थांग वर्तनाचा! : संस्कृती जनुकं निवडते तेव्हा..अंजली चिपलकट्टी
समजा, तुम्ही चार बातम्या ऐकल्यात.. १. अमुक एका देशातल्या दोन मुलींनी या वर्षीची गणित ऑलिम्पियाड स्पर्धेची सुवर्ण आणि रौप्य पदकं जिंकली. २. अमुक एका विद्यापीठातल्या तीन शास्त्रज्ञांना या वर्षीचे विज्ञानातले नोबेल प्राइझ मिळाले. ३. जीन्स घातली म्हणून घरातल्या वडीलधाऱ्या पुरुषांनी मुलीला जीव जाईपर्यंत मारलं. ४. कोणी दोन दर्यावर्दी जगातल्या सर्वाधिक (११ कि. मी.) खोल समुद्रातील दरीत बुडी मारून आले. यापैकी कोणती बातमी ऐकल्यावर कोणते देश तुमच्या डोळ्यासमोर आले? पहिली आणि तिसरी घटना विरोधाभासी आहेत खऱ्या; पण भारतात अलीकडेच त्या घडल्या आहेत. दुसरी आणि चौथी मात्र भारतात घडणं अवघड आहे. का बरं? अशा घटना घडून यायला त्या- त्या देशातलं सांस्कृतिक पर्यावरण कारणीभूत असतं हे आता आपल्याला माहीत आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक पर्यावरणांत मेंदूची जडणघडण कशी वेगळी होते हे ‘समूहवादी/ व्यक्तिवादी संस्कृती’च्या निमित्तानं आपण पाहिलं. पण ‘संस्कृती’ चक्क जनुकांची निवड करते असं कोणी सांगितलं तर..? मानवानं शिकलेली तंत्रं, कौशल्यं, माहिती, विचाराची नवी पद्धत याला ढोबळपणे ‘संस्कृती’ म्हटलं तर माणसाच्या मोठय़ा इतिहासात (Big History) याचे अनेक पुरावे सापडतात.

Advertisement

जंगलांना लागणाऱ्या आगीचा परिचय माणसाला असला तरी त्यानं आग ‘पाळायला’ सुरुवात केली ती अंदाजे तीन ते पाच लाख वर्षांपूर्वी! त्यानंतरही अन्न शिजवण्यासाठी आगीचा उपयोग करायचं त्याला खूपच अलीकडे- म्हणजे एक-दीड लाख वर्षांपूर्वी सुचलं. कच्चं अन्न (मांस, कंद वगैरे) खायला एक तर खूप वेळ चावायला लागतं. शिवाय ते पचवून त्यातून ऊर्जा मिळण्यासाठी आतडय़ांना भरपूरच श्रम पडतात. तेव्हा गरजेनुसार आग वापरून, अन्न शिजवून खायला लागल्यावर वेळ वाचला. अधिक महत्त्वाचं म्हणजे शिजलेल्या अन्नातून आता आधीपेक्षा जास्त पोषण आणि ऊर्जा मिळू लागली. त्यातून पचनसंस्था बदलली. आतडी छोटी झाली. दात, जबडय़ाचा आकार बदलला. इतर कोणत्याच ‘प्रायमेट’च्या शरीरात हे बदल झालेले नाहीत. शिजवलेल्या अन्नामुळे पचनासाठी पूर्वी लागणारी ऊर्जा वाचली. वाचलेली ऊर्जा आणि वेळ दोन्हीचा उपयोग तो अजून चांगली अवजारं किंवा मुसाफिरी करायला वापरू शकला. फावल्या वेळात अधिक शिकायला वाव मिळाला. मेंदूत अधिक माहिती साठवू शकणारे जास्त यशस्वी (प्रजनन!) झाले. मेंदूचा आकार वाढत गेला. ‘आगीचं तंत्र विकसित होणं’ या सांस्कृतिक टप्प्याचा थेट परिणाम आपलं शरीर आणि ते बनवणाऱ्या जनुकांवर झाला!

पण मेंदूच्या वाढत्या आकाराला मर्यादा आली, कारण जन्म देताना स्त्रीच्या अरुंद जननमार्गातून मोठय़ा आकाराचा मेंदू असलेलं बाळ बाहेर कसं पडणार? म्हणून मग मेंदूची पूर्ण वाढ व्हायच्या आतच प्रसूती होऊन बाहेर आलेली जी बाळं (आणि त्यांच्या आया) जगली आणि मेंदू पक्का होईपर्यंत ज्यांना संगोपन मिळालं, त्यांची जनुकं पुढच्या पिढीत गेली. थोडक्यात, वाढत्या सांस्कृतिक ज्ञानाला (मेंदूला) ज्या शरीरांनी आपलंस केलं ते टिकले.

Advertisement

आगीशी मैत्री झाल्यावर आणखी एक मोठा जनुकीय बदल स्थिरावला. धुरातून बाहेर पडणारे अनेक विषारी वायू ज्यांना झेपले नाहीत ते दगावले. पण ज्या माणसांत AHR या जनुकांच्या प्रति थोडय़ा ‘चुकल्या’ होत्या त्यांना हे विषारी प्रदूषण पचवणं शक्य झालं. (आत्ताही चुलीचा धूर सहन होणारे किंवा चेन-स्मोकर असूनही नव्वदी गाठणाऱ्या लोकांत या जनुकांच्या बदललेल्या प्रति असतात असं दिसून आलंय.)  मुद्दा हा की, ‘आगीशी मैत्री’ या सांस्कृतिक बदलानंतर जे पर्यावरण बदललं त्यानं माणसाच्या जैविक उत्क्रांतीचा मार्ग बदलला.

यातली अगदी ताजी घडामोड म्हणजे ‘मोठे’पणी दूध पचवण्याची क्षमता. इतर प्राण्यांसारखंच माणसातही लॅक्टोज पचवण्याचा जनुकीय ‘स्विच’ वयाच्या पहिल्या दोन वर्षांनंतर बंद होतो. पण काही माणसांत जनुकीय बदलामुळे तो स्विच बंद होत नाही, ते मोठेपणीही दूध पचवू शकतात. गाई-म्हशी, शेळ्या, उंट वगैरे प्राणी पाळायला १५ हजार वर्षांपूर्वी सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षांनी हा जनुकीय बदल युरोप, सहारा आणि आखाती प्रदेशांत झाला याचे पुरावे मिळतात. प्राणी पाळताना मिळणाऱ्या दुधातून जे जादाचे प्रोटिन्स मिळाले ते पचवू शकल्यानं काहींना ‘यश’ मिळालं असावं! गंमत म्हणजे भारतासकट बहुतेक आशियाई देशांत गाई-म्हशीचं दूध पचवण्याची क्षमता फक्त २०-२५% लोकांत आहे, तर युरोपात ती ८०-९०% आहे! (भारतात मुलांना दूध पाजण्याचं पालक किती अवडंबर करतात! आपली मुलं दुधाला नाकं मुरडतात ते नैसर्गिकच असावं.) प्राणी पाळण्याचं तंत्र सापडल्यावर त्याला अनुसरून माणसात जनुकीय बदल कसे झाले याचा हा अजून एक पुरावा. जनुकीय बदलांमुळे वर्तन/ संस्कृती बदलणं याच्या हे बरोबर ‘उलटं’ आहे हे लक्षात येतंय ना?

Advertisement

अजून एक महत्त्वाचा पुरावा म्हणजे वाचण्याची/ लिहिण्याची क्षमता. वाचन शिकलेल्या/ करणाऱ्या माणसांच्या मेंदूत लक्षणीय बदल होतात. मेंदूचा ‘कॉर्पस-कॉलोझियम’ हा भाग अधिक जाड होतो. हा भाग मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांना जोडतो. शिवाय काही चिन्हं (अक्षरं, शब्द) ओळखण्याची डाव्या मेंदूची क्षमता कैकपटीनं वाढते.

आता यापुढचं उदाहरण मात्र डोळे उघडणारं (ज्यांची मनं उघडी आहेत त्यांच्यासाठी!) असू शकतं. आपलं आवडतं संप्रेरक डोपामाईन हा या गोष्टीचा हिरो आहे. कोणत्याही संप्रेरकाला (एन्झाईम) मेंदूत सक्रिय होण्यासाठी न्युरॉनजवळच्या खास त्याच्यासाठी बनवलेल्या खुर्चीत (receptor) बसावं लागतं. तर डोपामाईनची जी खुर्ची (DRD4) आहे, त्याच्या जनुकात पिढय़ानपिढ्या अनेक बदल होत वेगवेगळ्या माणसांत वेगवेगळ्या प्रकारच्या खुच्र्या तयार झाल्या.. 2R, 4R, 5R, 7R. यातल्या 4R मध्ये डोपामाईन नीट बसू शकतं, त्यामुळं त्याचा अपेक्षित परिणाम (आनंदाची भावना तयार होण्याचा) नीट होतो. मात्र, 7R च्या खुर्चीत डोपामाईन नीट बसू शकत नाही. म्हणजेच एखादी कृती केल्यानं 4R असणाऱ्या माणसांना जेवढा आनंद होईल तेवढा आनंद 7R असणाऱ्यांना होत नाही. मग त्याच पातळीचा आनंद मिळवण्यासाठी त्याला अजून काही नवीन कृती करावी लागते.

Advertisement

त्यामुळं 7R खुर्ची असलेल्या माणसांत काही खास वैशिष्टय़ं तयार झाली. आनंद शोधण्याच्या नादात ती माणसं सतत काहीतरी नवीन शोधणारी, खुडबुड करणारी, उद्योगी झाली असावी असा संशोधकांचा अंदाज आहे. धोके पत्करूनही आनंद मिळवायला धडपडणं, थरारक अनुभव घेणं ही यांची अजून एक खासियत. तर 7R चं प्रमाण युरोपिअन लोकांत २३%, तर पूर्व आशियाई माणसांत १-२% आहे. संशोधकांचं असं म्हणणं आहे की, हे प्रमाण सर्व माणसांत सुरुवातीला- आफ्रिकेतून बाहेर पडताना (७० हजार वर्षांपूर्वी)- सारखंच होतं. पण काही सांस्कृतिक पर्यावरणांत 7R या जनुकाची ‘निवड’ झाली, तर काहींत हे जनुक असलेली माणसं यशस्वी ठरली नाहीत. ते कसं?

आफ्रिकेतून बाहेर पडल्यावर हे मानव वेगवेगळ्या प्रदेशांत पसरले. काही जमाती आशियात पसरल्या. काही मलेशिया, इंडोनेशिया बेटांच्या माळेतून ऑस्ट्रेलियापर्यंत (४५ हजार वर्षांपूर्वी) धडकल्या. काही युरोपात उत्तरेकडे जात राहिले. तिथून पुढे जात अलास्कावाटे उत्तर अमेरिकेत (१५ हजार वर्षांपूर्वी) आणि नवीन भूमी पादाक्रांत करत पुढे दक्षिण अमेरिकेत पोहोचले. स्थलांतराच्या या वाटांपैकी अलास्कापर्यंत पोहोचून तिथून अमेरिकेत पोहोचणाऱ्या वाटा तशा साहसी आहेत. या जमातींना खूप थंड, प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. ज्यांची मानसिकता अशा संकटांना तोंड देत पुढे जाण्याची होती ते चिवटपणे टिकून राहिले. ज्या जमाती आशियातल्या अनुकूल पर्यावरणामुळे तिथेच स्थिरावल्या, भातशेतीत रमल्या, त्यांना तुलनेने कमी संकटं व साहसांना तोंड द्यावं लागलं. भातशेतीत समूहाला महत्त्व जास्त. शिवाय ठरावीक दिनचर्येमुळं जगण्यात नावीन्य तसं कमीच. अशा जीवनमानात व्यक्तिगत आनंद मिळवण्यासाठी काही आव्हानं शोधणाऱ्या, नावीन्याची ओढ असणाऱ्या माणसांची मुस्कटदाबीच झाली असणार. समूहापेक्षा ‘हटके’ काही करण्याची, अनोखे प्रदेश ‘एक्सप्लोर’ करण्याची त्यांची हौस न भागल्यानं कमी आनंदी राहणाऱ्या या माणसांना कदाचित जोडीदार मिळायलाही कठीण गेलं असेल. यातून त्यांची संख्या रोडावत गेली असणार असा अंदाज आहे. म्हणजेच सांस्कृतिक मूल्यांमुळे 4R सारखी जनुकं आशियात निवडली गेली आणि 7फ कमी होत गेली. याउलट, युरोपातल्या मानवसमूहांना आशियाच्या तुलनेत जास्त प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. शिवाय गव्हाची शेती करणाऱ्या समूहांत व्यक्तिवादामुळे वेगळे धुमारे फुटले. अनेक लोक धाडसी दर्यावर्दी बनले- हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. भारतात मात्र समुद्र ओलांडणं पाखंडी मानलं गेलं! असंही लक्षात आलं की, तरुण मुलांच्या बंडखोर आणि मुक्त वागण्याच्या वृत्तीला समूहवादी संस्कृतीपेक्षा व्यक्तिवादी संस्कृती अधिक चांगलं हाताळते. त्यामुळे तरुणांच्या वेडसर ऊर्जेतून नवीन काही घडण्याच्या शक्यता युरोपात जास्त तयार झाल्या असाव्यात.

Advertisement

याचा अर्थ 4R वाले लोक नवोन्मेषी, विजिगीषु नसतात असं अजिबात नाही. किंवा कुठेही ‘हे चांगलं, ते वाईट’ असं म्हणण्याचाही प्रश्न नाही. जनुकांच्या कमजोरीवर मात करण्याच्या माणसाच्या सामूहिक बुद्धीच्या जोरावरच आपण इथवर पोहोचलोय. हा अभ्यास आपल्याला सांगतो की, ‘संस्कृती’ जनुकांची निवड करते; आणि तीसुद्धा आधीच्या तुलनेत खूप वेगानं! त्यातून आपल्याला फायद्याची असलेली जनुकंही आपल्याकडून हरवू शकतात. म्हणूनच सांस्कृतिक कौशल्यं आणि कल्पितांचा जो मोठा साठा (स्वातंत्र्य, धर्म, जात, रूढी, श्रद्धा, माणुसकी, पैसा, समता, सत्ता, लोकशाही, हुकूमशाही, उतरंड, सर्वशक्तिमान नियंता, विवेक, सूड, विज्ञानातील सिद्धांत वगैरे.) आपल्याकडे जमलाय, त्यातली कोणती सांस्कृतिक कल्पितं निवडायची हे मात्र आपल्या हातात आहे.. जे सजगतेनं करायला हवं.

अजून एक महत्त्वाचं संशोधन असंही सांगतं की, या 7R चा आणि ADHD चा (अटेन्शन डेफिसिट हायपर-अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) जवळचा संबंध आहे. ‘सतत नवीन काहीतरी पाहिजे’ अशी गरज असणाऱ्या मुलांना एका खोलीत कोंडून बळेच काही शिकवण्यासाठी ‘त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, नाहीतर या मुलांमध्ये ‘प्रॉब्लेम’ आहे!’ असा शिक्का तर आपण मारत नाही ना, याबाबत संशोधन चालू आहे. ADHD होण्याची इतरही कारणं असू शकतील. पण पुरेसं संशोधन बाहेर येईपर्यंत अशा लवकर ‘बोअर’ होण्याऱ्या मुलांकडे ‘मानसिक आजारी’ म्हणून बघण्यापेक्षा तज्ज्ञांच्या सल्ल्यानं नावीन्याच्या त्यांच्या गरजा भागतील अशी आव्हानं, संधी त्यांना उपलब्ध करून देऊन त्यांना वाचवणं आवश्यक आहे.

Advertisement

अजूनही काही जणांना वाचवलं पाहिजे. बेफाट ऊर्जा घेऊन वेगळं काही करू बघणाऱ्या तरुणाईला, चुळबुळ्या मुलांना, वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांत प्रावीण्य दाखवून वेगळी वाट चोखाळणाऱ्या, सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या माणसांना, धर्म आणि जातीपलीकडे प्रेम करणाऱ्यांना, पर्यावरण वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्यांना, प्रवाहाविरुद्ध पोहत गरिबांच्या, आदिवासींच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि धोका पत्करून सामाजिक प्रश्नांना, सत्याला जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या ‘व्हिसल-ब्लोअर्स’ जपलं पाहिजे. अशा सांस्कृतिक मूल्यांची निवड करणं निश्चितच आपल्या हातात आहे.

[email protected]

Advertisement

The post थांग वर्तनाचा! : संस्कृती जनुकं निवडते तेव्हा.. appeared first on Loksatta.Source link

Advertisement