अमरावतीएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील मालमत्ताधारकांंकडून कर वसुली करण्यासाठी १ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासासाठी नगर पालीका प्रशासनाने एकूण १२ प्रभागात प्रत्येकी २ कर्मचारी नियुक्त केले असून ते संबंधीत मालमत्ताधारकाकडील थकीत व चालू कराची वसुली करीत आहेत.
दरम्यान मोठे थकबाकीदार मालमत्ताधारकांवर थेट कारवाईची मोहीम सुरू केली आहे. आता ज्यांंच्याकडे मोठ्या प्रमाणात कराची रक्कम थकीत आहे, त्यांच्या वसुलीकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून ३५० च्यावर मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीसही बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी कालावधीत पालीका प्रशासन आणि थकबाकीदारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे थकीत मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले असून एकच खळबळ उडाली आहे.
कराचा भरणा न करणाऱ्यांवर होईल जप्तीची कारवाई
शहरातील मालमत्ताधारकांकडे एकूण ८ कोटी ३ लाख ६८ हजार ३०३ रुपये कराची रक्कम थकीत आहे. यापैकी १ कोटी ६८ लाख ६६ हजार रुपये वसुली करण्यात आली आहे, तर ६ कोटी ३५ लाख १ हजार ६५० रुपये वसुल करणे बाकी आहे. वसुली मोहिमेंतर्गत मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नोटीसनंतरही कराचा भरणा न करण्यांवर लवकरच जप्तीची कारवाई सुरू करण्याची मोहीब राबविण्यात येणार आहे असे न. प. प्रशासनाकडू सांगण्यात आले आहे.
नागरिकांनी वेळेच्या आत कर भरणा करावा
कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थकीत रक्कम वसुल करण्यात येत आहे. नागरिकांनी जप्तीची अप्रीय कारवाई टाळण्यासाठी आपल्याकडील मालमत्ता कराचा भरणा वेळेच्या आत भरून सहकार्य करावे. कराचा भरणा न केल्यास नियामानुसार संबधिताच्या प्रतिष्ठानाचा लिलाव किंवा सील लावण्याची कारवाई करण्यात येईल. –पराग वानखडे, मुख्याधिकारी, न. प., दर्यापूर
कर वसुलीसाठी पाडून द्यावेत प्रशासनाने टप्पे
नगरपालिका क्षेत्रात नागरिकांना विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक मालमत्ताधारकाने कर भरणेही अपेक्षित आहे. मात्र या ना त्या काराणाने सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कर वसुली करताना टप्पे पाडून दिल्यास कर वसुल होईल आणि होणाऱ्या पुढील ताणतणावाला टाळता येईल. – पप्पू पाटील होले, नागरिक, दर्यापूर