दुग्गा, चारुलता, आरती आणि…


‘देवी’मध्ये देवीपण लादलं जाण्याआधी ‘ती’ एक साधीसुधी गृहिणी असते

Advertisement

|| अरुणा अंतरकर
ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या चित्रपटांमधील नायिका आजही जुन्या झाल्या नाहीत. त्या मृदू, निरागस आणि प्रामाणिक असण्याबरोबर खंबीर तर होत्याच; पण आपापल्या काळानुसार वागतानाच काळाच्या खूप पुढचा विचारही त्यांच्या माध्यमातून समोर येत होता. हेच त्यांचा स्त्री-व्यक्तिरेखांचं वैशिष्ट्य ठरलं.  रे यांचा चित्रपट वेगळा असूनही सगळ्यांना भिडेल असा ठरला हे कदाचित त्यामुळेच. त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होऊन ३० वर्षं पूर्ण होताना आणि त्यांच्या जन्मास नुकतीच १०० वर्षं पूर्ण झाली असताना, त्यांच्या प्रमुख स्त्री व्यक्तिरेखांचं हे स्मरण.

वर्षानुवर्षं जिथे राहातो त्या आपल्याच गावाच्या एखाद्या सुंदर भागाचा आपल्याला पत्ताच नसावा आणि अचानक एके दिवशी तो लागावा तसंच काहीसं झालं सत्यजीत रे यांचा चित्रपट पहिल्यांदा पाहताना!  तशी चांगल्या चित्रपटाची ओळख नव्हती असं नाही. ती बिमल रॉय, मेहबूब, शांताराम, राज कपूर, गुरुदत्त, बी. आर. चोप्रा, श्रीधर, के. विश्वनाथ प्रभृतींनी त्यापूर्वीच करून दिलेली होती. तरीही प्रथमदर्शनीच सत्यजीत रेंच्या चित्रपटाच्या प्रेमात पडायला झालं.

Advertisement

द्वितीय दर्शन हा प्रथमदर्शनी प्रेमावर उतारा असतो म्हणतात. पण ‘तीन कन्या’, ‘चारुलता’, ‘महानगर’, ‘प्रतिद्वंदी’, ‘जनारण्य’, ‘देवी’ ही रे-पटांची द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि आणखी काही दर्शनं हे प्रेम वाढवतच गेली. त्यात आकंठ बुडून जाताना दर वेळी नवा आनंद मिळत गेला. काया-वाचा-चित्ते(आणि वित्तेसुद्धा) मी नित्यनेमानं बघत असलेल्या चित्रपटांपेक्षा रेंचा चित्रपट काय, किती आणि कसा वेगळा आहे, याचा मला आजवर पत्ता लागलेला नाही. बहुधा मी चित्रपटाची अभ्यासक, इतिहासकार, भाष्यकार नसून साधी-सरळ, नॉर्मल, रेग्युलर, ऑर्डिनरी- ऊर्फ हृदयानं चित्रपट पाहाणारी सिनेप्रेमी असल्याचा हा दुष्परिणाम असावा. त्यामुळेच की काय, रेंच्या चित्रपटाचा निखळ चांगुलपणा मला जाणवतो, ‘महसूस’ होतो, अनुभवता येतो; पण उलगडत नाही. कारण रेंचा चित्रपट बघताना त्यात नेहमीच्या चित्रपटांहून काहीच वेगळं शोधूनही सापडत नाही. ‘रंग माझा वेगळा, ढंग माझा आगळा’ असं ओरडून ओरडून सांगणारी दुर्बोधता, रुक्षता किंवा ‘जांभई पे जांभई’ आणणारी अति संथ गती, अथवा तुटकपणा त्यांना चिकटलेला नसतो. उलट बॉलीवूडपटांमध्ये दिसतील किंवा शोभतील असे कमालीचे साधे, पण हसरे प्रसंग रे-पटांमध्ये आढळतात. ‘पाथेर पांचाली’मधलं पावसाचं दृश्य आठवा. किती हळुवार, किती हवंहवंसं वाटणारं! तिथे पावसाच्या आगमनाची घोषणा सळसळत्या वाऱ्यानं आणि त्यामुळे मनमुराद डोलणाऱ्या पांढऱ्याशुभ्र आणि देखण्या कापसाच्या रोपांच्या दर्शनानं होते. हिरव्यागार झाडीला बिलगून बसलेल्या जलाशयातल्या कमळावर आणि मोठमोठ्या हिरव्यागार पानांवर पावसाचे मोत्यांसारखे टपोरे थेंब नाचू लागतात. ते टिपणारा रेंचा कॅमेरा फिरत फिरत तेवढ्याच सहजतेने एका माणसाच्या उजडा चमन म्हणावा अशा डोक्यावर, अर्थात टकलावर टपकन पडलेला थेंबही टिपतो. ‘जलसा घर’मधला ओसाडवाडीचा जहागीरदार म्हणावा अशा एका श्रीमंताच्या प्याल्यामध्ये हवेतून कोसळून एका किड्याचा अपघाती मृत्यू होतो, तेही दृश्य त्यांच्या कॅ मेऱ्याच्या मिश्कील नजरेतून सुटत नाही.

त्यांच्या कॅमेऱ्यानं अशा अनेक गोष्टी टिपल्या आहेत. चारुलता ही सधन, सुशिक्षित जोडीदार असूनही एकटेपणाची जन्मठेप भोगणाऱ्या अनेक सुहासिनींपैकी एक. एकटेपणाचा कडेलोट होतो, तेव्हा ती तिच्या भल्यामोठ्या हवेलीच्या नक्षीदार भव्य खिडक्यांना लावलेल्या पट्टीदार पडद्यामधून रस्त्यातली गर्दी न्याहाळू लागते. रस्त्यावरून चाललेली रंगीबेरंगी उंच टोपी घातलेली, वासुदेवासारखी एक असामी तिचं लक्ष वेधून घेते. मग त्या भल्यामोठ्या दालनाच्या प्रत्येक खिडकीपाशी जाऊन ती तो अवतार बघते. अखेर खिडक्यांची संख्या संपते. चारुलतेचं एकाकीपण, तिचा कंटाळा पुन्हा एकदा तिला वेढा घालतो. वरकरणी निरुपद्रवी गंमत, किंबहुना काहीसं बालिशच वाटावं, पण कारुण्याचं अस्तर असलेलं ते दृश्य एका वेळी परस्परविरोधी भावना चपखलपणे व्यक्त करतं. ते पाहिलं की सत्यजीत रेंचं वेगळेपण, त्यांचं सामथ्र्य लक्षात येतं.

Advertisement

‘देवी’मध्ये देवीपण लादलं जाण्याआधी ‘ती’ एक साधीसुधी गृहिणी असते. पुढची शोकांतिका घडण्याआधी तिच्या चाकोरीतल्या जीवनातलं गोड काव्य सत्यजीत रे आपल्या मनावर ठसवतात आणि अंधविश्वासाचा बळी ठरलेल्या या नायिकेची शोकांतिका आपल्या मनावरची जखम होऊन ठसठसू लागते. ‘देवी’ची सुरुवातच संसारनाट्यातल्या गोड प्रसंगानं होते. भल्या सकाळी नायिकेला जाग येते, तेव्हा तिच्या साडीचा पदर पतीराजाच्या अंगाखाली पहुडलेला असतो. तिच्यावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगाची खबर नसलेल्या पतीला जागं न करता पदर कसा सोडवून घ्यावा, असा प्रश्न या पत्नीला पडतो. अगदी हलक्या हातानं ती अलगद हे काम जमवते आणि स्वयंपाकघरात जाऊन चहाच्या तयारीला लागते. पतीदेवांना जाग येते, डोळे उघडताच रोजच्या सवयीनुसार त्याचा हात पलंगाशेजारच्या स्टुलावर ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटाकडे जातो. सिगारेट काढून घेण्यासाठी तो पाकीट उघडतो, तेव्हा पाकिटाच्या टोकाशी असलेल्या इवल्याशा कोऱ्या जागेवर त्याला पत्नीचं अक्षर दिसतं. तो उत्सुकतेनं वाचतो. त्याच्यासाठी पत्नीनं ‘वैधानिक चेतावनी’ दिलेली असते- ‘एकच ओढायची हं! लक्षात आहे ना?’ तो हसतो आणि सिगारेट ओठात ठेवून पत्नीकडे कटाक्ष टाकतो. ती ‘हद्द झाली’ अशा अर्थानं हसते. त्या काळातल्या विलक्षण सोशिक भारतीय स्त्रीच्या चेहऱ्यावरचं ते विलक्षण गोड हसू!

नवऱ्याच्या सिगारेटसारखीच संसारात चकमकी घडवणारी दुसरी गोष्ट म्हणजे लिपस्टिक! किती छोटी गोष्ट, पण तिनं  त्या काळातल्या अनेक संसारांमध्ये वादळ उठवलं. त्यामागची कारणं वेगवेगळी असतील, परिस्थिती आणि संदर्भ भिन्न असतील; पण अनेकदा ही चिमुकली कांडी ‘आरडीएक्स’ सारखी स्फोटक ठरली आहे. सत्यजीत रेंचा ‘महानगर’ त्याला अपवाद नाही. रेंच्या या महाकाव्याची- हो, ‘महानगर’पर्यंतचे त्यांचे सगळे चित्रपट स्त्रीप्रधान होते आणि त्यांच्यात कवितेचा तो खास गुण होता. अगदी थोडक्या शब्दांमध्ये गहनातला गहन विषय सहजपणे आणि नेमकेपणानं व्यक्त करणं. ‘पाथेर पांचाली’ ते ‘महानगर’पर्यंतचे सत्यजीत रेंचे चित्रपट या काव्यगुणामुळे अविस्मरणीय झाले आहेत. या गुणामुळे त्यांच्या चित्रपटांत गोडवा, नर्मविनोद, सुखावणारा (आणि घरंदाज) शृंगार येतो. साहजिक हे सर्व चित्रपट पे्रक्षणीय आणि रंजकदेखील बनतात. याचं उत्तम आणि सदैव लक्षात राहील असं उदाहरण म्हणजे ‘महानगर’. स्त्रीनं नोकरी करणं ही अपूर्वाईची गोष्ट होती त्या काळातली ही कथा. अर्थातच मध्यमवर्गीय घरात घडणारी.  आकस्मिक नोकरकपातीची कुऱ्हाड कोसळल्यामुळे आणि दुसरी नोकरी लगेच मिळणं कठीण आहे हे लक्षात आल्यावर, पांढरपेशा वर्गातला आणि घरात कत्र्याची- किंबहुना पोशिंद्या पुरुषाची प्रमुख भूमिका करणारा नायक परिस्थितीपुढे हार पत्करतो. कण्हत्या मनानं नायिकेला नोकरी करण्याची परवानगी देतो. शिक्षणाचं आणि पैशाचं पाठबळ नसताना, घराबाहेरच्या जगाचा काडीचा अनुभव नसलेली ही मध्यमवर्गीय गृहिणी मनमिळाऊपणा आणि उपजत चुणचुणीतपणा यांच्या आधारे त्या नवख्या दुनियेत यशस्वी होते.  सेल्समनशिपचं काम करणारी आरती (ही भूमिका माधबी मुखर्जी यांनी अप्रतिमपणे साकारली आहे.) त्यात पहिला नंबर पटकावते आणि बॉसचा विश्वासही मिळवते. या यशामुळे आरतीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, जीवन जगण्याचा नवा उत्साहदेखील त्याबरोबर निर्माण होतो. ती नीटनेटकी राहू लागते. याचाच एक भाग म्हणून ती एक दिवस लिपस्टिक लावते. त्या काळात लिपस्टीक लावण्यासारखी फॅ शन करणं हे मध्यमवर्गीय स्त्रीसाठी बिघडलेपणाचं पहिलं लक्षण मानलं जायचं त्यामुळे आपली बायको  ‘बिघडली  आणि आपल्या हाताबाहेर चालली’ या विचारानं तिचा नवरा कमालीचा अस्वस्थ होतो.  घरी रिकामं बसणं त्याला डाचत असतंच, शिवाय पत्नीची वाढती कमाई, आणि तिचं यशही झोंबत असतं. तिच्या लिपस्टिकमुळे जणू त्याच्या आणि घराण्याच्या नावावर डाग पडतो! नियती यापुढे त्याला आणखी मोठे चिमटे घेते. मैत्रिणीवर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून आरती नोकरी सोडण्याची तयारी करते तेव्हा घर हादरून जातं. आरतीनं नोकरी सुरू करताच अस्वस्थ झालेलं घर ती नोकरी सोडणार म्हणताच मात्र भयभीत होतं. तिच्या नोकरीमुळे घरात आलेल्या स्वास्थ्याला प्रत्येकजणच चटावलेला असतो. म्हातारे सासू-सासरेही त्याला अपवाद नसतात.

Advertisement

आज स्त्रीनं नोकरी करणं ही नित्याची गोष्ट झाली आहे. तिला समाजमान्यता आहे, प्रतिष्ठा आहे आणि बाजारभावही आहे. साठी-सत्तरीच्या दशकात  मात्र स्थिती बरोबर विरोधी होती. चुकीच्या समजुतींना आणि रूढींना समाजमान्यता मिळाली की वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात विपरीत परिणाम दिसू लागतात. हे लक्षात आणून दिल्यानंतर नोकरदार स्त्रीबद्दल तिच्या कार्यक्षेत्रात दिसणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीचं आणखी एक उदाहरण ‘महानगर’मध्ये पाहायला मिळतं. नेहमी फिरतीवर असणारा नोकरदार पती काही दिवसांसाठी घरी येतो, तेव्हा त्याच्या पत्नीचं ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होतं, असा आरोप नोकरदार स्त्रीला सहन करावा लागतो. ‘महानगर’मध्ये नायिकेच्या मैत्रिणीवर असाच आरोप होतो आणि त्याबद्दल तिला काढून टाकण्याची धमकी दिली जाते. या अन्यायाला तर नायिकेचा विरोध असतोच, पण त्याहीपेक्षा तिचा विरोध असतो, तो ज्या हलक्या भाषेत सवंगपणे या आरोपाचा उच्चार होतो त्याला! स्त्रीचा सन्मान दुखावतो म्हणून ही नायिका आता त्या कंपनीत नोकरी करायला तयार नसते. नायिकेच्या खंबीरपणापुढे बॉसला माघार घ्यावी लागते हा भाग वेगळा. ‘महानगर’ या चित्रपटाचा  वेगळेपणा हा की स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वगैरेंचा उल्लेखही न होता कथेच्या ओघात सहजपणे ही गोष्ट घडते. चुकीची दुरुस्ती आणि भरपाईही होते.

अगदी याच सहजसुंदरतेनं ‘पाथेर पांचाली’ मध्ये गरिबी आनंदाच्या आड येत नाही, हे सत्य सांगितलं जातं. कथेतल्या मध्यमवयीन जोडप्याच्या घरात घनघोर दारिद्र्य आहे. पण त्यांच्या दुर्गा (बंगाली उच्चारानुसार ‘दुग्गा’) या मुलीला आणि तिच्या दोन भावंडांना या दु:खाची जाणीव नाही. कधी चुरमुरे वाटीत घेऊन भातुकली करावी, कधी चिंचोके दगडावर घासत बसावेत, नाहीतर कुत्र्यामांजराशी खेळावं, असं करत त्यांचं बालपण मजेत चाललेलं असतं. दुर्गाच्या पेटीत तर तुटक्याफुटक्या मण्यांचा हारसुद्धा डौलात विसावलेला दिसतो. दुर्गाच्या नेतृत्वाखाली तिची ही ‘गँग’ गावाबाहेर आगगाडी पाहायला जाते, तो क्षण तर अभूतपूर्व आनंदाचा आहे; त्या मुलांकरता आणि प्रेक्षकांकरताही! लांबून येणारा आगगाडीचा घुमारेदार आवाज, त्यामुळे बांधावरच्या खांबा-खांबातून उठणाऱ्या ध्वनीलहरी, आगगाडी जवळ येत जाते तेव्हा वाढणारा तिचा तालबद्ध आवाज आणि इंजिनमधून उठणाऱ्या धुराचं वाढतं जाळं… आपणही जणू पहिल्यांदाच आगगाडीचं दर्शन घेतोय असं वाटतं आणि अंगावर रोमांच उभे राहतात.‘सत्यजीत रे देशाचं दारिद्र्य विकून परदेशात पुरस्कार मिळवतात’ असा आरोप त्या काळात नर्गिससारख्या जाणत्या अभिनेत्रीनं केला होता याची इथे आठवण होते. ‘मदर इंडिया’ सह मेहबूब यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या नर्गिसची चित्रपटविषयक जाण इतकी अपरिपक्व कशी, याचं सखेद आश्चर्य वाटलं. ‘पाथेर पांचाली’तल्या मुलांचे सतत चाललेले खेळ, खोड्या आणि आगगाडी दर्शन हा आरोप पुसून टाकायला समर्थ आहे. बालपणाच्या निरागसतेला आणि जीवनातल्या आनंदाला गरिबी आडवी येत नाही, याचा किती गोड प्रत्यय इथे येतो.

Advertisement

रे यांना हलकेफुलकेपणाचं वावडं नव्हतं. वास्तवस्पर्शी चित्रपटांबरोबर त्यांनी ‘सायन्स फिक्शन’वर चित्रपट काढले (‘सोनार केला’). त्यात डिटेक्टिवगिरी केली. ‘गोपी ग्याने बाघा बाए’सारखा बालचित्रपट बनवला. ‘प्रतिद्वंदी’मध्ये तरुणांच्या बेकारीचा ज्वलंत प्रश्न मांडतानाही त्यांचा सूर कर्कश्य झाला नाही. परिणामकारक सौम्यता हा त्यांचा खास गुण. ‘जलसांधर’ आणि ‘का पुरुष ओ महापुरुष’मध्ये त्यांनी सरंजमशाहीला आणि सदोदित मोठेपणाच्या तंद्रीत वावरणाऱ्या पुरुषी अहंकाराला असेच चिमटे घेतले आहेत. ‘शतरंज के खिलाडी’ मध्ये बुद्धिबळाच्या खेळापुढे आपल्या राजकीय सत्तासामथ्र्याची फिकीर नसलेल्या अमीर-उमरावांच्या जगामधल्या स्त्री-पुरुष संबंधांतल्या चोरटेपणाचा ते मिश्कील वेध घेतात.

त्यांच्या चित्रपटाचा कॅनव्हास फार मोठा होता आणि त्यांचा दिग्दर्शनाचा आवाका तर फार फार मोठा होता. रस्त्यावर आयुष्य घालवणाऱ्या ट्रक ड्रायव्हरपासून स्वत:च्याच हस्तिदंती दुनियेत मश्गुल राहाणाऱ्या फिल्मी सुपरस्टारपर्यंत सगळ्या वर्गातले, सगळ्या प्रवृत्तींचे नायक त्यांच्या चित्रपटात दिसले. बेरोजगार भावाच्या पाठीशी उभी राहताना ‘प्रतिद्वंदी’तली बहीण हिंदी चित्रपटातल्या बऱ्याच नायिकांप्रमाणे बदनाम पेशाचा आधार  घेते. अशा स्त्रीच्या सविस्तर चित्रणात रे रमले नाहीत. त्यांना जीवन जगणं अधिक महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून बेरोजगार नायकाच्या संघर्षाला त्यांनी अधिक महत्त्व दिलं, उठाव दिला.

Advertisement

त्यांच्या भरीव चित्रसंपदेतले ‘चारुलता’सारखे स्त्रीप्रधान- किंवा स्त्रीला पुरुषाइतकाच वाव देणारे चित्रपट चर्चेच्या झोतात राहिले. कारण त्या स्त्रिया जितक्या वेगळ्या, तितकं स्वाभाविक वागणाऱ्या होत्या.

‘अनुराधा’पासून ‘अनुरुप’पर्यंतच्या अनेक हिंदी चित्रपट नायिकांप्रमाणे चारुलतादेखील सधन संसारात एकाकीपणा भोगते. वादळासमान घरी आलेल्या पाहुण्या परपुरुषाशी (तो तिचा दीरच आहे) तिचीही भावनिक जवळीक होते. तिच्या आयुष्यात आलेली ही सुखाची वळवाची सर ‘आमी चिनी गो चिनी तोमारे’ या सुंदर गाण्यातून व्यक्त होते, तेव्हा अपरिहार्यपणे मात्र हिंदी चित्रपटाची आठवण होते. मात्र त्या नायिकेप्रमाणे रेंच्या नायिका उसासे टाकण्यात आणि झुरण्यात वेळ अन् आयुष्य वाया घालवत नाहीत. ज्या तरलतेनं रे ‘जनारण्य’मध्ये शहरी नायकाला वाटणारं ग्रामीण स्त्रीबद्दलचं शारीरिक आकर्षण रेखाटतात, त्यापेक्षाही जास्त परिपक्वतेनं, पण रेशमी कोमलतेनं ‘तीन कन्या’मधल्या ‘समाप्ती’ या लघुकथेत किशोरवयीन बालिकेत होणारी स्त्रीत्वाची पहिली नवथर जाणीव व्यक्त करतात.

Advertisement

भाषा वेगळी होती (बंगाली) म्हणून त्यांचे चित्रपट वेगळे ठरवणं हा ढोबळपणा होईल. चित्रपट वेगळे होतात, ते दिग्दर्शकाला त्यांच्या माध्यमाची आणि त्याबरोबर जीवनाची, मनुष्य स्वभावाची जाण असते, त्यातून. कथा इथे घडते आणि तिथेही (युरोप आणि अमेरिकेला) बहुधा त्याच असतात परंतु खूपदा चित्रपटाची पार्श्वभूमीच वेगळी असते. अशा पार्श्वभूमीमुळे चित्रपट वेगळा होतो, पण मोठा आणि चांगला होतोच असं नाही. त्याला ही गुणवत्ता रेंसारखा प्रतिभाशाली दिग्दर्शक देतो. रोजच्या जीवनातले नित्याचे, छोटे, तरीही सहजपणे तुमच्या आमच्या लक्षात न येणारे पैलू ज्याच्या लक्षात येतात, तोच दिग्दर्शक ही किमया करू शकतो. रेंना ती लाभली होती की त्यांनी ती अवगत के ली होती, सांगता येत नाही. पण त्या किमयेनं त्यांचे चित्रपट सर्वस्पर्शी केले. त्याचा चित्रपट  प्रायोगिक, कलात्मक वगैरे होता की नाही, हा भाग दुय्यम आहे.

रेंचा चित्रपट तुमच्या आमच्यातलाच होता, म्हणून तर आवडला. सामाजिक, ऐतिहासिक किंवा तंत्रप्रधान चित्रपटांपेक्षा, मानवी संबंधांबद्दल, घर आणि कुटुंब यांच्याबद्दलचे चित्रपट आणि ते काढणारा दिग्दर्शक यशस्वी होतो, हे महत्त्वाचं ‘बॉक्स ऑफिस सत्य’ त्यानं अधोरेखित केलं. हाही रेंचा मोठेपणाच! हेच त्यांचं वेगळेपण!

Advertisement

[email protected]

(जागेअभावी ‘गद्धेपंचविशी’  हे सदर आजच्या अंकात प्रसिद्ध होऊ शकले नाही.)

Advertisement

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.Source link

Advertisement