अहमदनगर27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अतिवृष्टीमुळे पीक नुकसान झाले पण भरपाई मिळाली नाही. श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी मात्र या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असून शासनाकडून केवळ आश्वसनांवर बोळवण केली जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने गुरुवारी तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.
गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अस्मानी संकटाची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले, त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका वगळता इतर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई प्राप्त झाली. तसेच मार्च-एप्रिलमधील गारपिटीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेले आहे.
खरिपातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई १५ कोटी रुपये तसेच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची नुकसान भरपाई १५ कोटी रुपये असे शेतकऱ्यांचे ३० कोटी रुपये व मार्च-एप्रिलमधील गारपीट झाल्यामुळे झालेली नुकसान भरपाई आपण श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ दिवसांत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येई, असा इशारा अशोक कानडे यांनी यावेळी दिला.
तालुक्यातील सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले होते. परंतु शासनाच्या उदासीनतेमुळे नगर जिल्ह्यातील फक्त श्रीरामपूर तालुका नुकसान भरपाईवाचून वंचित राहिला होता, यावर आमदार लहू कानडे यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी एक मोर्चा काढला होता. परंतु नुकसान भरपाई मिळालीच नाही. श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सापत्नतेची वागणूक शासनाकडून जाणीवपूर्वक मिळते आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
१५ दिवसांत मदत देण्याचे आश्वासन
१५ दिवसांच्या आतमध्ये प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाकडून पैसे वर्ग होतील, याची लेखी हमी दिली. त्या मोर्चानंतरच जिल्हाधिकारी तसेच महसूल उपसचिव यांच्याबरोबर तहसीलदार यांनी दूरध्वनीवरून चर्चा करून ठोस आश्वासन मोर्चेकऱ्यासमोर दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी अशोक कानडे, अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, कार्लस साठे, बाबासाहेब कोळसे, अशोक भोसले, सचिन जगताप, सतीश बोर्डे, ॲड. मधुकर भोसले, नानासाहेब रेवाळे, बाळासाहेब तनपुरे, सरपंच डॉ. रा. ना. राशीनकर, सचिन जगताप, आबा पवार, कार्लस साठे, आदींची उपस्थिती होती.