‘सांजफुले’ हा तुकाराम पुंडलिक खिल्लारे यांचा मराठीतला पहिला तांकासंग्रह असल्याचं ते सांगतात. हायकूसारखाच काहीसा हा काव्यप्रकार आहे. पहिल्या तीन ओळी हायकूसारख्या ५-७-५ अशा आहेत आणि पुढे ७-७ वर्णाच्या दोन ओळी जोडायच्या. हायकूच्या मानाने तांकालेखन सोपे आहे. तांका प्रकारात केवळ काव्यगुण जपायला हवेत. बाकी तांकाला तसे कोणतेही नियम नाहीत.
‘कविता गाणे
अवचित पुढय़ात
कुणाचे येणे
शब्दांच्या साच्यातले
गोड कोरीव लेणे’
अशा अलवार क्षणाला कवी अलवारपणे शब्दांत गुंफतो. तर कधी-
‘पीक खुडून
चिपाटी उरलेली
शेत भयाण
ढणढणती आग
गेले उलून रान’
ही दाहकताही शब्दबद्ध करतो.
‘वाट पाहून
थकून गेले डोळे
अजाण भोळे
उत्कंठा क्षणोक्षणी
कष्टप्रद सोहळे’
ही मनोवस्था कवी अचूक पकडतो. तर-
‘सोस सोस हे
नको रडू बाई तू
बदले ऋतू
उजाडेल खचित
नको धरूस किंतू’
असा आशेचा किरणही या कवितांमधून दिसतो. मानवी भावभावना अचूकपणे कवीने शब्दांत उतरवल्या आहेत. तांका काव्यप्रकारात शब्दबद्ध केलेल्या या कविता एक वेगळाच आनंद देतात.
‘सांजफुले’- तुकाराम पुंडलिक खिल्लारे, अनुदिन प्रकाशन, पाने- १३६, किंमत- १६० रुपये.