याला मिळाली आहे. पंतने आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन केले असून त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्या मॅच फीच्या १०० टक्के इतका दंड करण्यात आलाय. पंत सोबत दिल्लीचे फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यावर एक सामन्याची बंदी घातली आहे.
शुक्रवारी आयपीएल २०२२ मध्ये राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. या लढती अखेरच्या षटकात एका नो बॉलवरून पंतने फलंदाजांना मैदानातून बाहेर बोलवले. तर फलंदाजीचे प्रशिक्षक प्रविण आमरे यांनी थेट मैदानात येत अंपायर्सशी वाद घातला होता. या प्रकरणी दोघांवर आता कारवाई करण्यात आली आहे. पंतने त्याची चूक मान्य केली आहे. त्याचा गुन्हा लेव्हल दोनचा असून कलम २.७ नुसार दोषी ठरवण्यात आले आहे. पंतला मॅच फीच्या १०० टक्के दंड केला. त्याच्या सोबत शार्दुल ठाकूरवर देखील कारवाई करण्यात आलीय. ठाकूरवर ५० टक्के दंड केलाय.
प्रवीण आमरेंना दणका
दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाजीचे प्रशिक्षक प्रवीण आमरे यांनी काल थेट मैदानात प्रवेश केला आणि अंपायर सोबत वाद घातला. आमरेंवर देखील मॅच फीच्या १०० टक्के इतका दंड करण्यात आलाय. त्याच सोबत एका सामन्याची बंदी देखील घातली आहे. त्यांना कलम २ आणि २.२ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले असून, आमरेंनी हे आरोप स्विकारले देखील आहेत.
काय झाले होते
विजयासाठी ६ चेंडूत ३६ धावांची गरज असताना रोवमॅन पॉवेलने पहिल्या ३ चेंडूवर षटकार मारले. पण तिसरा चेंडू टाकल्यानंतर वादाला सुरूवात झाली. ओबेद मॅककॉयने टाकलेला फुलटॉस चेंडू नो बॉल देण्याची मागणी दिल्लीने केली. ही मागणी मैदानावरील अंपायर्सने फेटाळून लावली. दिल्लीने तिसऱ्या पंचाकडून चेक करण्याची मागणी केली पण मैदानावरील अंपायर्सनी ती मान्य केली नाही. त्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने दोन्ही फलंदाजांना पॉवेल आणि कुलदीप यादव यांना मैदानातून बाहेर येण्याचा इशारा केला. पंतने केलेल्या इशाऱ्यानंतर संघातील अन्य सदस्यांनी फलंदाजांना बाहेर येण्यापासून रोखले. पण प्रकरण तेवढ्यात शांत झाले नाही. संघाचे फलंदाजीचे कोच प्रवीण आमरे मैदानात घुसले आणि अंपायर्सशी वाद घालू लागले. इतक सर्व झाल्यानंतर देखील दिल्लीची मागणी मान्य झाली नाही. अखेर प्रवीण आमरे मैदानाबाहेर गेल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला.