महाड24 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पक्षप्रतोद पद गेले, आता मंत्रिपदच घेऊन येतो असे वक्तव्य शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी महाडमध्ये पक्षाच्या मेळाव्यात बोलताना महाडमध्ये केले आहे. यामुळे गोगावले यांना कुठले मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यामुळे गोगावलेंच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
सत्तासंघर्षावर गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर मागच्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा होणार का ? यात कोणाकोणाची वर्णी लागणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यातील सत्तासंघर्षावर निर्णय होऊ द्या मग मंत्रिमंडळ विस्ताराचे पाहू असे सांगत इच्छूकांना थोपवून धरल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्तासंर्घषावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले. संजय शिरसाट म्हणाले की, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रात सुद्धा शिंदे गटाला 2 मंत्रीपदे मिळणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा करतील. किमान दहा दिवसात विस्ताराबाबत निर्णय होईल. एकूण 20 जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली.
बच्चू कडू यांना मंत्रिपद?
अपक्ष आमदार बच्चू कडू म्हणाले की, 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे मलाही मंत्रिपद मिळणार, असा दावाही बच्चू कडू यांनी केला आहे.
कोणाला मिळणार संधी?
मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील 23 आमदारांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला सहा ते सात आणि सरकारमधील सहयोगी भाजपला 16 ते 17 मंत्रिपदे मिळू शकतात.
भाजपकडून या आमदारांची चर्चा
भाजपकडून आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांची नावे चर्चेत आहेत. माढा लोकसभा मतदार संघ तसेच माळशिरस, माढा, आणि करमाळा या विधानसभेच्या मतदार संघांमध्ये ही नावे पुढे येऊ शकतात.