प्रतिनिधी | तुळजापूर9 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
देवदर्शनावरून परतणाऱ्या भाविकांच्या भरधाव कारचे टायर फुटून अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन बालकांसह तीन महिलांचा समावेश आहे. त्यांना धाराशिव येथे हलवण्यात आले आहे. हा अपघात रविवारी (दि.१४) सायंकाळी धाराशिव ते सोलापूर बाह्यवळण रस्त्यावर मोतिझरा स्मशानभूमीजवळ घडला.
हिंगणगाव (ता. कवठेमहाकाळ, जि. सांगली) येथील कुंभार कुटुंबीय त्यांच्या कारने (एमएच ४५ केडी – ९१९५) देवदर्शनासाठी निघाले होते. सकाळी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन दुपारी तेर येथील गोरोबाकाकांचे दर्शन घेतले. धाराशिव येथून गावी परतताना धाराशिव ते सोलापूर बाह्यवळण रस्त्यावर मोतिझरा स्मशानभूमीजवळ त्यांच्या भरधाव कारचे पुढील टायर फुटले. यामुळे कार उलटून रोडलगतच्या खड्ड्यात पडली. त्यात वसंत महादेव कुंभार (७०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नितीन कुंभार, सौदागर कुंभार, रूपाली कुंभार, मनिषा कुंभार, लक्ष्मी कुंभार, अवया कुंभार व शालमली कुंभार जखमी झाले. सर्व जखमींना धाराशिव येथे उपचारासाठी पाठवले आहे. अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने काढण्यासह जखमींना रुग्णालयात हलवण्यात सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले यांनी मदत केली.
टायर फुटून उलटलेली कार महामार्गलगतच्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यात जाऊन पडली. यामुळे सर्वजण कारमध्ये अडकून पडले. कार खोल खड्ड्यात पडल्याने महामार्गावर अपघाताचा कुणालाच अंदाज येत नव्हता. अखेर कारमधील जखमींपैकी एकाने मोबाइलवरून नातेवाईकांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. नातेवाईकांनी तुळजापूरचे सामाजिक कार्यकर्ते राहुल भोसले यांच्याशी संपर्क साधल्यानंतरच अपघाताची माहिती समजली.