तरीही.. ‘बांझाय’!योगेंद्र पुराणिक
जपानमध्ये आजही करोनाचे थैमान सुरूच आहे. तरीही जपान सरकारने ठामपणे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जपानी नागरिकांच्या तीव्र विरोधासह अनेक अडीअडचणींचा सामना करत हा क्रीडामहोत्सव संपन्न होत आहे. यासंबंधात जपानमधील सद्य:स्थितीचा ‘ऑंखों देखा’ परामर्श..

Advertisement

जपानला ऑलिम्पिक भरवणं तसं नवं नाही. यापूर्वी तीन वेळा (टोकियो- १९६४, साप्पोरो-१९७२, नागानोया- १९९८ या शहरांमध्ये) ऑलिम्पिक सामने भरवण्याचा अनुभव जपानच्या गाठीशी आहे. २००८ सालीही ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यासंदर्भात जपानने प्रयत्न केला होता, पण तो असफल ठरला.  २०११ साली भूकंप व त्सुनामी यांचा जबदरस्त तडाखा जपानला बसला होता. त्यात न्यूक्लीयर रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली होती. त्यामुळे जपानसमोर खूप अडचणी होत्या. जपानची आर्थिक स्थितीही फारशी चांगली नव्हती. तरीही आपल्याला ऑलिम्पिक सामने भरवण्याची संधी मिळेल आणि जपानची आर्थिक घडी थोडीफार नीट बसवता येईल असे तत्कालीन पंतप्रधानांना वाटत होते. भूकंप व  त्सुनामीच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये काहीतरी ‘सकारात्मक’ घडेल, या भावनेने ते त्यावेळी ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी इच्छुक होते. त्यानंतर २०१६ सालीही जपानने यजमानपदासाठी  खूप प्रयत्न केले, पण तेव्हाही त्यांना यश आले नाही. अखेर तो मान मिळण्यासाठी २०२० साल उजाडावे लागले. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी बाजी मारली. जपानमध्ये चौथ्यांदा ऑलिम्पिक सामने भरणार होते. त्यासाठी जपानने जोरदार तयारीही सुरू केली. आपल्याला यजमानपद मिळाल्याचा आनंद समस्त जपानी लोकांमध्ये भरून राहिला होता. जपानच्या सरकारने ऑलिम्पिकच्या तयारीच्या दिशेने पावलेही उचलली..

परंतु दुर्दैवाने २०२० सालाच्या सुरुवातीलाच करोना व्हायरसने जगभरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आणि नंतर तर त्याने अनेक देशांमध्ये थैमानच घातले. यापासून छोटुकला जपानही सुटला नाही. जपानवासीयांसाठी करोनाच्या संकटाबरोबरच ऑलिम्पिक सामने पुढे  ढकलण्याचे संकट समोर उभे राहिले. त्यामुळे जपानी माणसांच्या आनंदावर विरजण पडले.

Advertisement

अर्थात करोना येण्यापूर्वीही जपानमध्ये ऑलिम्पिक सामने भरवण्याचा मार्ग काही सुकर नव्हताच. सुरुवातीलाच टोकियोत ऑलिम्पिक सामने भरवण्याचे ठरले तेव्हा अनेकांनी ‘या सामन्यांसाठी फक्त टोकियोचीच निवड का? शेजारील अन्य राज्यांमध्येही काही सामने भरवावेत..’ यावरून वादविवाद सुरू केले. सरतेशेवटी टोकियोसोबत शेजारील काही राज्यांमध्येही ऑलिम्पिक सामने भरवण्याचे ठरले. पुढे ऑलिम्पिकसाठी मैदान तयार करण्यावरून मोठी ठिणगी उडाली. सुरुवातीला मध्य आशियातील आर्किटेक्ट झाहा हदीद यांनी मैदान डिझाईन केले होते. त्या मैदानाचा खर्च आवाक्याबाहेर जाऊ लागला. त्याविरोधात आरडाओरडा सुरू झाल्यावर ते काम थांबवण्यात आले. मग हे मैदान साध्या पद्धतीने पुन्हा नव्याने तयार करण्यात आले. तेही खर्चीक होतेच. या कामात जपानला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे विरोधक आणि जनतेकडूनही त्याला तीव्र विरोध झाला. या प्रकरणात जपानी लोकांच्या कार्यपद्धतीवरही खूप टीका झाली.

ही करोनापूर्वकाळातील ऑलिम्पिकची परिस्थिती! आता जपानपुढे मोठं संकट उभं ठाकलं होतं ते करोनाचं. करोनाने संपूर्ण जगाचेच चक्र विस्कळीत करून टाकले. वर्ष उलटलं तरी  करोना आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नसल्याने हे सामने एक वर्ष पुढे ढकलले गेले. आणि सरतेशेवटी येत्या २३ जुलैपासून ऑलिम्पिक सामन्यांना सुरुवात होत आहे. त्यासाठी सुसज्ज असे स्टेडियम तयार आहे. करोनामुळे स्टेडिअमबाहेर जेवण्याखाण्याचे स्टॉल्स नसतील. खेळाडूंसहित आलेल्या प्रत्येक व्यक्तीची एअरपोर्ट ते होस्ट टाऊन आणि होस्ट टाऊन ते टोकियोतील ऑलिम्पिक व्हिलेजपर्यंत येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑलिम्पिकसाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी इथे एक गावच वसवलं गेलं आहे. मोठमोठय़ा इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींमधील घरांची विक्रीही आधीच करून त्यातून पैसा उभारण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार प्रेक्षकांविना सामने भरवले जातील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक जपानमध्ये फिरकणारही नाहीत. खरं तर ऑलिम्पिक व्हिलेजमधील इमारतींतील घरं खरेदीदारांना सुपूर्द करायला हवी होती. आणि करोनामुळे बंद पडलेली मोठमोठी हॉटेल्स ऑलिम्पिकसाठी येणारे खेळाडू व पाहुण्यांसाठी उपलब्ध करून द्यायला हवी होती. जेणेकरून इथलं अर्थचक्र थोडय़ाफार प्रमाणात तरी फिरलं असतं.

Advertisement

एक मात्र आहे.. या ऑलिम्पिकमुळे टोकियो शहराचा चेहरामोहरा पुरता बदलला आहे. रेल्वे स्टेशन अधिक सुंदर झाले आहे. इथे नवीन पदपथ बनवले आहेत. वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं आहे. या काही सकारात्मक गोष्टीही घडल्या आहेत. पण एकूणात ऑलिम्पिक भरविण्याविषयी मात्र सकारात्मक वातावरण दिसत नाही. सामन्यांच्या तिकीट विक्रीबाबतही साशंकता आहे. प्रेक्षकांविनाच सामने भरविले जाणार असल्याने तिकिटाचे पैसे परत देणं भाग आहे. पण आयोजक म्हणताहेत की, जे लोक तिकिटांच्या पैशांसाठी ठराविक काळाच्या आत अर्ज करतील, त्यांनाच पैसे परत केले जातील. असं का, हा प्रश्नच आहे. कारण शंभर डॉलर्सची तिकिटे, हॉटेल, विमान प्रवास वगैरेबरोबर बंडलिंग करून अव्वाच्या सव्वा किमतीने- ब्लॅकने पाचशे डॉलर्सना विकली गेली आहेत. त्यामुळे हे मोठंच नुकसान आहे. करोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे ऑलिम्पिकच्या नियोजित कार्यक्रमांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाणाऱ्या काही स्वयंसेवकांनीही  ऑलिम्पिक ज्योतीमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

आजच्या घडीला जपानमधील करोनाची स्थिती चिंताजनक म्हणावी अशीच आहे. लसीकरण फार धीम्या गतीने सुरू आहे. मुळात लशींचा तुटवडा आहे. आरोग्य सेवेवर आणि एकूणात डॉक्टर, नर्सेस यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. डॉक्टर आणि नर्सेसचा तुटवडा जाणवतो आहे. आणि त्यात ऑलिम्पिक कमिटीने मागणी केली आहे की, ऑलिम्पिकसाठी किमान पाचशे डॉक्टर, नर्सेस उपलब्ध करून द्याव्यात. यावरूनही जपानमध्ये गदारोळ सुरू झालेला आहे. कारण इथे लस देण्याकरताही पुरेशा नर्सेस नाहीत, मग ऑलिम्पिकसाठी वेगळे पाचशे डॉक्टर्स व नर्सेसची सोय कशी करता येईल? कारण जपानमध्ये याबाबत खूप कठोर नियम आहेत. इथे विशिष्ट वैद्यकीय पात्रता असलेल्या नर्सच इंजेक्शन देऊ शकतात.

Advertisement

जापनीज मेडिकल कम्युनिटीने तर ऑलिम्पिक भरविण्यासच विरोध दर्शवला आहे. करोनाच्या भयंकर परिस्थितीत ऑलिम्पिक सामने भरवणे हे शहाणपणाचे ठरणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. आरोग्य सेवेतील मंडळींनीही यास कडाडून विरोध केला आहे. जपानमधील सध्याची करोनास्थिती हाताळणेही शक्य नाही; त्यात आणखी ऑलिम्पिक स्पर्धामुळे करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाल्यास इथल्या आरोग्य सेवेवर बराच ताण येईल आणि ती परिस्थिती हाताळणे कठीण होईल.

इथे दुसरा एक विवादास्पद  मुद्दा म्हणजे- करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांविना सामने भरवले जातील असे म्हणत असतानाच दुसरीकडे रिकाम्या स्टेडिअममध्ये शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत सामने बघायला घेऊन जावे असा फतवा काढला गेला आहे. त्यावरूनही जपानमध्ये गदारोळ माजला आहे. अर्थात ही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातल्या राजकारणाची खेळी आहे हे उघड आहे.

Advertisement

जपानची सध्याची परिस्थिती पाहता जपानमधील जवळजवळ ८० टक्के लोकांनी ऑलिम्पिकला विरोध दर्शवला आहे. जपानमधील करोनाच्या रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. त्यात डेल्टा वेरिएन्ट व्हायब्रंटमुळे परिस्थिती आणखीनच हाताबाहेर जाईल अशी भीती इथल्या तज्ज्ञांना वाटते.

ऑलिम्पिकसाठी खेळाडू, व्हीआयपी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी अर्थात् आयओसीचे सदस्य, पाहुणे असे मिळून सुमारे ९०-९५ हजार लोक जपानमध्ये दाखल होणार  आहेत. त्यांना जपानमध्ये येण्याआधी लसीकरण, करोनाची चाचणी बंधनकारक केलेली नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात गोंधळ निर्माण होणार आहे. ऑलिम्पिकसाठी येणारे अनेक खेळाडू करोना पॉझिटिव्ह आहेत. परंतु त्यांचीही विशेष काळजी घेतली जात आहे अशी स्थिती नाही. ताजं उदाहरण सांगायचं तर ऑलिम्पिकसाठी आलेल्या एका खेळाडूची विमानतळावर करोना चाचणी केली असता तो पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. तेव्हा त्याची स्वतंत्र व्यवस्था न करता त्याला इतर खेळाडूंसोबतच हॉटेलवर नेण्यात आलं आणि नंतर त्याला क्वारन्टाईन करण्यात आलं. या प्रकारामुळे  इथल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात येत आहेत. गेले वर्षभर करोनानं थैमान घातलं आहे. अशावेळी जपानमध्ये येणाऱ्या प्रत्येकास लसीकरण बंधनकारक करायला हवे होते. परंतु आयोजक आणि जपान सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. दुसरीकडे सरकार म्हणतंय की, जपानमध्ये दाखल झाल्यावर या लोकांचे लसीकरण करू. पण जिथे जपानमधील लोकांसाठीच लस उपलब्ध होत नाहीए, तिथे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लसीकरणाचा भार सोसणं शक्य आहे का, हा मोठाच प्रश्न आहे. जपानमध्ये फायझर, मॉडर्ना या दोनच लशी उपलब्ध आहेत. जपानची स्वत:ची करोना लस अजून तयार झालेली नाही. जपानने करोनावरील लशीसाठी स्वत: कोणतेही प्रयत्न केले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ऑलिम्पिक झाल्यावर जपानमधील करोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. आणि ते जपानला खूप महागात पडेल यात शंका नाही.

Advertisement

या परिस्थितीतही जपानमधील सत्ताधीश ऑलिम्पिक सामने हट्टाने भरवीत आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे जपानवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात् आयओसी आणि प्रायोजक यांचा असलेला मोठा दबाव. यातला मोठा विरोधाभास असा की, जपानमध्ये एकीकडे कडक लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि दुसरीकडे ऑलिम्पिक सामने भरवण्याची जय्यत तयारीही सुरू आहे. गमतीचा भाग म्हणजे इथली अर्धीअधिक प्रसारमाध्यमं- विशेषत: टीव्ही मीडिया ऑलिम्पिकचे प्रायोजक असल्याने त्याविषयी नकारात्मक बातम्या फारशा प्रसारित केल्या जात नाहीत. काही थोडकीच छापील प्रसार माध्यमं किंवा विरोधक ऑलिम्पिकविरोधात त्वेषाने भूमिका मांडत आहेत. इथे सध्या प्रसार माध्यमांमध्ये दोन मुद्दे चर्चेत आहेत. एक- ऑलिम्पिक सामने प्रेक्षकांविना भरवले तर किती नुकसान होईल? आणि दुसरा- ऑलिम्पिक रद्द केले तर जपानचे किती नुकसान होईल? अर्थात हे नुकसान आर्थिक आणि जीवितहानी या दृष्टीनेही!  यातला दुसरा पर्याय जपानच्या दृष्टीने फायद्याचा आहे; परंतु या घडीस ते शक्य नाही, हेही तितकेच खरे. जपानच्या पंतप्रधानांना असं वाटतंय की, जपान ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात अयशस्वी ठरला असं पुढे इतिहासात नमूद होऊ नये. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने हे ऑलिम्पिक यशस्वी होणं गरजेचं आहे. अर्थात ही धारणा असलेले अनेक जपानी लोकही आहेत हे नाकारता येत नाही. अर्थात यामागे आर्थिक गणितंही दडलेली आहेत. सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधीयांचे या ऑलिम्पिकशी आर्थिक लागेबांधे आहेत, हेही नाकारता येणार नाही. या सर्वाचं नुकसान करून ऑलिम्पिक सामने रद्द होण्याची शक्यता नाही, अशी चर्चाही सुरू आहे. विरोधकांचे असे आर्थिक लागेबांधे नसल्याने ते ऑलिम्पिकला विरोध करीत आहेत. हे साधं-सोपं गणित आहे.

इथे परवा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रमुख ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, त्या हॉटेलसमोर लोकांनी मोठय़ा संख्येने निदर्शने केली. जपानची आर्थिक स्थिती नाजूक असताना इतक्या बडेजावाची काय गरज, अशी टीका निदर्शने करणारे लोक करत होते. खरं तर करोनामुळे सगळ्यांचीच आर्थिक दुरवस्था झाली आहे. अशावेळी ऑलिम्पिकच्या निमित्ताने थोडय़ा र्निबधासहित इथली हॉटेल्स बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खुली करायला हवी होती; जेणेकरून हॉटेल व्यावसायिक व अन्य व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान थोडेफार तरी भरून निघाले असते असाही एक मतप्रवाह आहे.

Advertisement

जपानमध्ये एकीकडे ऑलिम्पिक खेळांचा उत्सव साजरा होतोय आणि दुसरीकडे करोनामुळे कडक लॉकडाऊन. एकीकडे करोनाचे मळभ, तर दुसरीकडे ऑलिम्पिकसारख्या क्रीडामहोत्सवाला मुकण्याचे दु:ख. यामुळे जपानी लोकांची मन:स्थिती ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ अशी झाली आहे.

..पण जपानी लोकांची एक खासियत आहे. ते एखादे काम हळूहळू पुढे रेटत नेतात आणि तडीस नेतात. ते काम पूर्ण झाल्यावर दोन्ही हात वर करून ‘बांझाय’ असं म्हणतात. विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी किंवा एखादे काम सगळ्यांनी मिळून यशस्वीपणे पार पाडले की हा विजयदर्शक शब्द  ते उच्चारतात. तसंच हे ऑलिम्पिकही अनेक अडचणींमधून यशस्वीपणे पार पडेल आणि इथले लोक दोन्ही हात वर करून म्हणतील.. ‘बांझाय’!

Advertisement

[email protected]

(लेखक २० वर्षे जपानमध्ये स्थायिक असून, मूळ भारतीय असलेले जपानमधले ते पहिले नगरसेवक आहेत.)

Advertisement

The post तरीही.. ‘बांझाय’! appeared first on Loksatta.Source link

Advertisement