आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिला वाद समोर आला आहे. काल मंगळवारी राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत झाली. या लढतीत राजस्थानने शानदार विजय मिळवला असला तरी अशी एक घटना घडली ज्यावरून वाद सुरू झालाय. सामन्यात प्रथम फलंदाजी करत राजस्थानने हैदराबादसमोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष दिले होते.
हैदराबादचा संघ जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा दुसऱ्या षटकात प्रसिद्ध कृष्णाच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार केन विलियमसन बाद झाला. चेंडूने केनच्या बॅटचा हलका स्पर्श केला आणि तो यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला. पण संजूकडून झेल सुटला. चेंडू हवेत असताना पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला देवदत्त पडिक्कलने हुशारीने तो चेंडू पकडला. मैदानावरील अंपायरला नेमके काय झाले हे कळाले नाही. त्यामुळे त्यांनी केन बाद झाल्याचा सॉफ्ट सिग्नल दिला आणि तिसऱ्या अंपायरकडे विचारणा केली. तिसऱ्या अंपायरने रिप्ले पाहिला आणि केनला बाद दिले.
https://www.iplt20.com/video/41520/m05-srh-vs-rr–kane-williamson-wicket
केन बाद झाल्यानंतर मात्र एका नव्या वादाला सुरूवात झाली. व्हिडिओ रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत होते की चेंडूने जमीनीला स्पर्श केलाय. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. हैदराबादसाठी केनची विकेट फार महत्त्वाची होती. तो असा फलंदाज आहे जो सामन्याचे चित्र बदलू शकतो. केन बाद झाला नसता तर त्याने संघाच्या विजयाचा पाया नक्कीच उभा केला असता. केन पाठोपाठ राहुल त्रिपाठी, निकोल पूरन आणि अभिषेक वर्मा देखील झटपट बाद झाले.
काय सांगतो नियम
एखादा खेळाडू जमिनीच्या जवळ झेल घेतो तेव्हा त्याची बोटे चेंडूच्या खाली हवीत. खेळाडूच्या दोन बोटांच्यामध्ये चेंडू असेल आणि चेंडू जमिनीला लागला असेल तरी तो सुरक्षित झेल मानला जातो. केनच्याबाबत चेंडू जमिनीला लागल्याचे दिसत होते. पण हे स्पष्ट होत नव्हते की खेळाडूची बोटे चेंडूच्या खाली आहेत. मैदानावरील अंपायरने सॉफ्ट सिग्नल दिल्याने तिसऱ्या अंपायरने तोच निर्णय कायम ठेवला.