दखल : समग्र समर्थ..महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे.  या संत परंपरेत रामदासस्वामी यांचे स्थान फार वेगळे आहे. राजकारण, समाजकारण यांचा उत्तम मेळ साधत तत्कालीन समाजाला अधिक क्रियाशीलतेचे धडे देण्याचे महत्कार्य रामदासस्वामींनी आपल्या लेखनातून केले.. जे आजही समाजाला मार्गदर्शक ठरते आहे. रामदासस्वामींचे हे विचारधन एकाच पुस्तकात वाचण्याची पर्वणी वाचकांना मिळाली आहे ती ‘समग्र समर्थ साहित्य’ या डॉ. मधुकर रामदास जोशी संकलित आणि संपादित पुस्तकात! या ग्रंथाची नवी आवृत्ती अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. मनाचे श्लोक, देवीची व हनुमंताची स्तोत्रे, समर्थाची पत्ररचना, स्फुट ओव्या व ओव्या शतके, भूपाळ्या व आरत्या, अष्टाक्षरी श्लोक व समर्थाची श्लोकरचना, पदरचना, लोकसाहित्य, हिंदी रचना, रामदासस्वामींच्या अवतारकाळातील काही प्रमुख घटना, रामदासी मठांची सूची असा एकूण भरगच्च ऐवज या ग्रथात आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची या ग्रंथाला लाभलेली अर्पणपत्रिका म्हणजे समर्थाच्या साहित्यावरील अभ्यासपूर्ण विवेचन होय. या अपर्णपत्रिकेतून रामदासस्वामींच्या लेखनाचे अनेक पैलू उलगडले जातात. पुस्तकाचे संकलन आणि संपादन करणारे डॉ. मधुकर जोशी यांची प्रस्तावना वाचली तरी या ग्रंथासाठी त्यांना किती कष्ट उपसावे लागले याची जाणीव तर होतेच; शिवाय एखादा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी लागणारी संशोधक वृत्ती आणि झपाटलेपण म्हणजे काय, हेही ठळकपणे जाणवते.

Advertisement

या ग्रंथातील जास्त कुतूहलाचा विषय म्हणजे रामदासांच्या हिंदी रचना. या रचनांची संख्याही जास्त आहे. या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ग्रंथाच्या शेवटी समाविष्ट करण्यात आलेल्या परिशिष्टांमध्ये या ग्रंथातील ओव्या अकारानुक्रमे देण्यात आलेल्या आहेत. रामदासांच्या समग्र साहित्याचा आस्वाद एकाच ग्रंथातून घ्यायचा असेल तर त्याकरता हे पुस्तक उत्तम ठरावे!

‘समग्र समर्थ साहित्य’, संकलन व संपादन- डॉ. मधुकर रामदास जोशी, सुमंगल प्रकाशन,  पाने-१२६१,  किंमत- २००० रुपये.  ६

Advertisement

ज्ञानेश्वरीचा शब्दकोश

भगवद्गीतेवरील भाष्य असलेल्या ज्ञानदेवांच्या ‘ज्ञानेश्वरी’चे गारुड आजही जनमानसात कायम आहे. इतकेच नव्हे तर ते उत्तरोत्तर वाढत आहे. एकूण अठरा अध्याय असलेल्या या ग्रंथातील रसाळ भाषा, वैविध्यपूर्ण रूपकं यांची भूल वाचकाच्या मनाला अजूनही पडते. ज्ञानेश्वरी ज्या काळात लिहिली गेली, त्या काळात ती सामान्यजनांसाठी सुबोध भाषेतच होती. परंतु कालानुरूप मराठी भाषा बदलत गेली आणि अलीकडच्या सर्वसामान्य लोकांना ज्ञानेश्वरीतील भाषा दुबरेध वाटू लागली. त्यातल्या काही शब्दांचे अर्थ त्यांना कळेनासे झाले. वाचकांना ज्ञानेश्वरीचा रसास्वाद घ्यायचा असतो, परंतु त्यातील भावार्थ समजून घेण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरीतील भाषेबद्दल असलेले अज्ञान हा मुख्य अडथळा ठरतो. यावरचा उतारा म्हणून त्यातील शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी  ‘ज्ञानेश्वरीचे शब्द-भांडार’ हा रामचंद्र नारायण वेलिंगकर लिखित कोश उत्तम मार्गदर्शक ठरू शकेल. या कोशाची नवी आवृत्ती सुमंगल प्रकाशनाने अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. न. र. फाटक यांनी या कोशाला ‘कोशरचनेचा आदर्श’ म्हटले आहे आणि ‘या कोशाद्वारे मराठीच्या कोश-भांडारात  बहुमोल भर टाकणारा कोश’ असे त्याचे कौतुक केले आहे. त्यावरून या कोशाची महत्ता अधोरेखित होते. रूढार्थाने हा ज्ञानेश्वरीशी संबंधित शब्दकोश असला तरीही त्यातून ज्ञानेश्वरांच्या भाषिक सौंदर्याची, त्यांच्या सर्जनप्रतिभेची झलक अनुभवायला मिळते. त्यामुळे केवळ ज्ञानेश्वरीतील शब्दांचा अर्थ सांगण्यापुरताच हा कोश मर्यादित राहत नाही, तर ज्ञानेश्वरीतील रूपकं, त्यातल्या भाषेतील लालित्य, त्यातून डोकावणारं ज्ञानेश्वरांचं प्रेमळ मन, भाषेतील प्रगल्भता ठायी ठायी जाणवते. काही ठिकाणी केवळ शब्दांचा अर्थ देऊन न थांबता त्या रूपकामागील संदर्भही या कोशात देण्यात आले  आहेत. या वैशिष्टय़ांमुळे या कोशाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Advertisement

‘ज्ञानेश्वरी’ हा निव्वळ वाचण्याचा ग्रंथ नसून, तो  एका विलक्षण अनुभूतीचा सुंदर आविष्कार आहे. तो अधिक प्रगल्भपणे अनुभवायचा असेल तर हा कोश त्याकामी साहाय्यभूत ठरेल.

‘ज्ञानेश्वरीचे शब्द-भांडार’- रामचंद्र नारायण वेलिंगकर, सुमंगल प्रकाशन, पाने- ७३२ ,

Advertisement

किंमत- ५०० रुपये.  ६

The post दखल : समग्र समर्थ.. appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement