मनोज व्हटकर | सोलापूर2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
‘येत्या २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस जिंकली नाही तर आपण सगळेच संपलो,’ या शब्दांत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी गटबाजी करू नका, पक्षात खुर्चीला सलाम करून काम करा, असा निर्वाणीचा इशारा दिला. सर्वच कार्यकर्त्यांना उद्देशून आपण बोलत आहोत, असा नानांचा आविर्भाव असला तरी त्यांच्या निशाण्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण तसेच विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात असल्याचे म्हटले जात आहे. साेलापूर शहर काँग्रेस काँग्रेसतर्फे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात पटोलेंनी सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थाेरात यांच्या दिशेने गटबाजीवर टीकास्त्र सोडले. मविआ स्थापनेपासून पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि पटोलेंमध्ये सख्य नाही. उद्धव ठाकरेंच्या राजीनामा प्रकरणात ते अधिक उघड झाले. सत्यजित तांबेंच्या निवडणुकीत पटोले आणि थोरात यांच्यात चकमकी झडल्या होत्या. मात्र, सर्वजण एकाच मंचावर येत नसल्याने पटोलेंना एकत्रित हल्ल्याची संधी मिळत नव्हती. ती त्यांनी सोलापुरात साधल्याचे दिसते.
राष्ट्रवादीकडून कोंडी गेल्या काही दिवसांत काँग्रेसमधील गटबाजी, हेवेदावे खूप वाढले आहेत. राष्ट्रवादीकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व परिस्थितीला वैतागूनच पटोलेंनी निर्वाणीचा इशारा दिल्याचेही काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
आता काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याने सिस्टिममध्ये काम केले पाहिजे.पक्षशिस्तीत राहून पक्षसंघटनेत काम करावेच लागेल, असे म्हणताना पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, थोरात हेच नानांच्या डोळ्यासमोर होते, असे राजकीय निरीक्षकांचे निरीक्षण आहे. मेळाव्यात नाना आणि पृथ्वीराज चव्हाण ऊर्फ बाबा एकमेकांजवळ बसले होते. पण दोघांमधील अंतर वारंवार स्पष्ट जाणवत होते.