पुणे39 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
आम्ही निवडणूक आयोगाला पक्षात फूट पडली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, आयोगाने आमची बाजू न ऐकता फूट पडल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक आयोग अयोग्य वागत आहे, असा याचा अर्थ निघतो. याबाबत आम्ही मात्र, वकिलांचा सल्ला घेत असून, निवडणूक आयोगासमोर बाजू मांडणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या बैठकीनंतर जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे निश्चित केले आहे. खरा पक्ष कोणाचा याचा निर्णय सहा ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी हा शरद पवार की अजित पवार यांचा, हे सहा ऑक्टोबरला कळेल. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या बैठकीला उपस्थित नव्हते. याबाबत विचारले असता अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. कदाचित त्यांना दुसरी कामे असतील. त्यामुळे येणे शक्य झाले नसेल, असे उत्तर त्यांनी दिले.
कंत्राटी कर्मचाऱयांच्या नियुक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत बोलताना पाटील म्हणाले, सरकारी कर्मचाऱयांवर महत्त्वाच्या जबाबदाऱया असतात. तिथे कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणे चुकीचे आहे. जबाबदारीची पदेही कंत्राटी पद्धतीने भरणे, हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. पैसे वाचवण्यासाठी बेभरवशाच्या लोकांना तात्पुरत्या सेवेत घेऊन काही कामे करून घेतली आणि त्यात चुका आढळल्या, तर त्याचा भुर्दंड जनतेला बसू शकतो. कंत्राटी कर्मचारी नियुक्तीला काही मर्यादा असल्या पाहिजेत. नाहीतर हळूहळू सर्व सरकार कंत्राटी पद्धतीने चालायला लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.