- Marathi News
- Local
- Maharashtra
- Nagpur
- Fake Facebook Account In The Name Of Nagpur Police Commissioner Amitesh Kumar, Accused Arrested From Rajasthan, 4 Mobile Phones Seized From The Accused
नागपूरकाही सेकंदांपूर्वी
- कॉपी लिंक
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून त्यांच्या मित्राची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी राजस्थानातील अलवर येथून अटक केली आहे. या भामट्याने पोलिस आयुक्तांच्या काही मित्रांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. यापूर्वी, 2021 आणि या वर्षी जुलैमध्ये सायबर गुन्हेगारांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमारचे बनावट खाते तयार केल्या नंतर असाच प्रकार घडला होता. मात्र, त्या अकाऊंट तयार करणाऱ्यांपर्यत पोलिस पोहोचू शकले नव्हते.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार विनोद महोदेवराव कडू यांना आरोपीने अमितेश कुमार या नावाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली व फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरवरून चॅटींग केली. आपण अमितेश कुमार यांचा मित्र सीआरपीएफ ऑफिसर संतोष कुमार असल्याचे भासवून बदली झाल्याचे सांगितले. बदली झाल्यामुळे घरातील फ्रिज, वाॅशिंग मशीन, एसी इत्यादी विक्री करणे असल्याचे कळवून कमी किंमत सांगितली.
आराेपीने पाठविलेल्या बिलावर भारतीय राजमुद्रा असलेला लाेगाे, सीआरपीएफच्या लाेगाेचा वापर केला होता. कडू यांनी कमी किमतीत सामान विकत घेण्याकरीता 24 हजार रूपयांचा ऑनलाईन व्यवहार केला. परंतु कडू यांना साहित्य दिले नाही तसेच त्यांनी पाठविलेले पैसे सुध्दा परत दिले नाही. आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कडू यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ आराेपीचे बॅक खाते गोठवले. पोलिस पथकाने कौशल्याने तपास करुन अल्वर राजस्थान येथून आराेपी सुरेंद्र प्रितम सिंह, ताैफिक खान, फतेह नसिब खान, संपतराम श्रीबंसीलाल प्रजापत, यांना अटक केली आहे. आराेपींकडून चार माेबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या बॅक खात्याचा बेअरर चेक जप्त करण्यात आला आहे.