नागपूर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राप्त नामनिर्देशनपत्रांची शुक्रवारी छाननी करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र दाखल करणारे सर्वच 27 उमेदवार निवडणुकीस वैध ठरले आहेत. येत्या 16 जानेवारीला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे तर 30 जानेवारीला मतदान होणार आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या 27 उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची आज विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी आणि निवडणूक निरीक्षक अरुण उन्हाळे यांच्या उपस्थितीत छाननी करण्यात आली. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 रोजी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमधून शिक्षक मतदारसंघासाठी 5 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान एकूण 27 उमेदवारांनी 43 नामनिर्देशपत्र दाखल केले होते.
गडचिरोलीत सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान
भारत निवडणूक आयोगाच्या 11 जानेवारी 2023 च्या अधिसुचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्यावेळेत बदल करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यात 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त (सामान्य) प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरम्यान, उमेदवारांना 16 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात 30 जानेवारीला सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.