अमरावती5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यात अस्तित्व असलेल्या ७६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांची पोटनिवडणूक येत्या काळात होऊ घातली आहे. त्यासाठी या ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादीही घोषित झाली असून येत्या काळात या गावांसाठीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाद्वारे घोषित होऊ शकतो.
या ७६ ग्रामपंचायतींमधील १०२ प्रभागांच्या ११५ जागा रिक्त आहेत. याशिवाय दोन गावचे सरपंच पदही रिक्त आहे. या सर्व रिक्त जागा सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी रिक्त ठेवता येत नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीची प्रभाग रचना, त्यातील आरक्षण व मतदार यादी अंतिम करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. त्यासाठीचे रितसर वेळापत्रकही आखून देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी अंतीम मतदार यादीची घोषणा केली आहे.
सर्वाधिक १४ ग्रामपंचायती चिखलदरा व धारणी तालुक्यातील आहेत. चिखलदरा येथे २६ तर धारणीत २० रिक्त जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. त्याखालोखाल १२ ग्रामपंचायती दर्यापुर तालुक्यातील असून तेथील रिक्त जागांची संख्या २२ आहे. भातकुली व मोर्शी तालुक्यातील प्रत्येकी ६ ग्रामपंचायतींच्या अनुक्रमे ६ व ८ जागांसाठी तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींच्या ५ आणि वरुड तालुक्यातील ४ ग्रामपंचायतींच्या ७ जागांसाठी निवडणूक होत आहे. याशिवाय अमरावती, चांदूर बाजार व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक घेतली जाईल.
दहा महिन्यांपासून सतत निवडणुका
जिल्ह्यात एका-पाठोपाठ एक निवडणूक होत असल्याने गेल्या दहा महिन्यापासून अनेकांना वेगवेगळ्या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. शहरी स्तरावर विधानपरिषद, विद्यापीठ सिनेट आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेसह डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेची खूप चर्चा झाली. तत्पूर्वी ग्रामीण भागात २५६ ग्रामपंचायतींचा बार उडाला. त्या पाठोपाठ विविध गावांमध्ये सेवा सहकारी सोसायटी व खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी नागरिकांना मतदान करावे लागले. न्यायालयीन वाद संपुष्टात आल्यास निकट भविष्यात नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाही होऊ शकतात.
१९ ग्रामपंचायतींची यादी २५ एप्रिलला
सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र असलेल्या १९ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी येत्या २५ एप्रिलला जाहीर केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गुगल अर्थद्वारे गावचे नकाशे तयार करण्यात आले. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे पाहणी करुन प्रभाग रचना तयार करुन ती २१ फेब्रुवारीपर्यंत एसडीओ यांच्याकडे सादर केली. आता एसडीओंच्या स्तरावर त्या प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागविल्या जात आहेत. दरम्यान सुनावणीअंती नागरिकांचे शंका-समाधान झाल्यानंतर १७ एप्रिलला ती यादी एसडीओंमार्फत निवडणूक आयोगास पाठविली जाईल आणि अखेर आयोगाच्या मान्यनेनंतर २५ एप्रिलला जिल्हाधिकारी ती अंतिमत: प्रकाशित करतील.