राज ठाकरे rajathackeray@gmail.com
आयुष्यात हजारो माणसं भेटतात. पण एखाद्याशीच असं काही नातं जुळतं, की तुमच्या जगण्याला त्या व्यक्तीच्या अस्तित्वानं सोन्याचा वर्ख जडतो. मी त्या अर्थानं नशीबवान खरा. लतादीदींनी मला मुलासारखं मानणं, याहून आयुष्यात आणखी काय मिळायला हवं? माई मंगेशकरांच्या निधनानंतर मी दीदींना भेटायला ‘प्रभुकुंज’वर गेलो होतो. ती माझी पहिली थेट भेट. नंतरचं माझं सारं जगणंच दीदींनी व्यापून टाकलं. त्या काळातल्या अशाच एका भेटीत दीदींबरोबर गप्पा सुरू होत्या आणि काही वेळात मीनाताई तिथे आल्या. पाठोपाठ उषाताई, आशाताई, हृदयनाथ असे सगळेच तिथं एकत्र आले. गप्पांमध्ये इतक्या गाण्यांच्या इतक्या काही आठवणी निघाल्या, की त्या ऐकतानाही हरखून जावं. प्रत्येक क्षणी तिथे बसलेला प्रत्येक प्रतिभावंत त्या गप्पांमध्ये अशी काही मोलाची भर घालत होता, की माझ्यासाठी ती विम्बल्डनची फायनल मॅचच होती. सगळे दिग्गज एकत्र आठवणी काढताहेत आणि मी एकटाच प्रेक्षक आणि श्रोत्याच्या भूमिकेत! हे असं नंतरही काही वेळा जमून आलं.
* * *
कळत्या वयात आलो तेव्हा मी किशोरकुमारचा फॅन होतो. माझे वडील संगीतकार श्रीकांत ठाकरे यांच्याकडे रफीसाहेबांनी खूप गाणी गायली होती, तरीही. दीदींचा आवाज, त्याचं वैशिष्टय़, उच्चार, अप्रतिम सुरेलपणा मला नंतर नंतर उमजायला लागला, कळायला लागला. जेव्हा मी त्या आवाजात खोल खोल जाण्याचा प्रयत्न करू लागलो, तेव्हा प्रत्येक वेळी मला नवीन साक्षात्कार झाल्याचा आनंद मिळायचा.. काहीतरी अलौकिक ऐकल्याचं समाधान मिळायचं. गाताना त्यांनी श्वास कुठे घेतला असेल, असा प्रश्न पडायचा. एकदा त्यांना मी म्हणालोही की, तुमचं गाणं ऐकताना आम्ही त्यातच गुंतून जातो. किती सहजपणे तुम्ही गाणं गाताहात असं जाणवत राहतं. पण जेव्हा तुमचंच गाणं दुसरं कोणी गायला लागतं तेव्हा ते किती कठीण आहे, हे कळतं. तुम्ही किती मोठय़ा आहात, ते तेव्हा कळतं. इतर कलावंतांसारखे आवाज काढण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. दीदींचं गाणंही ते गातात; पण ते फक्त त्यांचं गाणं गातात. कुणालाच त्यांच्या आवाजाची नक्कल नाही करता येत. तुम्ही गाणं गाऊ शकता; पण दीदी किंवा आशाताई यांच्या गाण्यातलं ‘एक्स्प्रेशन’ तुम्ही कुठून आणणार? याचं कारण त्या स्वत: त्या चित्रपटात काम करत असतात.. ती भूमिकाच जगत असतात.
मला दीदींचे वेगळेपण वाटतं ते असं, की एवढय़ा महाकाय चित्रपटसृष्टीत त्या स्वत:च्या ‘टम्र्स’वर जगल्या.. टिकून राहिल्या. उगाचच कुणी त्यांच्यावर मोनॉपॉलीचा आरोप करतो तेव्हा म्हणूनच आश्चर्य वाटतं. त्यांच्याशिवायही अनेकांनी गाणी गायलीच की! त्यांनी कुणालाही कधी अडवलं नाही. तरीही प्रत्येक संगीतकाराला आपलं गाणं दीदींनीच गावं असं वाटत असे, याचं कारण त्यांच्या आवाजातलं अलौकिकत्व आणि त्यांचा परिपूर्णतेचा ध्यास.
* * *
दीदी एकदा सांगत होत्या.. ‘‘रात्री रेकॉर्डिंग करून दमून घरी आले आणि तेवढय़ात राज कपूर यांचा फोन आला- ‘आत्ताच्या आत्ता स्टुडिओत ये,’ असा त्यांचा आग्रही सूर होता. मुकेशजींचं ‘आ, अब लौट चले’ या गाण्याचं ध्वनिमुद्रण सुरू होतं. राजसाहेबांचं म्हणणं होतं, की या गाण्यात मध्ये आलाप हवेत. आणि संगीतकार शंकर जयकिशन त्यावर अडून बसले होते. मी मध्यरात्री तिथे पोहोचले. सगळं गाणं ऐकलं. राज कपूर म्हणाले, ‘आता तुला जे वाटतं ते गा..’ त्यानंतर मी तिथे जे गायले, ते नंतर गाण्यात समाविष्टही झालं.’’
त्यांनी मदनमोहनजींबद्दलही एक आठवण सांगितली. समोर गीत लिहिलेलं होतं, पण त्यांना काही सुचत नव्हतं. तो कागद त्यांनी दीदींकडे दिला आणि काही सुचतंय का, असं विचारलं. दीदींनी काहीतरी गुणगुणायला सुरुवात केली आणि मदनमोहन यांना पुढचं सगळं गाणंच दिसू लागलं. गाणं होतं.. ‘मेरा साया, साथ हो..’ दीदी अभिजात संगीतातील ‘ढूँढो बारी सैंया’ ही बंदिश गुणगुणत होत्या आणि ते गाणं त्यातूनच उमलून आलं होतं.
दीदींच्या मराठी भाषेवर अन्य कशाचाच प्रभाव नाही. दीदींच्या मराठी असण्याचा हा एक फार मोठा गुण होता. त्यांच्या आवाजात कोणत्याही भाषेतलं गाणं ऐकायला लागलं की ती त्यांची मातृभाषा असावी अशी खात्रीच वाटावी. दीदींकडे हा जो गुण होता, तो सगळ्या संगीतकारांसाठी विलोभनीय होता.
* * *
‘आनंद’ चित्रपटातलं गुलजार यांचं वाक्य दीदींनी खोटंच ठरवलं.. ‘जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं.’ दीदींनी ९३ व्या वर्षांपर्यंत आपलं स्थान अढळपणे राखलं आणि त्यासाठी आयुष्यात जे जे काही करावं लागलं, ते सतत केलं. सात दशकं चित्रसृष्टीत सतत वरच्या स्थानावर राहणं, ही सोपी गोष्ट नव्हेच. लता मंगेशकर या नावाभोवतीच्या वलयात आपण सगळे अजूनही चाचपडतोय.. पण ते सगळं शब्दांत पकडता येत नाहीये. त्यांच्याबद्दलच्या नाना अफवा, चर्चा किती फोल होत्या, हे मीही अनेकदा जवळून अनुभवलंय. त्यांच्यातला प्रेमळपणा, त्यांचं औदार्य हे गुण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला अनुभवाला आले आहेत. बाळासाहेबांना त्या खूप मानत. शिवसेनेच्या स्थापनेनंतर त्यांनी एक लाख रुपयांचा धनादेश थेट बाळासाहेबांना भेटून दिला. त्यानंतरही बाळासाहेबांच्या निधनापर्यंत त्या दोघांमधला असीम स्नेह कायम टिकला.
भूजला भूकंप झाला तेव्हाची गोष्ट.. दीदी दिल्लीत होत्या. तिथून त्यांचा फोन आला. आपण काहीतरी करायला हवं असं त्यांना वाटत होतं. आम्ही जाहीर कार्यक्रम करायचं ठरवलं. शिवाजी पार्कवर आठ दिवसांतच झालेल्या त्या कार्यक्रमासाठी आम्ही एक लाख दहा हजमर खुर्च्या जमा केल्या. सर्वासाठी शंभर रुपयांचा एकच तिकीट दर ठेवला. त्यातून एक कोटी रुपये भूकंपग्रस्तांसाठी जमा झाले. दीदींचा हा गुण नुसता कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीय आहे. १९९७ मध्ये त्यांचा मी केलेला पहिला कार्यक्रम.. त्या ‘हो’ म्हणाल्या खऱ्या, पण पैशांचं काहीच बोलणं झालं नव्हतं.. मी चाचरत विचारलं, तर म्हणाल्या, ‘राज, मी तुमच्यासाठी हो म्हटलं. पैशासाठी नाही.’ या अशा प्रेमळपणाचा मी नुसता साक्षीदार नाही, तर वाटेकरीही आहे. मला त्यांनी आपल्या मुलासारखं मानलं, याहून आयुष्यात आणखी काय मिळवायला हवं?
* * *
१९९६.. मला एका भलत्याच प्रकरणात गोवण्याचे प्रयत्न सुरू होते. आरोप खुनाचा होता आणि सगळीकडे नुसता ओरडा चालला होता. मी त्याच संदर्भात पत्रकार परिषदेसाठी निघालो होतो. तेव्हा मोबाईल नुकतेच हाती पोचले होते. मोटारीत बसलो आणि एका वेगळ्याच क्रमांकावरून फोन आला.. ‘मी लता.’ मी विचारलं, ‘कोण लता?’ ‘लता मंगेशकर.. हे बघा- जे काही सुरू आहे, ते कळतंय. ही लता तुमच्या पाठीशी सदैव असेल हे लक्षात ठेवा..’ त्या क्षणी माझ्या मनाचं जे काही पाणी पाणी झालं, ते कोणत्या शब्दांत सांगता येईल?
* * *
सचिन तेंडुलकरला त्याच्या नव्या घराच्या म्युझिक रूमसाठी दीदींचं काहीतरी हवं असा त्याचा आग्रह होता. (‘दीदींनी नाक पुसलेला रुमाल दिला तरी मला चालेल,’ असंही म्हणाला सचिन.) मग मी दीदींशी बोललो. ‘मी काय देणार?’ असं त्या म्हणाल्या.. आणि एक कल्पना सुचली. दीदींच्या अक्षरात एक गाणं आणि त्याखाली सचिनसाठी शुभेच्छा अशी एक फ्रेम द्यावी असं ठरलं. दीदींना म्हटलं, ‘प्रभुकुंजवर आम्ही दोघंही येतो.’ म्हणाल्या, ‘नको. तुमच्याच घरी भेटू.’ माझ्या घरात त्या दिवशी दोन ‘भारतरत्न’ एकत्र आले आणि एक अपूर्व योग जुळून आला.
* * *
त्यांच्या घरी त्यांच्याबरोबर त्यांच्याच गाण्यांबद्दल तासन् तास गप्पा मारण्याचं अलौकिक भाग्य माझ्या वाटय़ाला आलं. माझ्या घरी सहज म्हणून आलेल्या दीदी कितीतरी वेळ गप्पांचा फड जमवायच्या. लौकिक आयुष्यात आपल्या सगळ्यांना कसला तरी पारलौकिक आधार हवा असतो. माझ्यासाठी लतादीदींचं असणं हा असा आधारवृक्ष होता. त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करायची होती, तेव्हा मी ती ‘करू नका’ म्हणून हट्ट धरला होता. ‘खूप तेलं मिळतात.. त्यामुळे नक्की आराम पडेल,’ असंही परोपरीनं सांगत होतो. पुण्याहून ही तेलं आणवली आणि त्यांच्या घरी जाऊन बसलो. या तेलानं नक्की फरक पडेल असं म्हणत बसलो. आईसाठीचा हा माझा बालहट्ट होता. त्यामागे त्यांनीच लावलेला लळा होता आणि त्यांनीच केलेलं अफाट प्रेमही होतं.
माझ्यासाठी दीदी या चराचरात व्यापून आहेत..
The post दीदी.. appeared first on Loksatta.