दखल : खडतर व्रतस्था‘सत्यभामा’ ही डॉ. श्रीनिवास आठल्ये यांची बाळ गंगाधर टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्यावर लिहिलेली कादंबरी होय. टिळकांसारख्या महान व्यक्तीची सहधर्मचारिणी ही भूमिका बजावणं तितकं सोपं नाही, पण सत्यभामाबाईंनी ती समर्थपणे पेलली. टिळकांचे राजकारण-समाजकारण, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणं, त्यांचा तुरुंगवास..  अशा अनेक गोष्टींना तोंड देत आपला संसार यशस्वीपणे सांभाळण्याचं शिवधनुष्य सत्यभामाबाईंनी लीलया पेललं. सत्यभामाबाईंचे बालपण, टिळकांची पत्नी, मुलांची आई या भूमिका बजावताना सत्यभामाबाईंना कोणत्या परिस्थितीस सामोरे जावे लागले याचा प्रत्यय  या कादंबरीतून येतो. टिळकांच्या देशकार्यात त्यांना घराकडे फारसे लक्ष देणे शक्य नसे. अशा वेळी सत्यभामाबाईंनीच घराची,  मुलांची जबाबदारी सांभाळली. टिळकांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांतून सत्यभामाबाईंचे जीवन उलगडत जाते. तापी ते सत्यभामा हा खडतर प्रवास नेमकेपणाने या कादंबरीतून मांडला आहे. या कादंबरीतून आपले जीवन देशकार्याला वाहिलेल्या पतीच्या पाठीशी शांतपणे आणि खंबीरपणे उभी राहणारी कणखर पत्नी- सत्यभामा या कादंबरीतून ठळकपणे जाणवते.

Advertisement

सत्यभामा’-  डॉ. श्रीनिवास आठल्ये, प्रकाशक-  टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पाने-१६६, किंमत-२५० रुपये.  

इंद्रियांची सुबोध गोष्ट

Advertisement

‘देहनगरीची अद्भुत सफर’ हे डॉ. वृंदा चापेकर यांचे पुस्तक म्हणजे आपल्या शरीराची सोप्या भाषेत करून दिलेली ओळख. आपण आपल्या शरीराची ओळख करून घेण्यास फारसे उत्सुक नसतो. एखाद्या विशिष्ट अवयवाचा आजार उत्पन्न झाला की त्याची थोडीफार माहिती मिळवण्याची धडपड करतो. नाहीतर आपल्या शरीरातील कुठल्या अवयवाची उपयुक्तता काय आहे, त्याची रचना कशी असते याविषयी जाणून घेणे अनेकांना फारसे महत्त्वाचे वाटत नाही. अर्थात त्याला शरीराची शास्त्रोक्त माहिती देणारी अति जटिल भाषा हेही कारण आहे. परंतु हे पुस्तक याला अपवाद आहे. सहज, सोप्या आणि विशेष म्हणजे लालित्यपूर्ण भाषेत आपल्याला शरीरातील अवयवांची माहिती मिळते. 

आपल्या शरीराची अद्भुत आणि विस्मयकारी रचनेची ओळख अगदी सोप्या भाषेत वाचकाला करून देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे.  विशेष म्हणजे ही माहिती शास्त्रोक्त असली तरी भाषेत रूक्षता नाही. जणू काही तो अवयव आपली लालित्यपूर्ण भाषेत ओळख करून देत आहे असाच प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. त्यामुळे अगदी बालवाचकही हे पुस्तक आवडीने वाचतील यात शंका नाही. या शास्त्रोक्त माहितीला उत्तम चित्रांची जोड- तीही रंगीत- मिळाल्याने तो तो अवयव समजून घेण्यात सोपा होतो.

Advertisement

‘देहनगरीची अद्भुत सफर’- डॉ. वृंदा चापेकर, मनोविकास प्रकाशन, पाने- १३६, किंमत- ३५० रुपये

The post दखल : खडतर व्रतस्था appeared first on Loksatta.

AdvertisementSource link

Advertisement