अहमदनगर8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व उपसभापती कोण होणार हा सस्पेन्स अखेरच्या क्षणापर्यंत कायम होता. निवडीची सभा सुरू असताना बंद पाकिटात सभापती, उपसभापती यांची नावे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून आली. त्यानुसार अहमदनगर बाजार समितीच्या २२ व्या सभापतिपदी भाऊसाहेब बोठे, तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली.
अहमदनगर बाजार समिती निवडणुकीत कर्डिले- कोतकर गटाने एकतर्फी बहुमत मिळवत विरोधी मविआला चौथ्यांना धोबीपछाड दिली. त्यानंतर बाजार समिती सभापती उपसभापती पदी कोणाची वर्णी लागणार याबाबत तालुक्यात चर्चेला सुरुवात झाली होती. त्यासाठी अनेक नावे चर्चिले जात होते. सभापती पदासाठी भाऊसाहेब बोठे, सुधीर भापकर, संतोष म्हस्के, हरिभाऊ कर्डिले यांची, तर उपसभापती पदासाठी रभाजी सूळ, मधुकर मगर यासह काही नावांची चर्चा होती. तशी फिल्डिंग इच्छुकांकडून लावली गेली होती. पण दिव्य मराठीने १८ मेच्या अंकात दिलेल्या वृत्तात सभापतिपद हे वाळकी जिल्हा परिषद गटात रहाणार असून त्यामध्ये भाऊसाहेब बोठे यांचे पारडे जड असल्याचे आणि उपसभापतिपद हे तालुक्यातील उत्तर भागात जाईल व त्यात रभाजी सूळ यांची वर्णी लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला होता. तो अंदाज तंतोतंत खरा ठरला.
नगर बाजार समिती निवडणूक यशानंतर माजी आमदार कर्डिले यांनी दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावून त्यात सभापती उपसभापती निवडी संदर्भात चर्चा केली होती. त्यामध्ये सभापती, उपसभापती निवडीचे सर्व अधिकार एकमताने कर्डिले यांना कार्यकर्त्यांनी दिले होते. सोमवारी सकाळी कर्डिले यांनी त्यांच्या निवासस्थानी नवनिर्वाचित प्रत्येक संचालकाशी व्यक्तिगत चर्चा केली. त्यानंतर सर्व संचालक नगर बाजार समिती कार्यालयात आले. नूतन सभापती-उपसभापती कोण याबाबत अखेरच्या क्षणापर्यंत संचालकांसह इतर कोणालाही काहीही माहिती नव्हते. बंद पाकिटात कोणाचे नाव असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती.
दुपारी दोन वाजता सभापती, उपसभापती निवडीसाठी प्रक्रिया तालुका उपनिबंधक देविदास घोडेचोर यांच्या अधिपत्याखाली सुरू झाली. निवडीची सभा सुरू असताना दुपारी अडीचच्या सुमारास कर्डिले यांचे स्वीय सहायक यांनी बंद पाकीट निवड सभास्थानी पोहोच केले. त्यातील संदेशानुसार अहमदनगर बाजार समितीच्या सभापतीपदी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे, तर उपसभापतिपदी रभाजी सूळ यांची एकमताने निवड करण्यात आली.