मनाेहर घाेणे | नाशिकएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
दरराेज ७०० बसच्या माध्यमातून सरासरी १० हजार प्रवाशांची रेलचेल असलेल्या ठक्कर बाजार बस स्थानकात (सीबीएस) पाेलिस चाैकी आहे. पाेलिसांच्या या दुर्लक्षाचा फायदा घेत स्थानकात राेजच भुरट्या चाेरांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. गुरूवारी (दि. १९) एकाच बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांसह राेकड चाेरी गेली.
त्यामुळे येथील पाेलिस चाैकीबाबत तपास केला असता केवळ पाेलिस चाैकी आवडत नसल्याने येथे पाेलिसच फिरकत नसल्याचे अजब कारण वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनीच दिले. ठक्कर बाजार बसस्थानकातील प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी स्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळाने पाेलिस चाैकीसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे.
या चाैकीत तत्कालीन पाेलिस आयुक्त जगन्नाथन यांच्या कार्यकाळात २४ तास पाेलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली हाेती. पाेलिसांच्या उपस्थितीमुळे स्थानक परिसरात भुरट्या चाेरांना प्रवेश करता येत नव्हता. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही पाेलिस चाैकी बंदच आहे. याचाच फायदा घेत स्थानक परिसरात भुरट्या चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केली जात आहेत. बस मार्गस्थ झाल्यानंतर काही प्रवाशांच्या लक्षात चाेरी झाल्याची बाब लक्षात येते. त्यामुळे पाेलिसांत तक्रार दाखल हाेत नाहीत. एखादी माेठी घटना घडल्यानंतर बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी पाेलिस ठाण्यात फाेन केल्यानंतर पाेलिसांचे आगमन हाेते.
जागा व्यवस्थित नाही
ठक्करबाजार बसस्थानकातपाेलिसचाैकीसाठीदिलेली जागा याेग्य नाही. त्यामुळे तेथे कर्मचारी थांबत नाहीत. मात्र पेट्राेलिंग सुरू असते. आम्ही विभाग नियंत्रकांकडे २५० स्केअर फुटाची पाेलिस चाैकी मिळावी यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. – साजन साेनवणे, वरिष्ठ निरीक्षक, सरकारवाडा पाेलिस स्टेशन
गुरुवारी पाच महिलांचे मंगळसूत्र लंपास
गुरूवारी दुपारी कल्याण-रावेर (एमएच ४० एन ९१६२ ) या बसमधून प्रवास करणाऱ्या पाच ते सहा महिला प्रवाशांच्या मंगळसूत्रासह राेख रक्कम लंपास झाली. बस आडगावनाका परिसरात पाेहाेचल्यानंतर तिकीट काढताना पैसे व दागिने नसल्याचे कळले. चालकाने आडगावनाका पाेलिस चाैकीत बसमधील प्रवाशांना नेले. तेथेही महिलांनी एकच रडारड केेली. पाेलिसांनी चाेरी झालेल्या महिलांची नावे लिहून घेतली. पुढील कारवाईसाठी त्यांना पंचवटी पाेलिस ठाण्यात पाठवण्यात आले.