प्रतिनिधी | हिंगोली22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
औंढा नागनाथ येथे कार रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट तलाव्याच्या पाण्यात बुडली. यामध्ये कारमधील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
क्रेनच्या मदतीने कार पाण्याबाहेर काढण्यात आली. गुरुवारी (ता. ८) औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. चक्रधर गजानन सावळे (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोहता येत नव्हते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथील चक्रधर सावळे यांचे औंढा नागनाथ येथे मंदिराच्या पुर्व बाजूला टेन्ट हाऊसचे दुकान आहे. बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चक्रधर हे बाहेरगावाहून दुकानात आले होते. त्यानंतर ते कार रिव्हर्स घेत असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले अन कार थेट गयातिर्थ तलावात बुडाली. चक्रधर यांनी कारमधून बाहेर पडून पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
सीसी टीव्ही फुटेजवरून शोध
दरम्यान, बुधवारी पहाटे औंढा येथे आलेले चक्रधर गावी आलेच नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. तसेच ते बेपत्ता असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही त्यांचा शोध सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता कार तलावात गेल्याचे आढळून आले.
मृतदेह कारमध्ये नव्हता
पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे, जमादार संदीप टाक, इम्रान पठाण यांच्या पथकाने रात्री घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. मात्र, त्यात चक्रधर यांचा मृतदेह नव्हता. त्यामुळे तलावात शोध मोहिम सुरु केली असता चक्रधर यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आज सकाळी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात चक्रधर यांच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या प्रकरणात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.