पुणे3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
सरकारने नोकर भरतीचे खाजगीकरण करून कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरती घेण्याचा निर्णय घेतल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तर्फे आंदोलन करण्यात आले.
याबाबत समितीचे महेश घरबुडे म्हणाले, 6 सप्टेंबर 2023 रोजी राज्य शासनाने परिपत्रक काढून येणाऱ्या काळात सरकारी नोकर भरतीचे खाजगीकरण करून कंत्राटीकरणाच्या माध्यमातून भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी जे अनेक वर्षापासून सरकारी नोकरीच्या आशेने अभ्यास करत आहेत त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. या निर्णयाविरोधात आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे विद्यार्थी आक्रोश आंदोलन केले आहे.
आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा
अनेक विद्यार्थी संघटनांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. या आंदोलनास आम आदमी पार्टी पुणे कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, शासकीय विभागातील अनेक पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचे ठरविले आहे. आधीच महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या नाहीत, त्यात राज्य सरकार असे निर्णय घेऊन परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवत आहे.अंदाजे ७५ हजार सरकारी जागांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होणार आहे. सरकारच्या आणि नियुक्ती करण्यासाठी निवडलेल्या संस्थांच्या जवळच्या लोकांनाच या नोकऱ्या मिळतील मग इतर युवकांनी कुठे जायचे, ते करत असलेल्या जीवापाड मेहानीची जबाबदारी कोण घेणार ? म्हणून शासनाने त्वरित आदेश मागे घेणे गरजेचे आहे असे मत पक्षाचे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी व्यक्त केले आहे.