इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२ च्या हंगामातील १५ वा सामना मुंबईत डी वाय पाटील स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला जात आहे. लखनऊ सुपर जायंट्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं. डी कॉकची ८० खेळी लखनऊ सुपर जायंट्स विजयापर्यंत पोहचवून गेली. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सकडून पृथ्वी ३४ चेंडूत ६१ धावांची दमदार अर्धशतकीय कामगिरी करून बाद झाला. वॉर्नरला मात्र १२ चेंडूत केवळ ४ धावाच करता आल्या. यानंतर ११ व्या षटकात दिल्लीला तिसरा झटका लागला. रवि बिश्नोईने रोवमॅन पॉवेलला बोल्ड आऊट केलं. पॉवेलने १० चेंडूत केवळ ३ धावा केल्या. पॉवेलनंतर सरफराज खान मैदानात उतरला. यानंतर पंत आणि सरफराज अखेरपर्यंत खेळले. पंतने ३६ चेंडूत ३९ धावा केल्या, तर सरफराजने २८ चेंडूत ३६ धावा केल्या. दोघेही नाबाद राहिले. यासह दिल्लीने २० षटकात ३ विकेट गमावून १४९ धावा करत लखनऊला १५० धावांचं लक्ष्य दिलं.
लखनऊ सुपर जायंट्सची खेळी
लखनऊचा संघ १५० धावांच्या लक्षाचा पाठलाग करत मैदानात उतरला. सुरुवातीला लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने २५ चेंडूत २४ धावांची, तर क्विंटन डी कॉकने ५२ चेंडूत ८० धावांची खेळी केली. यानंतर एविन लुईस १३ चेंडूत केवळ ५ धावा काढून बाद झाला. दीपक हुड्डाला देखील १३ चेंडूत ११ धावाच करता आल्या. अखेरीस कृणाल पांड्या आणि आयुष बदोनीने सामना लखनऊच्या खिशात टाकला. पांड्याने १४ चेंडूत नाबाद १९ धावा, तर बदोनीने ३ चेंडूत नाबाद १० धावा केल्या.
लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आतापर्यंत चार पैकी ३ सामने जिंकत दमदार प्रदर्शन केलंय. दुसरीकडे दिल्लीने आतापर्यंत ३ सामने खेळले असून त्यात दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे.
के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, दीपक हूडा, आयुष बदोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, अँड्रू टाय, रवि बिश्नोई, आवेश खान
ऋषभ पंत (कर्णधार), पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, सरफराज खान, रॉवमॅन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मुस्ताफिजुर रहमान, एनरिक नॉर्टजे