नागपूर34 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शहरात सध्या सी-२० ची तयारी सुरू असून सौंदर्यीकरणांतर्गत आकर्षक सजावट आणि रोषणाई केली आहे. याअंतर्गत मेट्रोने वर्धा रोडवर देशी-विदेशी झाडे लावलेली आहेत. १४ मार्च रोजी मध्यरात्री बीएमडब्ल्यूमधून आलेल्या दोघांनी या झाडांची चोरी केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत गुरुवारी रात्री या चोरट्यांना गाडीसह अटक केली. सध्या नागपुरात सी-२० बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उपराजधानीला नववधूप्रमाणे सजवले जात आहे. सुशोभीकरणाच्या कामांसोबतच विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे आणि रोपेही लावण्यात येत आहेत. महामेट्रो वर्धा मार्गावरील संपूर्ण सौंदर्यीकरण करीत आहेत. मेट्रोचे खांब आकर्षक चित्रांनी रंगवण्यात येत आहे. सोबतच देशी-विदेशी झाडे लावण्यात येत आहेत. परिषदेचे स्थळ असलेल्या वर्धा मार्गाचा कायापालट करण्यात आला आहे. रस्ते दुभाजकावर सुंदर झाडे लावण्यात आली आहेत. दरम्यान, असाच प्रकार औरंगाबाद येथेही घडला होता.
सीसीटीव्हीतून लागला शोध १४ मार्च रोजी बीएमडब्ल्यूमधून आलेल्या दोघांनी मध्यरात्री झाडांची चोरी केली. त्याचा व्हिडिओ १६ मार्च रोजी व्हायरल झाला. सीसीटीव्हीत कारचा क्रमांक स्पष्ट दिसत असल्याने पोलिसांनी क्रमाकांवरून आरटीओतून मालकाचा शोध घेतला. जय बजाज आणि जतीन नेव्हारेंना अटक केली.