अमरावती6 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
मोमीनपुरा निवासी अब्दुल राजिक अब्दुल खालीक उर्फ राजीक पहेलवान याच्या घरी सापडलेल्या शस्त्रसाठ्यातील आरोपींची संख्या नऊवर पोचली आहे. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे दाखल केले असून अटकेतील तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक अवीनाश बारगळ व एसडीपीओ सचींद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिस अधिकारी आणि पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यादरम्यान घर व शटरची झडती घेतली असता 9 तलवारी, 3 फरशा, 1 गुप्ती, 2 चाकू व शस्त्र बनविण्याचे साहित्य जप्त करून पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी उशीरा रात्री 4 पुरुष व 5 महिला अशा नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोमीन पुऱ्यातील एकाच घरातून अवैध शस्त्रसाठा आढळून आल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. कारवाई दरम्यान आरोपी अब्दुल राजिक अब्दुल खालिक, मोहम्मद साजिद अब्दुल राजीक, उमर फैजान शेख हुसेन यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. रविवारी दुपारी तिन्ही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची (25 जानेवारी पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष ताले करीत आहे.
…ते पोलिस तपासात पुढे येईल
दर्यापूर ठाणेदार संतोष ताले म्हणाले की, कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेली शस्त्रे कोणासाठी, कशासाठी व कधीपासून बाळगण्यात येत होती, हे आमच्या पुढील सखोल तपासात समोर येईल. गुन्ह्यातील फरार पुरुष आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणात 5 महिलांना सहआरोपी करण्यात आले आहे. यापुढेही धडक कारवाईंचे सत्र सुरूच राहणार आहे.