नाशकात बाजार समित्या बेमुदत बंद: 40% शुल्क लादल्याने निर्यात होणारा कांदा परतीच्या मार्गावर; लिलाव बंद, कृषिमंत्री मुंडे आज केंद्रीय मंत्र्यांना भेटणार

नाशकात बाजार समित्या बेमुदत बंद: 40% शुल्क लादल्याने निर्यात होणारा कांदा परतीच्या मार्गावर; लिलाव बंद, कृषिमंत्री मुंडे आज केंद्रीय मंत्र्यांना भेटणार


प्रतिनिधी | नाशिक23 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

विंचूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाशिक-संभाजीनगर महामार्गावर आंदोलन.

केंद्र सरकारने दर नियंत्रणासाठी कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लादताच सोमवारी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कांदा दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी घसरण झाली. दर २००० ते २६०० रुपयांदरम्यान होते. नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी बाजार समित्यांत बेमुदत बंद पुकारला आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांचा माल आधीच दाखल होता त्यांचे नुकसान टाळण्यासाठी सहा बाजार समित्यांनी लिलाव करून नंतर ते बंद केले. निर्यात शुल्काच्या निर्णयामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी केंद्राच्या निर्णयाचा निषेध नोंदवत अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनातून संताप व्यक्त केला. दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे निर्यातशुल्काच्या मुद्द्यावर मंगळवारी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची दिल्लीत भेट घेणार आहेत.

Advertisement

लासलगावमधून रोज ४० ते ५० कंटेनर कांदा निर्यातीसाठी मुंबईकडे जातो. परंतु, निर्यातशुल्क लादल्याने नुकसान होणार असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे परदेशातील सौदे तुटले आहेत. विंचूर उपबाजारात शिवगणेशा ओनियन एक्स्पोर्टचे सत्यम गोराणे व गणेश गांगुर्डे यांनी ३० टन कांदा दुबईला पाठविण्यासाठी कंटेनरमध्ये भरला होता. २७ रुपये किलोने सौदा केलेला अंदाजे १० लाख रुपयांचा कांदा यात होता. परंंतु, सोमवारी भाव २१ रुपयांवर आल्याने तसेच निर्यातशुल्कही लागणार असल्याने पुढील नुकसान पाहता त्यांनी कंटनेरमधील कांदा खाली उतरवला व देशांतर्गत तो कमी भावाने विक्रीचा निर्णय घेतला. अशीच परिस्थिती अनेक व्यापाऱ्यांची आहे.

Advertisement

इकडे, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील कांदा दरावरही परिणाम झाला आहे. बंगळुरुत दर एक हजार ते १५०० रुपयांनी घसरले. शनिवारी निर्यातीच्या वाटेवर असलेला निम्मा कांदा हा केंद्राच्या निर्णयामुळे माघारी येणार आहे, तर काही निर्यातदारांनी नफा नाही झाला तरी चालेल, मात्र पाकिस्तानच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी निर्यातीचा निर्णय घेतला.

एकट्या लासलगावी पाच कोटींची उलाढाल ठप्प देशात कांद्याची सर्वाधिक उलाढाल होणाऱ्या लासलगाव बाजार समितीत लिलाव न झाल्याने सोमवारी पाच कोटी तर विंचूर व निफाडला पाच कोटींची उलाढाल ठप्प झाली.

Advertisement

ज्यांना महाग वाटत असेल त्यांनी कांदा २-४ महिने खाल्ला नाही तर काय बिघडते? : पालकमंत्री दादा भुसे

कांदा २० ते २५ रुपये किलाे झाला तर काय फरक पडतो? तरीही ज्याला तो महाग वाटत असेल त्याने २-४ महिने खाल्ला नाही तर काय बिघडतं, असा अजब सवाल पालकमंत्री दादा भुसे यांनी माध्यमांशी बोलताना केला. चांगला भाव मिळाला तर कुठेही अडचणी येत नाहीत, असेही ते म्हणाले.

Advertisement



Source link

Advertisement