अकोला36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
गांधी मार्गापासून ते टॉवर पर्यंत जाणाऱ्या भुयारी मार्गाची वाहतूक शुक्रवारी १७ मार्चला सुरू झाली. या मार्गातील वाहतूक पाणी साचल्याने बंद झाली होती. अशा आशयाचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने गुरुवारी १६ मार्चला अशोक वाटिका चौकात रास्ता रोको आंदोलन केले होते, हे विशेष. जेल चौक ते अकोला क्रिकेट क्लब दरम्यान १६४ कोटी रुपये खर्च करुन उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. मदनलाल धिंग्रा चौक (बसस्थानक) ते टॉवर या दरम्यान उड्डाणपुलाला लॅडिंग देण्यात आले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला. याच दरम्यान जनता भाजी बाजार, दोन बसस्थानक, स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा आणि शासकीय विश्रामगृह आहे.
यामुळे या मार्गावर पादचारी, दुचाकी वाहन धारकांची मोठी गर्दी होते. अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवू नये, यासाठी गांधी रोड (निशांत टॉवर) ते जनता भाजी बाजार या दरम्यान एकेरी भुयारी मार्ग बांधण्यात आला. हा मार्ग एकेरी असला तरी वाहतूक मात्र दुहेरी होते. या भुयारी मार्गात परिसरातील पाणी झिरपते. हे झिरपलेले पाणी खड्ड्यात संकलीत करुन पंपाने बाहेर काढले जाते. हा पंप भुरट्या चोरांनी लंपास केला. त्यामुळे पाणी उपसण्याचे काम बंद झाले होते. याकडे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने दुर्लक्ष केले.
एकीकडे म्ूर्तिजापूरकडे पुलावरुन जाणारी वाहतूक बंद असताना भुयारी मार्ग बंद झाल्याने ‘दिव्य मराठी’ने याबाबत वृत्त प्रकाशित करुन याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेने (उद्धव ठाकरे) गुरुवारी आंदोलन केले. अखेर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने नवीन पंप बसवून साचलेल्या पाण्याचा उपसा केल्याने भुयारी मार्गातील वाहतूक सुरू झाली. पंपाला सुरक्षा नाही : भुयारी मार्गात पाणी उपसण्यासाठी लावलेला पंप चोरीस गेला. यापूर्वीही पंप चोरीस गेल्याची घटना घडली होती.