तंत्रज्ञान : संगणक-लॅपटॉप समज-गैरसमज


काही समज-गैरसमज आणि त्यातील वास्तवाविषयी…

Advertisement

स्वप्निल जोशी – response.lokprabha@expressindia.com
संगणक किंवा लॅपटॉप बाबत अनेक समज-गैरसमज दिसतात. ठरावीक प्रोसेसर चांगला, प्रत्येक डिव्हाइस सेफली रिमूव्ह केलंच पाहिजे, इंटरनेट ब्राउजिंगमुळे व्हायरस येतो हे आणि असे अनेक गैरसमज नेहमी ऐकिवात असतात. असेच काही समज-गैरसमज आणि त्यातील वास्तवाविषयी…

आय-५ चांगलं आय-३ वाईट

Advertisement

आजच्या घडीला घरगुती वापरासाठी, कार्यालयात किंवा ब्लॉगिंगसाठी सगळीकडे आय-३ प्रोसेसरचा वापर केला जातो, यातील सिक्स्थ जनरेशन किंवा त्यावरील जनरेशनचे प्रोसेसर चांगले आहेत. मात्र आय-३ वाईट तो हँग होतो, या अफवा आहेत. असे असते तर संगणकनिर्मिती करणाऱ्यांनी या प्रोसेसरचा वापर आपल्या उत्पादनात केला नसता आणि ग्राहकांनी हा प्रोसेसर असलेली उत्पादनं खरेदी केली नसती. कोणताही संगणक हँग होतो तेव्हा त्याचा वापर योग्यप्रकारे केला जात आहे का, हे पाहणं गरजेचं ठरतं. तुम्ही योग्य प्रकारे क्लिनअप्स करत असाल आणि नीट वापर करत असाल, तर संगणक हँग होत नाही. पण त्याचा अयोग्य प्रकारे आणि क्षमतेपेक्षा जास्त वापर केला, तर आय-५ प्रोसेसरवरसुद्धा ताण येऊन संगणक हँग होण्याची शक्यता असतेच.

सामान्यपणे आय-५ प्रोसेसरचा वापर हेवी ग्राफिक्स, कॅड आणि तत्सम मोठय़ा सॉफ्टवेअर्ससाठी करतात. तरीही आज अनेकांना आय-५ घ्यावासा वाटतो. मात्र सामान्य वापरासाठी त्याची अजिबात गरज नाही. शिवाय प्रोसेसरबरोबर रॅम आणि ग्राफिक्स युनिटसुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरते. इंटेलच्या आय सीरिजचे तिन्ही प्रकार एकत्र उपलब्ध असून तिन्ही सीरिज उत्तमच आहेत. त्यामुळे पैसे असतील तरी ते खर्च करताना तुमचा वापर किती आहे, याचा अंदाज घेऊनच खरेदी करा. महाग लॅपटॉप चांगला असतो, हा गैरसमज आहे.

Advertisement

डिस्क पार्टिशन आणि डिस्क फॉरमॅटिंग 

बहुतांश विण्डोज संगणक किंवा लॅपटॉपमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विण्डोज ‘सी’ ड्राइव्हवर असतं. परंतु आपण आपल्या ड्राइव्हला ‘ए’पासून ‘झेड’पर्यंत कोणत्याही अक्षराचं नाव देऊ शकतो. पूर्वी फ्लॉपीच्या काळात ‘ए’ आणि ‘बी’ ड्राइव्ह या फ्लॉपीसाठी राखीव असत. आता फ्लॉपी जवळपास कालबाह्य़ झाल्या असल्या तरी मायक्रोसॉफ्ट विण्डोज जर नव्याने कोणत्याही संगणकात इन्स्टॉल करत असू किंवा नवीन संगणक घेतला असेल तर त्यात पहिल्या ड्राइव्हला ‘सी’ हेच नाव दिलेलं असतं. दुसरा मुद्दा म्हणजे आपण उपलब्ध जागेत कितीही पार्टिशन्स बनवू शकतो. साधारणपणे गरजेनुसार एक सिस्टीम पार्टिशन आणि दोन लॉजिकल पार्टिशन केल्यास डेटा ठेवणे सोयीस्कर ठरते (पार्टिशनचा आकार आपल्या सोयीनुसार असावा. त्याने संगणकाच्या कार्यक्षमतेवर काहीही परिणाम होत नाही. परंतु जर तुम्ही खूप सॉफ्टवेअर वापरात असाल, तर सिस्टीम पार्टिशन थोडे जास्त आकाराचे ठेवा. तसेच सिस्टीम पार्टिशनवर फक्त सॉफ्टवेअर ठेवून बाकी सॉफ्टवेअर सेटिंग्स फाइल आणि माहिती दुसऱ्या ड्राइव्हवरच साठवण्याचे सेटिंग करून ठेवा. सॉफ्टवेअर पुन्हा इन्स्टॉल करण्याची वेळ आल्यास आपले सेटिंग्स पूर्ववत तसेच मिळतात. बेसिक सॉफ्टवेअर आणि इतर चित्रपट, संगीत, गेम्स किंवा माहिती स्टोअर करत असल्यास सिस्टीम पार्टिशन कमी आकाराचे ठेवावे.

Advertisement

काही बिघाड झाल्यास किंवा मालवेअर वगैरे आले आणि ते काढणे शक्य नसल्यास ‘सिस्टीम फॉरमॅट’ करण्याचा सल्ला बरेचदा दिला जातो. फॉरमॅटिंगमुळे हार्ड डिस्क खराब होते, असाही समज असतो. फॉरमॅटिंगमध्ये डिस्कवर उपलब्ध असलेला डेटा लॉजिकली डीलीट होतो जर सिस्टीम पार्टिशन म्हणजे विण्डोज फॉरमॅट केल्यास नवीन प्रणालीसह संगणक किंवा लॅपटॉप थोडय़ाफार प्रमाणात चांगलं काम करू शकतो. दुसरी गंमत म्हणजे फॉरमॅट केल्यावरही डेटा हार्ड डिस्कवरच असतो. फक्त त्याचे त्या ड्राइव्हमधल्या फोल्डरशी किंवा एखाद्या सेक्टरशी असलेले नाते आपण तोडून टाकतो. जोपर्यंत त्या सेक्टरवर दुसरा डेटा येत नाही तोपर्यंत आधीचा डेटा काहीशा अदृश्य स्वरूपात जिथल्या तिथे असतो. फॉरमॅटिंगमध्ये आपण त्यातील संबंध तोडून टाकल्यामुळे आपल्याला तो पाहता किंवा वापरता येत नाही इतकेच.

अ‍ॅण्टी मालवेअर किंवा अ‍ॅण्टी व्हायरस

Advertisement

मालवेअर या प्रकारची भीती आजकाल प्रत्येकाला असते. कोणता अ‍ॅण्टी व्हायरस घ्यावा याबद्दल सर्व जण चर्चा करत असतात. अलीकडे अनेक कंपन्या लॅपटॉपबरोबर अ‍ॅण्टी व्हायरसही अधिक पैसे आकारून देतात. अ‍ॅण्टी मालवेअर किंवा अ‍ॅण्टी व्हायरस घेण्यापूर्वी आपण किती जागरूक वापरकर्ते आहोत हे महत्त्वाचे आहे. योग्य हाताळणी असल्यास अ‍ॅण्टी व्हायरस प्रोग्रॅम्सची गरज नसते, निदान घरगुती संगणकासाठी तरी अजिबातच नसते. सध्या मायक्रोसॉफ्ट विण्डोजचे बिल्ट इन डिफेण्डर सॉफ्टवेअर पुरेसे आहे. अगदीच बेफिकीर राहू इच्छित असाल तर अ‍ॅण्टी व्हायरस प्रोग्रॅम आर्थिक गणितांनुसार घ्यावा. त्यात प्रामुख्याने, इंटरनेट सुरक्षा पुरवणारे उत्पादन पाहावे. व्हायरस किंवा मालवेअर येणारच नाही, अशी खात्री देता येणे शक्य नाहीच पण तरीही काही प्रमाणात समाधान! तसेच व्हायरस फक्त विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीमवर येतात या समजालाही कोणताच तांत्रिक आधार नाही. इतर प्रणालींवरसुद्धा व्हायरस किंवा मालवेअर हल्ले झाले आहेत आणि होत असतात.

रिफ्रेश

Advertisement

आपल्यापैकी बहुतांश जणांचं एक सर्वोत्तम रिपेरिंग टूल म्हणजे एफ-५ अर्थात रिफ्रेश बटन. विण्डोज-११ मध्ये कॉन्टेक्स्ट मेनूमधून रिफ्रेश बटन सुरुवातीला दिसत नसल्यामुळे त्यावर इंटरनेटवर अनेक विनोद आणि मिम्स तयार केले गेले. लॅपटॉप हँग झालाय, रिफ्रेश करून बघ. स्लो झालाय रिफ्रेश करून बघ. काही जण तर संगणक चालू केल्याक्षणी ३-४ वेळा रिफ्रेश करतात. त्यामुळे ना हँग झालेला संगणक ठीक होतो, ना त्याचा वेग वाढतो. रिफ्रेश बटण हे फक्त री-ड्रॉचे काम करते. म्हणजे डेस्कटॉपवर एखादी फाइल आयकॉन स्वरूपात पेस्ट केली किंवा क्रिएट केली आणि ती त्याक्षणी दिसली नाही, तर रिफ्रेश केल्यास. असलेले सर्व आयकॉन क्लिअर होऊन डेस्कटॉप पुन्हा सादर केला जातो. वेब ब्राऊजरसुद्धा अशाच प्रकारे काम करतो. याला रिपेन्ट किंवा री-ड्रॉ म्हणतात. पण रिफ्रेश केल्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो, वेग वाढतो किंवा रॅम क्लिअर होते याला तांत्रिक आधार नाही.

सेफली रिमूव्ह हार्डवेअर

Advertisement

पेन ड्राइव्ह किंवा इतर कोणताही यूएसबी डिव्हाइस लावल्यावर तो खेचून काढून घ्यावा की सेफली रिमूव्ह करावा, याविषयी असंख्य समज-गैरसमज आहेत. डिव्हाइस खेचून काढल्यास डिव्हाइसला नुकसान होण्याची शक्यता खूपच धूसर असते. परंतु तुम्ही जर काही मोठय़ा आकाराची फाइल किंवा डेटा ट्रान्स्फर करत असाल तर बऱ्याच वेळा तुम्हाला कॉपी किंवा पेस्ट झालेला दिसूनसुद्धा प्रत्यक्षात प्रोसेस तशाच असतात. असे झाल्यास माहिती करप्ट होऊ शकते. त्यासाठी सेफली रिमूव्हचा पर्याय फायदेशीर आणि सुरक्षित ठरतो. पेन ड्राइव्हमध्ये बरेचदा लॉस्ट डीआयआर, सिस्टीम व्हॉल्यूम इन्फॉर्मेशन अशा नावांची फोल्डर्स असतात. त्यांना व्हायरस समजले जाते. पण ते पेन ड्राइव्ह किंवा डिव्हाइसचे एक प्रकारचे पारपत्रक आहे असे समजावे. हे फोल्डर्स डीलीट करू शकता त्याने अपाय होत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement