थांग वर्तनाचा! :संस्कृती आपण संस्कृतीअंजली चिपलकट्टी
समजा, तुम्ही तुमच्या मित्र/ मैत्रिणीबरोबर कारमधून फिरायला गेलाय. तुमचा मित्र रंगात येऊन जरा जोरात गाडी चालवतोय, तुम्ही समज देऊनही त्याच्या बेदरकार गाडी चालवण्यात काहीच फरक पडत नाहीए. आणि ज्याची भीती वाटत होती तेच घडतं- गाडी कोण्या नागरिकाला धडकून तो मरण पावलाय. मित्राच्या वकिलानं वेळीच सावध होऊन जाणून घेतलंय की तुम्ही सोडून या अपघाताला इतर कोणी साक्षीदार नाही. आता तो तुम्हाला ‘थोडंसं’ खोटं बोलायला सांगतोय की, कशी त्या नागरिकाचीच चूक होती, मित्राची नाही. बाकी सर्व तो सांभाळून घेणार आहे. विचार करा, तुम्ही काय कराल? (उदा- मित्राला शिक्षा झाल्यानं मेलेला माणूस काय परत येणारे का किंवा अजून काही..)

Advertisement

तर हे उत्तर संस्कृतीनुसार बदलेल असं तुम्हाला वाटतं का? यासाठी माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे काही टप्पे समजून घेतले तर मदत होईल.

बोधात्मक क्रांतीपासून सांस्कृतिक उत्क्रांतीला सुरुवात झाली असली तरी त्याचं खरं श्रेय एकेकटय़ा माणसाच्या बुद्धिमत्तेत नसून, माणसानं अवगत केलेल्या समूहाच्या एकत्रित बुद्धिमत्तेला आहे. समूहात प्रत्येकाला असणाऱ्या ‘ज्ञाना’तील  विविधता आणि त्यांचं एकत्रीकरण, सुधारणा यामुळेच माणसाची उत्क्रांती घडली. त्यामुळं सांस्कृतिक उत्क्रांतीला खऱ्या अर्थानं गती मिळाली- साधारण १२-१५ हजार वर्षांपूर्वी माणसांनी प्राणी आणि वनस्पती पाळायला (शेती!) सुरुवात केली आणि बैठं, स्थिर जीवनमान स्वीकारलं तेव्हा. दुसरा टप्पा म्हणजे कल्पितं, संकेत, श्रद्धा, पंथ यातून सामूहिक ‘धर्म’ मानण्याची सुरुवात कधीतरी ५-६ हजार वर्षांपूर्वी झाली असावी तो. तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे अवघ्या पाच-दोनशे वर्षांपूर्वी वैज्ञानिक-औद्योगिक क्रांती झाली आणि वर्तमानात आपण माहिती/ माध्यमांचा उद्रेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातले बदल जगतो आहोत. या प्रत्येक टप्प्यांवर ‘संस्कृती’ने रूपं पालटली. काही संस्कृतींचे प्रवाह वाहते राहिले तर काहींचे चिवटपणे साचत राहिले.

Advertisement

वेगवेगळे मानवी समूह एकमेकांच्या संपर्कात नसतानाही त्यांच्यात एकाच काळात निर्माण झालेल्या काही रीती/ प्रथा पाहिल्या तर मानवी सांस्कृतिक उत्क्रांतीची थोडीशी झलक पाहायला मिळेल. हसणं-रडणं या कृतींच्या मागे असलेली भावना, मृत्यूनंतरच्या आयुष्याविषयी असलेले कुतूहल, शरीर सजवणं, संगीत नृत्य यांचं आयुष्यातलं स्थान, विनोद करणं, खोटं बोलण्याच्या निरनिराळ्या तऱ्हा, भाषांचे व्याकरण, अवजारं- हत्यारं बनवणं, विशिष्ट प्रकारचे लैंगिक संबंध निषिद्ध मानणं, कर्मकांडाच्या, नमस्काराच्या पद्धती या सर्वात एक अभूतपूर्व साम्य दिसतं. पण आपल्याला इथे रस आहे तो वेगवेगळ्या संस्कृतीतले फरक समजून घेण्यात- विशेषत: असे फरक ज्यामुळे मानवाची प्रगती/ अधोगती झाली असू शकते.

काही संस्कृती भौगोलिक, पर्यावरणीय कारणांनी तर काही सांस्कृतिक धारणा आणि कौशल्य काळाच्या ओघात बदलू न शकल्यानं नष्ट झाल्या, मागे पडल्या. उदा-  इंका, माया, ईस्टर-आयलंड, रवांडा, सिंधू संस्कृती. उंच मनोऱ्यात राहणाऱ्या मायन राजे-लोकांनी आपल्या पर्यावरणाचा इतका ऱ्हास केला की त्यात ते खुद्द धारातीर्थी पडले. तसंच उदाहरण ईस्टर-आयलंडचं- या लोकांना मोठे पुतळे उभे करायचा इतका सोस की त्यात त्या बेटावरची सर्व मोठी झाडं त्यांनी कापून टाकली! तर आपली ‘सांस्कृतिक बुद्धिमत्ता’ वाढवण्यासाठी कोणती सांस्कृतिक मूल्यं ‘सुयोग्य’ आहेत याचा अभ्यास उपयोगाचा ठरू शकतो असं वैज्ञानिक म्हणतात.

Advertisement

एकंदर असं दिसतं की, युरेशिअन समाज इतर समाजांच्या तुलनेत अधिक आर्थिक- सांस्कृतिक सुबत्ता असणारा झाला. वैज्ञानिकांच्या मते, त्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी दोन- १. या प्रदेशात प्राणी आणि वनस्पतींच्या पाळता येऊ शकतील अशा अनेक जीवजाती माणसाला सापडल्या. २. हा भूभाग अखंड पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आडवा पसरलेला असल्यानं, एका प्रदेशात तयार झालेली माहिती- कौशल्य-तंत्र-वस्तू जमिनीवरून लांबच्या समूहात प्रसारित होणं सहज घडत गेलं. प्रदेशात तयार झालेली माहिती-कौशल्य-तंत्र-वस्तू जमिनीवरून लांबच्या समूहात प्रसारित होणं सहज घडत गेलं. आपल्याला परिचित असलेला ‘सिल्क-रूट’ हा असाच आडवा पसरलेला होता. प्राणी पाळणाऱ्या, प्रवास करणाऱ्या समूहांमध्ये आपोआप सूक्ष्मजीवांचा संसर्ग होत, त्याचा प्रतिकार करण्याची क्षमताही तयार झाल्यामुळे हे समूह मोठे होत फळफळले. अन्न-शिकार गोळा करणारे भटके, मग पशुपालन करणारे, नंतर हळूहळू  शेती करणारे अशा सांस्कृतिक स्थित्यंतराच्या काळात विविध समूह एकत्र येत श्रेणी तयार झाल्या. समाज बैठे आणि नागर होऊन नवीन तंत्रं विकसित झाली, पण विषमता मात्र वाढत गेली. आपण भटके जीवन जगत होतो तेव्हा माणूस जास्त सुखी होता आणि आपली संस्कृती जास्त लोकशाहीवादी (egalitarian) होती, याबाबत बऱ्याच संशोधकांचं एकमत आहे. १२ हजार वर्षांपूर्वी शेती करू लागल्यानंतर मात्र जी ‘साठवणुकी’ची संस्कृती विकसित झाली त्यात आपल्या आजच्या अनेक समस्यांची मुळं आहेत असं मानलं जातं. (तूर्त तरी हे नक्की की आपण १२ हजार वर्ष मागे जाऊ शकत नाही!)

कधी काळी एकत्र सुरुवात झालेल्या युरोपीय आणि आशियाई लोकांत सध्या मात्र काही आर्थिक-सांस्कृतिक फरक ठळकपणे  दिसतात. ते कसे?

Advertisement

अगदी ढोबळपणे मानवी संस्कृतींची समूहवादी संस्कृती आणि व्यक्तिवादी संस्कृती अशी विभागणी अभ्यासकांनी केली आहे. त्यातून काही महत्त्वाचे धागे हाती लागतात. समूहवादी संस्कृतीतील माणसं समुदायाला धरून राहणारी, परस्परांवर अवलंबून असणारी, व्यक्तीपेक्षा समुदायाच्या यश-गरजांना जास्त महत्त्व देणारी असतात. त्यांच्यात नातेसंबंध, गोतावळा याला जास्त महत्त्व असतं. ही माणसं मोठय़ांचा आदर, दरारा सहन करणारी, सहकारावर जास्त भर असणारी, नीतिनियम- रूढींना स्वत:पेक्षाही अधिक महत्त्व देणारी, लोक काय म्हणतील याच्या दबावाखाली वावरणारी असतात; यांच्या स्पर्धावृत्तीमधे स्वत:च्या प्रगतीपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेला जास्त प्राधान्य असतं.

याउलट व्यक्तिवादी समूह हे स्वातंत्र्य, स्वायतत्ता, व्यक्तीचे हक्क-गरजा, व्यक्तीच्या विकासातून समुदायाचा विकास असं मानणारे असतात. शक्यतो स्वकेंद्रित वर्तुळात रमणारे, परंपरागत नीतिनियमांपेक्षा स्वत:ला काय हवंय याला महत्त्व देणारे, स्वार्थाच्या आड येणाऱ्या सामाजिक नीतिनियमांना आव्हान देणारे असतात. ही माणसं दर्जा वाढविण्यासाठी स्पर्धा करत स्वत:ला पुढे नेणारी असतात.

Advertisement

एक महत्त्वाचा फरक म्हणजे समूहवादी संस्कृतीत माणसं जास्त साकल्यानं (होलिस्टिक) विचार करतात. कोणत्याही घटनेला परिस्थिती, समाजव्यवस्था कारणीभूत असते असं मानतात; पण त्यामुळं व्यक्तिगत जबाबदारी घेणं टाळतात. व्यक्तिवादी संस्कृतीत माणसं परिस्थितीला आपणच जबाबदार असतो असं मानणारी, त्यामुळं स्वत:ला जास्त श्रेय आणि जबाबदारीही घेणारी, एकटय़ाने वेगळा मार्ग चोखाळणारी असतात. पारंपरिक रूढींपेक्षा स्वत: तयार केलेल्या ‘सिस्टीम्स’वर विश्वास असणारी असतात. तडजोडी करत, आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला हवं अशी शिकवण समूहवादी संस्कृतीत लहानपणापासूनच मिळत राहते. याउलट गरजेप्रमाणे परिस्थिती बदलता येते असं व्यक्तिवादी संस्कृती मानते.

याला पुष्टी देणारे पुरावे मेंदू अभ्यासकांनी केलेल्या ब्रेनस्कॅनमध्ये नीट मिळतात. व्यक्तिवादी संस्कृतीत माणसं स्वत:च्या फोटोकडे बघून, आपण दुसऱ्यांना कसं प्रभावित केलं हे सांगताना उत्तेजित (डोपामाईन) होतात. या उलट समूहवादी संस्कृतीतल्या लोकांना स्वत:बद्दल बोलायला ताण येतो. जास्त ‘एक्सप्रेसिव्ह’ माणसं शो-ऑफ करतात असं त्यांना वाटतं. याचा अर्थ अत्यंत वेगवान असे हे मेंदूचे रिफ्लेक्सेस संस्कृतीनुसार बदलतात! संस्कृतीतून पाझरणाऱ्या वृत्ती लहानपणापासूनच मेंदूत बाणल्या जातात.

Advertisement

ढोबळपणे बहुतांश युरोपीय-पाश्चिमात्य लोकांत व्यक्तिवादी संस्कृती दिसते, तर पूर्वआशियाई लोक हे समूहवादी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. याचा अर्थ सरसकट सर्व पूर्व-आशियाई लोकांची वृत्ती अशीच असेल असं नाही. कारण सामुदायिक जीवनपद्धती जिथे आक्रसली आहे तिथे शहरात / परदेशात राहणाऱ्या लोकांत- अर्थातच वृत्तीत फरक पडतो. त्यामुळं हे निष्कर्ष सरासरीनुसार आहेत हे लक्षात घेऊ. अशा वृत्ती संस्कृतीनुसार का विकसित झाल्या असाव्यात याला भौगोलिक- पर्यावरणीय कारणं आहेत. (धार्मिक आणि जनुकीय फरक अशीही कारणं आहेत, ते पुढे येईलच.)

बहुतांश पूर्व-आशियाई लोक राहतात तिथे ऋतूनुसार बदलणारं विशिष्ट हवामान, पावसाचं प्रमाण हे भातशेतीसाठी अनुकूल आहे. भातशेती एकाटय़ा-दुकटय़ाने करता येत नाही; त्याला लागणारे प्रचंड श्रम हे सामूहिक पद्धतीनेच मिळवता येतात. अजूनही भात शेती करत असलेल्या गावांत लोक आळीपाळीने एकमेकांच्या शेतात जाऊन काम करतात. भारतात आजही जी शेतीची पारंपरिक पद्धत वापरतात त्यात खूप बदल झालेला नाही. चांगु या चीनमधल्या प्रदेशात तर भातशेतीच्या सिंचनाची पद्धत दोन हजार वर्षे जुनी आहे. याउलट युरोपात प्रामुख्यानं गहू पिकवला जात असे. त्यासाठी समूहाशी बांधून राहण्याची तितकी गरज राहत नाही. याविषयी टॅलहम नावाच्या संशोधकानं दक्षिण-चीनमधल्या भातशेती आणि उत्तर-चीनमधल्या गव्हाची शेती करणाऱ्या लोकांचा अभ्यास केला. तिथे केलेल्या अनेक प्रयोगांतून असं लक्षात आलं की, भातशेती करणाऱ्या लोकांमध्ये ठळकपणे समूहवादी संस्कृतीतील वृत्ती दिसतात, तर गहूशेती करणाऱ्या लोकांत व्यक्तिवादी संस्कृतीतील वृत्ती दिसतात.

Advertisement

भौगोलिक कारणांमुळे जशा वृत्ती घडत गेल्या त्यानुसार त्या-त्या संस्कृतीतील संस्था विकसित झाल्या. उदा- युरोपात संशोधन संस्था, मोठी विद्यापीठं, स्वायत्त बाजार, कंपन्या वगैरे संस्था जशा उदयाला आल्या तशाच वसाहतवाद,  गुलामगिरीसारख्या क्रूर प्रथासुद्धा सुरू झाल्या. हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तूर्त भारतापुरतं बोलायचं तर समूहवादी संस्कृतीतील वृत्ती रूढी-परंपरा-जात-धर्म या रूपांत समाजाला गुदमरून टाकतील इतक्या बोकांडी बसल्यात. सामाजिक प्रतिष्ठा स्वत:च्या मुलांचा जीव घेऊन जपली जाते. आज्ञापालनाला इतकं महत्त्व आहे की, भारताला कोणी हुकूमशहाच सुधारू शकतो अशी अनेकांची धारणा आहे! प्रश्न विचारणाऱ्या मुलांना ‘उद्धट’ समजलं जातं. अनुपालन मुलांमध्ये लहानपणापासून इतकं भिनवलं जातं की जाचक रूढींना आव्हान देण्याचं त्यांच्या मनातही येत नाही. अशी मुलं उपलब्ध ज्ञानाला आव्हान देत नवीन संशोधन, ज्ञान कसं निर्माण करणार? मूळ समूहवादी वृत्ती आणि नंतर पश्चिमेकडून आलेली व्यक्तिवादी वृत्ती यांची एक अगम्य सरमिसळ आपल्याकडे झालेली दिसते. गंमत म्हणजे, समूहवादी वृत्ती असूनही समाज साकल्यानं विचार करून आपले प्रश्न सोडवतो आहे असं चित्र मात्र दिसत नाही. बरेच भारतीय हे सार्वजनिकरीत्या समूहाला, सामाजिक प्रतिष्ठेला, नात्यांना महत्त्व देणारे असतात. मात्र आतून स्वार्थी, नात्यांना कावलेले, शक्य तिथे सिस्टिम्स न पाळणारे आणि सामाजिक नियम नात्यांसाठी वाकवणारे, नातेगिरी (nepotism) करणारे असे विरोधाभासी वर्तन करणारे दिसतात. या विस्कळीत वृत्ती आणि आकांक्षांचा फायदा घेत हजारो-लाखो माणसांना आपल्या नियंत्रणाखाली ठेवण्याची एक मोठीच ताकद त्या त्या समुदायाच्या नेत्यांना मिळते याचा अनुभव आपल्याला आहे.

जैविक उत्क्रांतीत प्रजनन म्हणजे यश असलं तरी सांस्कृतिक उत्क्रांतीत मात्र जगणं दर्जेदार असणं हेही यश आहे. जैविक उत्क्रांतीमधील माणसाची वैशिष्टय़ं घडायला भौगोलिक- नैसर्गिक पर्यावरण कारणीभूत ठरलं खरं, पण आता मात्र सांस्कृतिक पर्यावरण माणसाच्या वर्तनाला नैसर्गिक पर्यावरणापेक्षा जास्त प्रभावित करत आहे. स्वत:च तयार केलेल्या संस्कृतीत स्वत:च्याच ‘निवडीचे’ दान घेणारा माणूस हा एकमेव प्राणी आहे. आपल्या वर्तनावर प्रभाव टाकणारे हे घटक समजावून घेऊन सांस्कृतिक कात टाकत जे समूह संस्कृतीला प्रवाही ठेवताहेत ते प्रगत होतील असं इतिहास सांगतो.

Advertisement

तर मग आता तुम्ही मित्राबाबत कोणता निर्णय घ्याल? नातं टिकवण्यासाठी मित्राला वाचवण्याचा की मित्रापेक्षा व्यवस्था महत्त्वाची आहे असं मानून जे सत्य घडलं ते सांगण्याचा? की इतर आणखी काही?

[email protected]

Advertisement

The post थांग वर्तनाचा! :संस्कृती आपण संस्कृती appeared first on Loksatta.Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here