अमरावती3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
नोकरीचे कायमीकरण आणि मानधनवाढीबाबत शासनाने दिलेल्या आश्वासनानुरुप अद्याप बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे शासनाला आठवण करुन देण्याच्या उद्देशाने आज, बुधवारी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयासमोर कंत्राटी एएनएम व जीएनएम यांनी धरणे दिले.
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) बॅनरखाली पार पडलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व आयटकचे प्रदेश अध्यक्ष दिलीप उटाणे यांनी केले. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा सचिवांना निवेदन पाठविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २० जून २०२२ रोजी दिलेले आदेश आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या दालनात २० मार्च २०२३ रोजी झालेल्या बैठकीदरम्यान येत्या दोन महिन्यात एएनएम व जीएनएमच्या कायमीकरणाचा प्रश्न निकाली निघणार होता.
परंतु आरोग्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला दोन महिन्याचा कालखंड लोटल्यानंतरही अद्याप एकही बैठक राज्य शासनाने घेतली नाही. त्यामुळे आरोग्यसेविका, अधिपरिचारिका व एनएचएमच्या इतर कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, बुधवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलनादरम्यान राज्य शासन व जिल्हा परिषद प्रशासनाच्याविरोधात प्रचंड घोषणाबाजी व निदर्शनेही करण्यात आली.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोनाली खांडेकर, कोषाध्यक्ष प्रिती पवार, जिल्हा संघटक कल्पना खिल्लारे, सहसचिव प्रिती इंगळे, इतर पदाधिकारी दीपिका तट्टे, सुनीता करुले, राधिका पखाले, रिना आठवले, आरती बागडे, जया पारवे, जयश्री जाधव, अश्वीनी वानखडे, संगीता गवई, रंजना खोब्रागडे, अरुणा भोयर, वंदना वानखडे, किरण पोरे, सपना इंगळे, जयश्री जामुनकर, निलीमा रंगारी आदी पदाधिकारी-कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.