आयपीएलमध्ये गेल्या सामन्यात झालेल्या नो-बॉल वादानंतर आज गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. दिल्लीची लढत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होत आहे. दोन्ही संघाचा गेल्या काही सामन्यात पराभव झाल्याने विजयाचा मार्गावर परतण्यास उत्सुक असतील. दिल्लीचा गेल्या सामन्यात राजस्थानने १५ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात नो-बॉल देण्यावरून वाद झाला आणि त्याप्रकरणी दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग गेल्या सामन्यात आयसोलेशनमध्ये होते. आता ते पुन्हा संघात परतले आहेत. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीचा संघ पुन्हा विजयाच्या मार्गावर परतण्यास उत्सुक असेल. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीकडे फार कमी सामने शिल्लक आहेत. दिल्लीच्या गोलंदाजांनी गेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. जोस बटलरकडून झालेली धुलाई मात्र त्यांना विसरावी लागले. खलील अहमद सुरुवातीपासून विकेट घेतो आणि त्याला मुस्तफिजुर रहमानची चांगली साथ मिळते. कुलदीप यादवने मिळालेल्या संधीचा फायदा घेतलाय. अक्षर पटेल आणि ललित यादव हे देखील दमदार कामगिरी करत आहेत. या तिघांनी मिळून आतापर्यंत २० विकेट घेतल्या आहेत, त्यामुळेच त्यांची १२ षटके महत्त्वाची असतील.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्ससमोर अंतिम ११ निवडण्याचे आवाहन असेल. अय्यरसह सर्व फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. सलामीवीर सॅम बिलिंग्स आणि सुनील नरेन या जोडीला अपयश आले होते. पुन्हा हीच जोडी मैदानात आली तर त्यांना आक्रमक सुरुवात करुन द्यावी लागले.
दिल्लीच्या फलंदाजीचा विचार केल्यास डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि रोवमॅन पॉवेल सारख्या खेळाडूंमुळे फलंदाजी मजबूत आहे. वॉर्नरने सलग ३ अर्धशतक केली होती. पण त्यानंतर तो मोठी धावसंख्या करू शकला नाही. पृथ्वी देखील चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. दिल्लीकडून सरफराज खान तिसऱ्या क्रमांकावर येतो पण तो अपयशी ठरलाय. आता आजच्या लढतीत दिल्ली त्यावर पुन्हा विश्वास दाखवते का हे पहावे लागले. पंतसह ऑलराउंडर लिलत यादव, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांना महत्त्वाची भूमीका पार पाडावी लागले. पंत एकट्याच्या जोरावर सामना जिंकून देऊ शकोत. पण अद्याप त्याला तशी कामगिरी करून दाखवता आलेली नाही.
संभाव्य संघ-
दिल्ली कॅपिटल्स– पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, सरफराज खान, ऋषभ पंत, रोवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद.
कोलकाता नाईट रायडर्स– वेंकटेश अय्यर, सुनील नरेन, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, टिम साऊदी, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.