नागपूरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
भाजपने आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या उद्देशाने जोरदार तयारी सुरू केली आहे, तर मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली. विरोधकांनी देशात भाजपविरोधात रान उठविण्यास सुरुवात केली असतानाच आता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दावा केला.
देशातील नरेंद्र मोदी नावाचा प्रभाव आता कमी झाला आहे. पुन्हा एकदा देशात काँग्रेसची लहर तयार होत आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या माध्यमातून ही बाब पुढे येईलच, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी नागपूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवरही टीकेची झोड उठवली. फडणवीसांनी स्वाभीमान जागा ठेवू राज्यासाठी काम करावं. त्यांनी दिल्लीचे बाहुले बनू नये, असा माझा त्यांना सल्ला राहील.
फडणवीसांच्या आलिशान जॅकेट घालून बाता
पटोले म्हणाले, महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरीरावर आलिशान जॅकेट घालून सांगत फिरतात. पण वास्तविकतेत अलीकडेच आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्रात उद्योगांचा मोठा ऱ्हास झाल्याची बाब पुढे आली आहे. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र आणि देश पिछाडीवर गेला असल्याची टीका त्यांनी केली.
भूपेश बघेल सर्वोत्कृष्ट CM ठरले
काँग्रेसचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे या सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. काँग्रेसशासित प्रदेशांमधील जनता आनंदात आहे व तेथे वेगाने विकास होत असल्याची बाबही या सर्वेक्षणात असल्याचा दावा आमदार नाना पटोले यांनी केला.
विरोधकांना ईडी, सीबीआयची धमकी
काँग्रेसच्या प्रचारार्थ आपण देशभरात फिरत आहोत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कुणाला कौल दिला हे सर्वांनी पाहिले. अनेक राज्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे. देशात काँग्रेसची लहर सुरू झाली. परंतु आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांना ईडी, सीबीआय, आयकर अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने संपविण्याचा घाट केंद्रातील मोदी सरकार करीत आहे. ही बाब लोकशाहीसाठी पोषक नाही असे ते म्हणाले.
बाहुले बनू नका, फडणवीसांना सल्ला
महाराष्ट्राला अनेक वर्षांची राजकीय परंपरा आहे. वेगवेगळ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी संघर्ष केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीकरांच्या हातातील बाहुले न बनता महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घ्यावे, असा टोलाही पटोले यांनी फडणवीसांना लगावला.