मुंबई24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दावोसमधून काय येतय ते माहित नाही. पण तुमच्या नाकाखालून अनेक उद्योग गेले. त्यामुळे दावोसला जाण्याआधी गुजरातला जा. तुमच्या नाकाखालून गेलेले प्रकल्प परत आणा, असे खुले आव्हान शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, दावोसमध्ये काय होतं हे आम्हाला माहित आहे. वेदांत, फॉक्सकॉन, एअर बस, ड्रग्स पार्क हे प्रकल्प तुमच्या नाकासमोरून ते घेऊन गेले. ते परत आणा, तेव्हा मानू. तसेच कपिल सिब्बल यांचे वक्तव्य समोर आले आहे, त्यानुसार न्यायव्यवस्थेवरही हातोडा पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
प्रधानमंत्री पदाची प्रतिष्ठा असते
संजय राऊत म्हणाले, मुंबईतले बहुतेक सर्व प्रकल्प महाविकास आघाडीमुळे आले आहेत. आता पुन्हा त्याच प्रकल्पांचे उद्धाटन शिंदे-फडणवीस यांचे सरकार करत आहेत. त्यासाठी प्रधानमंत्र्यांना बोलावले आहे. प्रधानमंत्री पदाची एक प्रतिष्ठा असते. तुम्ही त्यांना आधीच झालेल्या प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी बोलावू शकत नाही. भाजपला त्यांच्या पदाची प्रतिष्ठा नसेल तर हे करा.
बदनामीच्या खोट्या मोहिमा
संजय राऊत म्हणाले, तुमच्या हातात सत्ता आहे. केंद्रिय तपास यंत्रणा आहे. त्यामुळे बदनामीच्या खोट्या मोहिमा राबवायच्या. ज्याप्रकारचा कलकलाट महाराष्ट्रात सुरु आहे आता त्यावरुन एकच सांगतो की, कोरोना काळात महाराष्ट्रात उत्तरप्रदेशसारखे प्रेत वाहिले नाही. ते फक्त उद्धव ठाकरेंच्या वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे. अन्यथा मिठी नदीत प्रेत दिसली असती.
कोरोनात अत्यंत पारदर्शक व्यवहार होते. डॉक्टर-नर्सेस पळून जात होते. त्यांच्याकडून आम्ही काम करुन घेतले. भाजपने उद्धव ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे की महाराष्ट्रात कोरोनामुळे कमी मृत्यू झाले.
ईडीला सांगितले आहे
ईक्बालसिंह चहल यांना ईडीसमोर हजर होण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचा एनआयटी घोटाळा आम्ही बाहेर काढला. इतर अनेक नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. त्यावेळी ईडीला देखील याबाबत सांगितले आहे. या घोटाळ्यातील दोषींना कधी नोटीसा जातात, हे आम्ही पाहू. गोड बोलण्यासाठी स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये जावे लागत नाही, असा टोला संजय राऊत यांनी यावेळी कृपाशंकर सिंह यांना लगावला.