जळगाव39 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
मुलगी वयात आल्यानंतर आई व मुलीमध्ये मोकळा संवाद असणे आवश्यक असते. मात्र शहरात आजही आई व मुलगी यांच्यात संवाद होत नसल्याने मात्र वयात येत असलेल्या शाळकरी मुलींना अनेक प्रश्न भेडसावत आहे. यात शारीरिक, भावनिक, मानसिक, झपाट्याने होणारे लैंगिक बदल यामुळे मुले-मुली भांबावून जात आहे.
त्याच्यात भर म्हणजे मुलांचे मुलींप्रती व मुलींचे मुलांप्रती असलेले आकर्षण याविषयी सर्वाधिक प्रश्न ‘बॉक्स ऑफ हेल्प’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विचारले आहे. अपूर्ण ज्ञान, संवाद नसणे यामुळे सर्वाधिक समस्या निर्माण होत असल्याचा निष्कर्ष या उपक्रमातून नोंदवण्यात आला आहे.
शहरात गेल्या सात वर्षांपासून बॉक्स ऑफ हेल्प उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील ५० शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्यात आली आहे. यात मुली त्यांच्या तक्रारी टाकतात व महिन्याअखेरीस या तक्रारींचे निवारण केले जाते. या बॉक्समध्ये आतापर्यंत सर्वाधिक समस्या या लैंगिक बदलाबाबत मांडण्यात आल्या आहेत. किशोरवय म्हणजे १० ते १९ आणि पुढे १९ ते २२ हा गट अतिशय संवेदनशील गट समजला जातो. या काळात शरीरातील हार्मोन्स गोंधळ घालायला लागतात. यात मुला-मुलींची चूक नसते. पण त्यांना समजून घेणे गरजेचे असते.
समजून घेणे गरजेचे असते. किशोरवयीन मुलांमध्ये ‘रिस्क टेकिंग बिहेव्हिअर’ अर्थात नवनवीन प्रयोग करण्याचे धाडस अधिक असते. ते बरीच माहिती मित्र-मैत्रिणी व गुगलवरून मिळवतात. ती बरोबर आहे की नाही त्यांना कळत नाही.
पूर्वी मुले-मुली १४-१५ वर्षांमध्ये वयात यायचे. आता दहाव्या वर्षापासूनच शरीरात बदल दिसायला लागत आहेत. सहावी, सातवीच्या मुला-मुलींत ‘रिलेशनशिप’ची समस्या दिसून येत असून, याविषयी अधिक प्रश्न त्यांच्याकडून मांडले जात आहेत.
घरात मन मोकळा संवाद साधा
सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत बदल झाला आहे. मुलींप्रमाणेच मुलांकडूनही तक्रारी प्राप्त होत आहे. पालकांनी आपल्या मुलांशी मोकळा संवाद करणे गरजेचे आहे. वयात आलेल्या मुलीला आईने मैत्रीण बनून गोष्टी समजवण्याची खरी गरज आहे. – सुधा काबरा, प्रकल्प प्रमुख, बाॅक्स आॅफ हेल्प
या भेडसावताय समस्या
लैंगिक बदल समस्या, एकमेकांविषयी आकर्षण, गुड टच- बॅड टच, रिलेशनशिपबाबत गैरसमज.