दिल्लीने आजचा सामना जिंकत प्ले-ऑफचे दार केले किलकिले; पंजाब आणि बंगळूरमध्ये चुरस कायम

दिल्लीने आजचा सामना जिंकत प्ले-ऑफचे दार केले किलकिले; पंजाब आणि बंगळूरमध्ये चुरस कायम
दिल्लीने आजचा सामना जिंकत प्ले-ऑफचे दार केले किलकिले; पंजाब आणि बंगळूरमध्ये चुरस कायम

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएल २०२२चा ६४वा सामना खेळला. मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर झालेला हा सामना उभय संघांसाठी प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. दोन्हीही संघांनी हा महत्त्वपूर्ण सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र दिल्लीने १७ धावांनी या सामन्यात बाजी मारली. हा त्यांचा हंगामातील सातवा विजय होता. दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जचा १७ धावांनी पराभव करत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली. दिल्लीने ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या तगड्या फलंदाजीला १४२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने भेदक मारा करत ४ बळी टिपले. त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. तर अक्षर पटेल, कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. पंजाबकडून जितेश शर्माने एकाकी झुंज देत ४४ धावा केल्या. दिल्लीकडून फलंदाजी करताना मिशेल मार्शने दमदार खेळी करत ६३ धावा केल्या. त्याला सर्फराज खानने आक्रमक ३२ धावा करून चांगली साथ दिली. पंजाबकडून लिव्हिंगस्टो अर्शदीपने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.

दिल्लीची भेदक गोलंदाजी

Advertisement

दिल्लीच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पंजाबकडून यष्टीरक्षक जितेश शर्माने चिवट झुंज दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. तो ३४ चेंडूत ४४ धावा करून बाद झाला. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकारही मारले. तसेच जॉनी बेयरस्टो (२८ धावा), शिखर धवन (१९ धावा) आणि राहुल चाहर (नाबाद २५ धावा) यांनीही थोड्याफार धावा जोडल्या. पंजाबचे ६ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले.

दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ४ षटके फेकताना ३६ धावा देत त्याने या विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. एन्रिच नॉर्कियानेही एका विकेटचे योगदान दिले.

Advertisement

मिचेल मार्शचे झुंजार अर्धशतक

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक धावा केल्या. ४८ चेंडू खेळताना ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने सर्वाधिक ६३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त दिल्लीकडून इतर फलंदाजांना मोठ्या खेळी करता आल्या नाही. सलामीला आलेल्या सरफराज खानने ३२ धावा जोडल्या. तसेच ललित यादव २४ धावा करून बाद झाला. कर्णधार रिषभ पंत या सामन्यात केवळ ७ धावांचे योगदान देऊ शकला.

Advertisement

या डावात पंजाबच्या गोलंदाजांनीही अप्रतिम प्रदर्शन केले. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोन आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. लिविंगस्टोनने ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत दिल्लीच्या ३ फलंदाजांना बाद केले. तर अर्शदीपने ३७ धावा देत ३ विकेट्स काढल्या. तसेच हरप्रीत ब्रारनेही एका फलंदाजाला तंबूत धाडले.

Advertisement