दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने आवेश खानला स्टार बनवण्याचा पाळला शब्द

दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने आवेश खानला स्टार बनवण्याचा पाळला शब्द
दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉटिंगने आवेश खानला स्टार बनवण्याचा पाळला शब्द

मागील दोन वर्षापासून आयपीएलच्या रणांगणात एक नाव‌ सातत्याने चमकतेय ते नाव म्हणजे आवेश खान. २०२१ चा पूर्ण सीजन आणि आता २०२२ सिझनमध्येही टीम इंडियाचे भविष्य असलेल्या आवेशने आपल्या चांगली गोलंदाजी केली. सुरुवातीलाच सनरायझर्सविरूद्ध त्याने अशी काय गोलंदाजी केली की, एकवेळ सनरायझर्सच्या खिशात असणारी मॅच त्याने झटक्यात लखनऊच्या पारड्यात टाकली. वर्षभरात आयपीएल गाजवून टीम इंडियापर्यंत प्रवास करणाऱ्या आवेशच्या या छोट्याशा पण कौतुक करण्यासारख्या प्रवासाबद्दल नक्कीच माहिती करून घ्यायला हवं.

आवेशचा जन्म इंदोरचा. वडीलांची हायवेच्या कडेला पान टपरी. त्याचे वडीलही क्रिकेटप्रेमी होते. पण परिस्थितीमुळे त्यांना क्रिकेटमध्ये कारकीर्द करता आली नाही. वडिलांप्रमाणे आवेशही क्रिकेटचाच भक्त. आवेश उत्तम क्रिकेटपटू बनू शकतो ही खुबी सर्वप्रथम ओळखली त्याच्या काकांनी. दहा वर्षाचा आवेश टेनिस बॉलने तुफान स्पीड काढत असताना त्यांनी पाहिला. त्यांनी त्याला लेदर बॉलने गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. कोल्ट्स क्रिकेट क्लबमधून लेदर बॉल क्रिकेटची सुरुवात करणाऱ्या आवेशने भराभर यशाच्या शिड्या चढायला सुरुवात केली.

Advertisement

त्याचवेळी त्याला समजले की मध्यप्रदेशचा अंडर सिक्सटीन संघाच्या ट्रायल्स होणार आहेत. ट्रायल्स घेणारे होते अमेय खुरसिया, माजी इंटरनॅशनल क्रिकेटर. त्या कॅम्पमध्ये ५०० जणांमधून सिलेक्ट होणारा एकमेव खेळाडू होता आवेश खान. खुरसिया यांना आवेशने आपल्या वेगाने प्रभावित केले होते. काही गोष्टी आवेशच्या बाजुने घडल्या नसल्या तरी नियतीने त्याच्यासाठी दुसरी संधी तयार ठेवलेली. ती म्हणजे २०१६ चा अंडर नाईन्टीन वर्ल्डकप. या वर्ल्डकपला यंग इंडिया फायनलपर्यंत गेली. या प्रवासात दोन खऱ्या अर्थाने फास्टर बॉलर म्हणता येईल अशा खलिल अहमद आणि आवेश खान यांचा सिंहाचा वाटा होता. वर्ल्डकप गाजवल्यानंतर आयपीएलचे द्वार त्याच्यासाठी उघडले. आधी आरसीबी आणि नंतर दिल्ली डेअरडेविल्सने त्याला संधी दिली. मोजक्या संधीमध्ये मात्र तो प्रभाव पाडू शकला नाही.

डोमेस्टिक क्रिकेटमध्ये निरंतर कामगिरीचे बक्षीस त्याला मिळाले २०२१ ला. पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर विश्वास दाखवला. यावेळी मेंटर म्हणून होता ऑसी दिग्गज रिकी पॉंटिंग. पॉंटिंगने त्याला सिझनच्या आधीच तुला पूर्ण संधी मिळणार असा शब्द दिलेला. कोणी इतका विश्वास टाकतोय म्हणल्यावर आवेशला त्या विश्वासाला पात्र ठरणे गरजेचे होते. कगिसो रबाडा अन् एन्रिक नॉर्किए या जातिवंत फास्ट बॉलरच्या जोडीला मिळून आवेशने दिल्लीची पेभ तिकडी बनवली. रबाडा आणि नॉर्किएसारखे धुरंदर साथीला असतानाही आवेशने स्वतःची क्षमता दाखवून दिली.

Advertisement

नियमितपणे १४५ च्या स्पीडने गोलंदाजी फास्ट बॉलरला हवी तशी उंची आणि ताकद असलेल्या आवेशने २०२१ आयपीएल खऱ्या अर्थाने आपली करून घेतली. हर्षल पटेलने या सिझनला ३२ विकेट घेत पर्पल कॅप पटकावली. पण संघर्ष करून इथपर्यंत पोहोचलेल्या आवेशने २४ विकेट घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिभेचे रूपांतर परफॉर्मन्समध्ये केले. त्याच्या या २४ विकेटमध्ये अनेक दर्जेदार बॅटर्सचा समावेश होता, एमएस धोनी, विराट कोहली, ओएन मॉर्गन, जोस बटलर यांना त्याने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली.

आयपीएल २०२१ च्या अव्वल नंबरी कामगिरीनंतर मेगा ऑक्शनमध्ये संघ त्याच्या मागे धावले नसते तर नवलच. तब्बल १० कोटींची बोली लावत नवख्या लखनऊ सुपरजायंट्सने त्याला आपल्या गोलंदाजी आक्रमणाची जान बनवले. पहिल्या दोन मॅचमध्ये त्याने आपली जबाबदारी निभावली. पण तिसरा मॅचला पुन्हा एकदा आपला दर्जा दाखवत सनरायझर्सला पराभवाच्या खाईत लोटले. टॅलेंटेड अनकॅप्डपासून टीम इंडियाचा गोलंदाज बनलेला आवेश खऱ्या अर्थाने रफ्तार का सौदागर आहे. त्याची ही रफ्तार तहयात अशीच राहून इंडियन क्रिकेटसाठी आवेशचा आवेश उपयोगी पडावा अशीच सर्वजण अपेक्षा करत असतील.

Advertisement