दसरा विशेष : सोन्याला वैयक्तिक पसंतीचा मुलामामृणाल भगत – [email protected]
लग्न हा भारतीयांसाठी कायमच कळीचा मुद्दा राहिला आहे. आणि लग्न म्हंटल की दागिन्यांची खरेदी आलीच. लॉकडाऊन असो की आणीबाणी नव्या पद्धतीचे दागिने खरेदी करण्याची हौसेला काही तोड नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळातसुद्धा सोन्याच्या दागिन्यांचे नवे ट्रेंड्स आणि त्या पद्धतीचे दागिने बाजारात दाखल झाले आहेत.

Advertisement

 सोन्याचे दागिने म्हटले की पारंपरिक सण, कार्यक्रम, लग्नसमारंभ अशी निमित्तं आठवू लागतात. पण नवी पिढी सोन्याचे दागिने विकत घेताना काही लाखांची गुंतवणूक करून दागिने घ्यायचे, मग ते बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायचे आणि वर्षांतून एखाददुसऱ्या कार्यक्रमाला किंवा सणाला बाहेर काढायचे, हा उद्देश समोर ठेवत नाही. त्यांना सोन्याचे दागिने हे रोजच्या वापरात हवे असतात. आपला पहिला पगार, पहिली बढती अशा काही खास निमित्तांच्या वेळी आवर्जून खरेदी केलेला सोन्याचा दागिने लॉकरमध्ये दडवून ठेवण्यापेक्षा तो रोज मिरवता येईल याकडे त्याचा कल असतो. त्यामुळे त्यांची सोन्याची गुंतवणूक ही त्यांच्या खिशाला साजेशी काही हजारांची असते. त्यात त्याचं रुपडंसुद्धा त्यांच्या दैनंदिन गरजा बघून सजवलेलं असतं. अर्थात म्हणून त्यांना खास पारंपरिक साजातील किंवा आई आजीच्या ठेवणीतील दागिने आवडत नाहीत असं अजिबात नाही. या दागिन्यांना अजूनही पसंती दिली जातेच. त्यात पुरुषांमध्येसुद्धा सोन्याच्या दागिन्यांचं आकर्षण वाढू लागलं आहे. अर्थात मी काही सोन्याचा शर्ट किंवा मान मोडेपर्यंत सोन्याच्या जाडजूड चेन घालणाच्या वेडाबद्दल बोलत नाही आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात हौसेने सोन्याचे दागिने घालणाऱ्या पुरुषांची संख्या आता वाढू लागली आहे.   

सोन्याची पिवळी झळाळी

यंदाच्या सोन्याच्या दागिन्यांमधील महत्त्वाचा ट्रेंण्ड म्हणजे गेले काही वर्ष लालसर, अँटिक पद्धतीच्या दागिन्यांची मागणी आता मागे सरली असून सोन्याच्या पिवळ्याधम्मक लूकला पुन्हा पसंती मिळाली आहे. अगदी भारतातच नाही तर जागतिक स्तरावर डिझायनर्सनी सोनेरी रंगला यंदा चांगलीच पसंती दिली आहे. हा रंग पारंपारिक वेशभूषेमध्ये उठून दिसतोच पण रोजच्या ऑफिसवेअर लुकमध्येही उठून दिसतो. लांब कानातले, पेंडेंट, ब्रेसलेट या स्वरुपातील सोन्याचे दागिने ऑफिसमध्येही सहज वापरता येतात. तसेच या रंगामुळे दागिने वेगवेगळ्या रंगांच्या कपडय़ांसोबत शोभून दिसतात. पिवळ्या सोन्याचे पारंपारिक दागिने हे भारतीयांना काही नवे नाहीत. घराघरामध्ये प्रत्येक पिढीमध्ये असे ठेवणीतील दागिने पहायला मिळतील. पण सोन्याचा पिवळाधम्मक रंग हा मोती, रंगीत खडे, हिरे, सोन्याच्याच पांढरा, गुलाबी, लाल छटा यांच्यासोबत सहजपणे मिसळून जातात. त्यामुळे आधुनिक साजाच्या दागिन्यांमध्येसुद्धा यांचा वापर होऊ लागला आहे. सोन्याच्या या रंगला वेगळे आकार, पोत (टेक्श्चर) यांच्यासोबत केलेल्या प्रयोगामुळे याला नाविन्यपूर्ण चेहरा देण्याचं काम डिझायनर्स करत आहेत. त्यामुळे नव्या पिढीलासुद्धा सोनं हवंहवंसं वाटू लागलं आहे.

Advertisement

दागिन्यांचं व्यक्तिसापेक्ष रूप

सध्याची पिढी सोन्याच्या दागिन्यांना पसंती देते मात्र त्यांची आवड लक्षात घेऊन. नुकतीच नोकरी लागलेली किंवा स्टार्ट अपमध्ये आपलं नशीब अजमावू पाहणारी व्यक्ती सर्रासपणे काही लाखांच्या दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकत नाही आणि त्यासाठी कर्ज वगैरे घेणं त्यांना पटत नाही. अशा वेळी काही हजारांची गुंतवणूक ते सहज करू शकतात. त्यात त्यांची दागिने वापरण्याची संकल्पना म्हणजे ऑफिसला जाताना, मित्रांना भेटताना, छोटय़ामोठय़ा पार्टीजमध्ये सहजपणे घालता येण्याजोगे दागिने असले पाहिजेत. ते वजनाने हलके असले पाहिजेत. साडी ते वन पीस ड्रेसपर्यंत सगळ्या कपडय़ांवर साजेसे दिसले पाहिजे. शक्यतो कानातले डूल आणि हार, बांगडय़ा आणि तोडे अशा जोडगळीऐवजी एकटय़ाने उठून दिसले पाहिजेत.  मुख्य म्हणजे त्यांच्यामध्ये तोचतोचपणा नको. प्रत्येक दागिने हा दुसऱ्यापेक्षा वेगळा दिसला पाहिजे. ही गरज लक्षात घेऊन मग डिझायनर्ससुद्धा या पिढीसाठी खास कलेक्शन्स काढू लागले आहेत. दागिन्यांच वजन हलक करण्यासाठी २२ कॅरेटऐवजी १८ ते १० कॅरेट सोन्यामध्ये दागिने बनविले जातात. त्यामुळे दागिन्यांची किंमतसुद्धा कमी होते. पुरुषामध्ये विशेषत: १० कॅरेटच्या दागिने प्रसिद्ध आहेत. या दागिन्यांचा आकारसुद्धा गरजेनुसार नाजूक स्टडपासून ते लांब इअररिंग्सपर्यंत, वेगवेगळ्या आकाराच्या चेन्स, ब्रेसलेट ते कडा अशा विविध आकारांमध्ये हे दागिने उपलब्ध आहेत.

चाम्र्सची गंमत

या दागिन्यांमध्ये यंदा आवर्जून पाहिली जाणारी बाब म्हणजे त्यांचे बदललेले मोटीफ. पारंपारिक दागिन्यांमध्ये निसर्गातील विविध फुले, फळे, पानांचे आकार, पेझ्ली, भौमितिक आकार, देवदेवतांचे रूप यांचा समावेश असतो. पण सध्याची पिढी या पलीकडे जाऊन मोटीफ निवडते. त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार किंवा रोजच्या आयुष्यात जवळचे वाटतील असे आकार पसंत असतात. मग कोणी लेखनाच्या क्षेत्रातील व्यक्ती शाईच्या पेनाची नीब पेंडेंट म्हणून घालते, तर कोणी आपल्या लाडक्या कुत्र्याचा चेहरा पेंडेंटवर कोरून घेतात. एखादं मोठं डिझायनर किंवा ब्रँडचा लोगो किंवा प्रातिनिधिक चिन्ह, लाडक्या फास्टफूड हॉटेलचा लोगो ते थेट एखाद्या आवडत्या पदार्थाचा आकार, आपल्या आवडत्या व्यक्तीची सही, कार्टून, प्राणी असे विविध प्रकारचे आकार सध्या दागिन्यांमध्ये पाहायला मिळतात. यांना ‘चाम्र्स’ म्हटलं जात. हे चाम्र्स पेंडेंट म्हणून गळ्यात, कानातील डूल किंवा ब्रेसलेटमध्ये अडकवून हातात घातले जातात. कित्येकदा पहिल्यांदा आईवडील झालेले जोडपे अशा स्वरुपात बाळाच्या पायांची किंवा हाताची छबी गळ्यात मिरवायला पसंती देतात. या अशा चाम्र्समध्ये आपलेपणा असतो, एखादी गोष्ट, आठवण दडलेली असते. किंवा कधी कधी फक्त गंमत म्हणूनही असे चार्म तयार केले जातात. त्यामुळे अशा चाम्र्ससाठी थोडी अधिक किंम्मत मोजायची तयारीही तरुणांची असते.

Advertisement

आपलेसेोारंपरिक दागिने

 नव्या पिढीला आधुनिकतेच आकर्षण जितकं असतं तितकच जुन्याचं कुतूहलसुद्धा असत. सोन्याच्या दागिन्यावर नव्या पद्धतीच्या डिझाइन्सचा कितीही आकर्षक मुलामा चढवला असला तरी जुन्या पद्धतीच्या दागिन्यांची हौसही सरलेली नाही. यंदाही खास ठेवणीच्या दागिन्यांची मागणीही तरुणाई आवर्जून करताना दिसत आहे. पारंपारिक टेम्पल ज्वेलरी, फुलांचे डिझाइन्स यांचा पगडा या पारंपरिक दागिन्यांवर पहायला मिळतोय. कित्येकदा तरुणी लग्न किंवा कार्यक्रमामध्ये आई-आजीचे ठेवणीतील दागिने घालताना दिसतात. यात आजीची नथ भलतीच भाव खातेय. हल्ली लग्नकार्यामध्ये विविध प्रांतिक थीम ठेवण्याची पद्धत आहे. मूळ लग्नसोहळा महाराष्ट्रीय पद्धतीने झाला तरी रिसेप्शनला पंजाबी पद्धतीने लेहेंगा, संगीत समारंभाला पाश्चिमात्य गाऊन, हळदीला इंडो-वेस्टर्न लूक अशा विविध थीम्स आयोजित केल्या जातात. मग पेहरावापासून ते दागिन्यांपर्यंत सगळच या थीमनुसार असत. त्यानुसार दागिन्यांची मागणीही असते. ठेवणीतील पैठणीसोबत महाराष्ट्रीय ठुशी, लक्ष्मीहार, तोडे हा साज शोभून दिसतो. पण कांजीवरम नेसल्यास टेम्पल ज्वेलरी हवी. लेहेंगा खास मीनाकारी किंवा कुंदनच्या दागिन्यांसोबत शोभून दिसतो. अशावेळी वेगवेगळ्या स्वरूपाच्या दागिन्यांची मागणीही आजची पिढी करताना दिसते आहे. त्यामुळे सोन्याला कुंदन, मीनाकारी, रंगीत खडे, मोती यांची जोड आवर्जून दिली जाते.

दागिन्यांचे विविध प्रकार

गेल्या काही वर्षांमध्ये कमीतकमी, नेमक्या पण उठून दिसणाऱ्या दागिन्यांची मागणी जोर धरू लागली होती. यंदा मात्र या पद्धतीला छेद देत, तरुणाई दागिन्यांमध्ये लेअरिंग करताना दिसत आहे. यामध्ये गळ्यात एक चोकर किंवा ठुशीसारखा दागिना नंतर वेगवेगळ्या आकाराचे दोन-तीन हार यांची गुंफण केलेली दिसते. हातातसुद्धा एक कडा घालण्याऐवजी वेगवेगळ्या आकारांच्या बांगडय़ा, तोडे यांचं मिश्रण हमखास पहायला मिळत. चोकर हा हाराचा प्रकार सध्या चलतीमध्ये आहे. यामध्ये सोन्यासोबत वेगवेगळ्या मण्यांची गुंफण सुरेखपणे केलेली दिसून येते.  अंगठय़ांचे विविध प्रकार यंदा आवर्जून पहायला मिळतील. मीनाकारी, कुंदन, जडावू पद्धतीच्या अंगठय़ा तरुणाईच्या खास पसंतीच्या आहेत. कानामध्ये छोटय़ा स्टडऐवजी मोठे डूल घालण्याकडे या वर्षी कल आहे. थोडक्यात पेहरावापेक्षा दागिने उठून दिसतील याची काळजी घेतली आहे. याशिवाय लग्नसोहळ्यामध्ये केसांना लावायची माथापट्टी हा अलंकार यंदा भाव खातो आहे.

Advertisement

रोजच्या वापरामध्ये कानातल्याचे विविध प्रकार सोन्याच्या दागिन्यांमध्ये आवर्जून पहायला मिळत आहेत. लांब ड्रोप इअररिंग्स, डूल हे प्रकार यंदा पहायला मिळत आहेत. सोन्याच्या कानातल्यामध्ये मोत्याचा वापर हा फॉर्मल ज्वेलरीचा यंदाचा मोठा ट्रेंण्ड आहे. यासोबत हिऱ्यांचा वापरही झालेला दिसतो. सोन्याच्या पोतसोबत प्रयोग करून वेगळेपणा देण्याचं प्रयोग या दागिन्यांमध्ये दिसतो आहे. गळ्यामध्ये जाडय़ा पण कमी लांबीच्या चेन्स यंदा पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या जिच्या दोन-तीन चेन्स एकत्र घालायचा प्रयोगही यंदा पाहायला मिळतो आहे. ८० च्या दशकातील बोल्ड दागिन्यांचा प्रभाव यंदाच्या सोन्याच्या दागिन्यांवर आवर्जून दिसतोय. डिझायनर्ससुद्धा पारंपारिक डिझाईनसोबत निरनिराळ्या आकारांसोबत प्रयोग करताना दिसत आहेत.

दागिने हा प्रत्येकाच्या विशेषत: महिलावर्गाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार दागिन्यांची निवड करतो. यंदाही हाच ट्रेंण्ड आवर्जून पहायला मिळत आहे. त्यामुळे मनामध्ये कुठलाही किंतु न ठेवता लगेचच खरेदीला लागाच.

Advertisement

The post दसरा विशेष : सोन्याला वैयक्तिक पसंतीचा मुलामा appeared first on Loksatta.Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here