तळाच्या मुंबई इंडियन्सने पहिल्या क्रमांकाच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला

तळाच्या मुंबई इंडियन्सने पहिल्या क्रमांकाच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला
तळाच्या मुंबई इंडियन्सने पहिल्या क्रमांकाच्या गुजरात टायटन्सचा पराभव केला

मुंबई इंडियन्सने शेवटीच्या क्षणी सामना फिरवत ५ धावांनी विजय मिळवला आणि गुजरात टायटन्सचा माज उतरवला. ज्या पद्धतीने हार्दिक पंड्या मुलाखत सामना हरल्यावर देतो त्यावरून गावसकर आणि रवी शास्त्री यांनी त्याचे कान टोचले होते. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२मधील ५१व्या सामन्यात आमने- सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यात मुंबई संघाने ५ धावांनी सामना आपल्या खिशात घातला. हा मुंबईचा हंगामातील दुसराच विजय होता. मुंबईच्या विजयाचा हिरो डॅनियल सॅम्स ठरला.

या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, मुंबई इंडियन्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी मुंबईने फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्स गमावत १७७ धावा चोपल्या आणि गुजरातपुढे १७८ धावांचे आव्हान उभे केले होते. जे गुजरात संघाला पार करता आले नाही. त्यांना ५ विकेट्स गमावत फक्त १७२ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईने ५ धावांनी सामना खिशात घातला.

गुजरातकडून फलंदाजी करताना वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल या सलामीवीरांनी शानदार फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले. साहाने ४० चेंडूत २ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. तसेच, गिलने ३६ चेंडूत ५२ धावा चोपल्या. या धावा करताना त्यानेही २ षटकार आणि ६ चौकारांचा पाऊस पाडला. त्यांच्याव्यतिरिक्त फक्त कर्णधार हार्दिक पंड्या यालाच २४ धावा करता आल्या. बाकीच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा पार करता आला नाही.

यावेळी मुंबईकडून गोलंदाजी करताना मुरुगन अश्विनने लक्षवेधी गोलंदाजी केली. त्याने गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूत धाडले. तसेच, कायरन पोलार्डनेही १ विकेट आपल्या नावावर केली. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने चांगली कामगिरी केली. मागील सामन्यांपासून धावांसाठी झगडणाऱ्या किशनची बॅट या सामन्यात तळपली. मात्र, त्याला अर्धशतक करता आले नाही. त्याने २९ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४५ धावा केल्या. त्याच्यासोबतच टीम डेविडने ४४ धावा केल्या त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला. कर्णधार रोहित शर्मा याने ४३ आणि तिलक वर्मा याने २१ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त कुणालाच २० धावांचा आकडा पार करता आला नाही.

Advertisement

यावेळी गुजरातकडून गोलंदाजी करताना राशिद खानने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना फक्त २४ धावा देत २ विकेट्स आपल्या खात्यात जोडल्या. याव्यतिरिक्त अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन आणि प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी १ विकेट आपल्या नावावर केली. या पराभवानंतरही गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वलस्थानी कायम आहे. तसेच, दुसरीकडे मुंबईने विजय मिळवूनही ते गुणतालिकेत तळाशी आहेत.

Advertisement