नीलेश अमृतकर | नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री संजय राठोड यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राज्यभरातील औषधविक्रेत्यांवरील सुनावणी प्रकरणात माेठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा जाहीर आरोप केमिस्ट असोसिएशनने करीत आंदोलनाची भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व जिल्ह्यातील प्रकरणांबाबत माहिती घेतली असता वर्षभरात केवळ १७५ विक्रेत्यांवरच कारवाई झाली असून १३५ प्रकरणांमध्ये निलंबन रखडले आहे. तर ४२ परवाने रद्द करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ६५०० परवानाधारक औषधे किरकोळ व घाऊक विक्रेत्यांची नोंदणी असताना त्यांच्या तपासणीसाठी फक्त ५ अधिकारी कार्यरत आहे. अन्न व औषध, सौंदर्यप्रसाधन कायदा १९४० अन्वये औषधे विक्री करणाऱ्यांना अनेक नियम व अटी-शर्तींचे पालन करणे सक्तीचे आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यापाठाेपाठ सर्वाधिक ६५०० नोंदणीकृत व्यावसायिक नाशिक जिल्ह्यात आहेत. मात्र, तपासणीसाठी प्रत्येक तालुक्याला किमान एक निरीक्षक व एक सहायक निरीक्षक आणि सहायक आयुक्तांची तीन पदे मंजूर असताना केवळ दाेनच सहायक आयुक्त आणि पाच जिल्ह्यांसाठी सहआयुक्तपद मंजूर असताना ते देखील चार वर्षांपासून रिक्त आहे. एका निरीक्षकांकडे चार-चार तालुक्यांचा कार्यभार आहे.
वर्षभरात ४५ विक्रेत्यांचे परवाने रद्द
जिल्ह्यातील सुमारे १०६५ औषधे विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ४५ विक्रेत्यांचे औषधे विक्री परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहेत. त्यासह विवीध कारवाया नियमीत करण्यात येत आहे. – मुकुंद डाेंगळीकर, सहायक आयुक्त एफडीए
परराज्यातील उत्पादकांविराेधात गुन्हे
विनापरवानगी व आक्षेपार्ह जाहिराती करून आजारांवर उपायाचे दावे करणाऱ्या दाेघा विक्रेत्यांसह औषधे पुरविणाऱ्या उत्पदांकांविराेधात गुन्हा दाखल आहे. एक गुन्हा केरळ राज्यातील तर दुसरा गुजरामधील कंपनीविराेधात जादुटाेणा औषधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. सहायक आयुक्त प्र. दी. हरक, दीपक मालपुरे, महेश देशपांडे, प्रशांत ब्राह्मणकर, चंद्रकांत माेरे, सुजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.
केमिस्टच्या अनुपस्थितीत विक्री
परवानाधारक फार्मासिस्टद्वारेच औषधे विक्री करणे बंधनकारक असताना निरीक्षकांच्या तपासणीत बहूतांशी ठिकाणी कुटूंबातील व्यक्ती, कामगारच आढळून आले. केमिस्टच्या अनुपस्थितीत नोंदणीकृत फार्मासिस्ट असावा, रेफ्रिजरेटर महत्त्वाचा आहे. एच १ ची औषधे ही प्रिस्क्रिप्शनशिवाय फार्मासिस्टने देऊच नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे दिली पाहिजे, मात्र प्रत्यक्षात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे दिली जात असल्याचे आणि प्रत्येक औषधे, गोळ्यांची बिले देणे सक्तीचे असूनही त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे.
आक्षेपार्ह जाहिरातप्रकरणी कारवाई
रक्तदाब, मधूमेह झटपट नियंत्रणात आणा, हदयविकाराचा झटका आलेल्यांना रामबाण उपाय अशा जाहिराती करून ग्राहकांना आमिष दाखविणाऱ्या चार विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये गंगापूराेड, रविवार कारंजा येथील किराणा दुकानदारावर गुन्हे दाखल करीत दाेन लाखांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे.