औरंगाबादएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
खुलताबाद तालुक्यातील तलाववाडी येथील शिवकालीन डमडम तलावामुळे बाधित होणार्या क्षेत्राची मोजणी उप अधीक्षक, भूमी अभिलेख, खुलताबाद यांच्या कार्यालयाकडून एका महिन्याच्या आत सर्वेक्षण करून बाधित शेतकर्यांना तीन महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल अशी घोषणा आज (दि.15) राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत केली.
आमदार सतीश चव्हाण यांनी 5 फेब्रुवारी 2023 रोजी डमडम तलावास भेट देऊन तलावातील पाण्यामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या होत्या. तसेच बाधित शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे शेतकर्यांना आश्वस्त केले होते.
त्यानुसार आज सतीश चव्हाण यांनी विधान परिषदेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. 133 एकरावरील हा तलाव अतिपावसामुळे पूर्ण क्षमतेने भरल्यास तलावाचे पाणी आजूबाजूच्या शेतकर्यांच्या शेतात साचते. त्यामुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बाधित जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी सदरील शेतकरी मागील 10 वर्षांपासून शासन दरबारी पाठपूरावा करीत असल्याचे सतीश चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे शासनाने तलावातील बाधित शेतकर्यांच्या जमिनीचे त्वरित भूसंपादन करावे, व याचा निर्णय आजच जाहीर करावा अशी आग्रही मागणी सभागृहात केली.
मुख्यमंत्री यांच्यावतीने सतीश चव्हाण यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सदर तलावामुळे बाधित होणार्या क्षेत्राची मोजणी उप अधीक्षक, भूमी अभिलेख, खुलताबाद यांच्या कार्यालयाकडून एका महिन्याच्या आत सर्वेक्षण करून बाधित शेतकर्यांना तीन महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल असे सांगितले.
यानिमित्ताने आ.सतीश चव्हाण यांनी शेतकर्यांना दिलेला शब्द पाळला असून मागील अनेक वर्षांपासून डमडम तलावातील बाधित शेतकर्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला याचे निश्चितच समाधान वाटत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.