पुणे4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यामुळे पुण्यातील काँग्रेस भवन येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शिवाजीनगर गावठांण येथील हनुमान मंदिरात काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते यांनी हनुमानाची आरती केली आणि त्यानंतर ढोल ताश्याच्या गजरात कार्यकर्ते उत्साहाने नाचले व लाडू वाटून आनांदोत्सव साजरा केला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कर्नाटकाची निवडणुक जिकंण्यासाठी साम, दाम, दंड, भेद चा वापर केला. आपल्या सरकारचे भ्रष्टाचार झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जवळ जवळ 40सभा घेतल्या. धर्माचा वापर करून मत मिळविण्याचा प्रयत्न केला परंतु कर्नाटकातील जनतेने त्यांना नाकारले. काँग्रेस पक्षाने महागाई, बेरोजगारी या विषयावर प्रचार केला.
कर्नाटकातील भाजप सरकार 40% कमिशन खाणारे सरकार म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने हा कौल काँग्रेस पक्षाच्या बाजूने दिला. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियंका गांधी आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्व नेते व कार्यकर्त्यांनी शिस्तबध्द प्रचार करून काँग्रेस पक्षाला यश मिळवून दिले.
या निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशामुळे 2024 ला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे असे दिसते. शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी पक्ष संघटना मजबुत करून कार्यकर्त्यांना ताकद दिली. भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेच्या तोडीला आपल्याही पक्षाची यंत्रणा सज्ज केली. राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा आणि प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे काँग्रेस पक्षाला यश मिळाले. नियोजनबध्द प्रचारामुळे आणि सामान्य जनतेचा प्रश्न काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यामध्ये आणि प्रचारामध्ये मांडल्यामुळे कर्नाटकातील जनतेने काँग्रेस पक्षावर विश्वास टाकला आणि भरघोस मतांनी काँग्रेस पक्षाला निवडून दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार रविंद्र धंगेकर, रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड, दिप्ती चवधरी, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, संगीता तिवारी, अजित दरेकर, रफिक शेख, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, रजनी त्रिभुवन, सुनिल शिंदे, साहिल केदारी, मेहबुब नदाफ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.