प्रतिनिधी | जामखेड15 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजालाअनुसूचित जमाती (एसटी प्रवर्ग)आरक्षणाचा वटहुकूम काढावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने बुधवारी (६ सप्टेंबर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथील स्मारकस्थळी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. वटहुकूम निघत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले व प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अहिल्यादेवी होळकरांचे वंशजही उपोषणात सहभागी झाले आहेत.
दोडतले म्हणाले, “धनगरआरक्षणाबाबत आम्हाला भाजप सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. राज्यात भाजपला सत्तेत आणण्यात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना, बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनात बोलताना त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाचे इतरही प्रश्न सोडवण्याची आमची मागणी आहे. १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन होत असून, त्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देण्याचा वटहुकूम काढावा, यासाठी सरकारने पाठपुरावा करावा, असेही ते म्हणाले. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, अण्णासाहेब रूपनवर, गोविंद नरवटे आदी उपोषणास बसले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्यावर आंदोलनावर नजर ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.