दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह: समृद्धीवर गाडी बंद पडल्यास हेल्पलाइनवर टोइंग व्हेइकल मिळेल; मात्र भाडे द्यावे लागेल


नामदेव खेडकर | औरंगाबादएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर त्यावर वाहतूक सुरू झाली असली तरी या महामार्गावर सुसाट धावणाऱ्या वाहनांसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात म्हणून अजून किमान वर्षभर वाट पाहावी लागेल, असेच सध्याचे चित्र आहे.

Advertisement

सध्या या महामार्गावर एखादे वाहन अचानक बंद पडले तर एमएसआरडीसीने दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधून टोइंग व्हेइकल वाहनधारकास मागवता येईल. मात्र, हा टोइंगचा खर्च वाहनधारकासच भरावा लागेल. या मार्गावर महागडा टोल भरूनही सध्या ही सेवा मोफत मिळणार नाही. इंधन संपल्यावर इंधन संबंधित वाहनापर्यंत आणून देणे, टायर पंक्चर झाल्यास पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीला संबंधित ठिकाणापर्यंत पोहोचवण्याची सोय करून देण्यासाठी क्यूआरव्ही (क्विक रिस्पॉन्स व्हेइकल) सक्रिय आहेत. रोडसाइड अॅमिनिटीजसाठी मात्र अजून वर्षभर वाट पाहावी लागणार आहे.

समृद्धी महामार्गावर आता वाहने सुसाट धावत आहेत. वाहनांची संख्याही वाढत चालली आहे. मात्र,या महामार्गालगत सध्या हॉटेल किंवा इतर सेवा देणारे काहीच दिसत नाही. सोयी-सुविधांअभावी महामार्ग उजाड दिसत आहे. टायर पंक्चर काढण्यापासून साधी चहा-पाण्याचीसुद्धा सोय नाही. अशात अपघाताविनाही चालती गाडी बंद पडली तर काय, असा प्रश्न अनेक वाहनधारकांना भेडसावत आहे.

Advertisement

वाहन बंद पडल्यास हे करा
महामार्गावर अचानक वाहन बंद पडल्यास सध्या 1800 233 2233 आणि 8181818155 या दोन हेल्पलाइनवर वाहनधारकास संपर्क साधता येईल. ही हेल्पलाइन २४ तास सुरू आहे. वाहन सुरू होत नसेल तर ते टोइंगने न्यावे लागेल. ही सेवा खासगी असल्याने खर्च सध्या वाहनधारकांना द्यावा लागेल. वास्तविक क्यूआरव्हीच्या माध्यमातून एसएसआरडीसीकडून वाहनांना इंधन पुरवणे, पंक्चर झाल्यास संबंधित व्यक्ती पोहोचवणे या सोयी मोफत पुरवल्या जातात, असे एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता रामदास खलसे यांनी सांगितले.

तुम्ही कुठे आहात, हे कसे सांगाल?
1 अचानक महामार्गावर एखादे वाहन बंद पडले किंवा वाहनांचा अपघात झाल्यास मदतीसाठी दोन्हीपैकी कोणत्याही हेल्पलाइनवर संपर्क करून माहिती द्यावी लागेल.
2 यावर नेमके काय घडले ते सांगून लोकेशन सांगा. प्रत्येक २०० मीटरवर चेनेज क्रमांकाचे बोर्ड आहेत. ते चेनेज क्रमांक सांगा.
3 चेनेजची पाटी तुम्ही आहात त्या ठिकाणावरून दिसत नसेल तर मोबाइल लोकेशन ऑन करा. क्यूआरव्ही तुमचे लोकेशन ट्रॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचेल.

Advertisement

जेवण, चहा, नाष्टा, गॅरेज, प्रसाधनगृहे यांसाठी एक वर्ष प्रतीक्षा
एमएसआरडीसीने समृद्धीलगत प्रत्येक २५ किमीवर रोडसाइड अॅमिनिटीजसाठी गायरान जागा अधिग्रहित केल्या आहेत. जिथे गायरान नाही तिथे खासगी जागा खरेदी केल्या आहेत. या ठिकाणी वाहनचालक व प्रवाशांच्या सुविधांसाठी कॉम्प्लेक्स उभारले जाईल. यात प्रसाधनगृहे, फूड मॉल, हॉटेल्स, पंक्चरचे दुकान, वाहन दुरुस्ती गॅरेज, इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी चार्जिंग स्टेशन्स असतील. मात्र, शिर्डी ते मुंबई टप्पा सुरू होईपर्यंत त्या मिळणार नाहीत. सध्या हा प्रकल्प निविदा स्तरावर आहे. साधारण एक वर्ष लागेल.

महामार्गाचा पहिला टप्पा सुरू झाल्यावर वाहनांची संख्या आता वाढली असून शुक्रवारपर्यंत मार्गावर रोज सरासरी १५ हजार वाहने धावत आहेत. तर, ८५ ते ९० लाख रुपये टोल संकलन होत आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement