नागपूर22 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिंदे गटाचे १३ खासदार निवडून येणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केल्याने खळबळ उडली. मात्र, राऊत यांचा हा दावा शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी फेटाळून लावला. आमच्या गटाचे सर्वच्या सर्व १३ खासदार विजयी होतील, असा दावा करतानाच ठाकरे गटाचे उरलेले खासदारही शिंदे गटात येणार आहेत. या खासदारांसोबत आमची बैठक झाल्याचा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात असून तुमाने यांच्या या विधानाने खळबळ उडाली आहे.
तुमाणेंचा दावा
खासदार कृपाल तुमाने यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. ठाकरे गटाकडे असलेले खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काल मुंबईत ठाकरे गटाच्या त्या खासदारांसोबत आमची बैठक झाली, ते शिंदे गटात यायला तयार आहेत. लवकरच त्यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश केला जाणार असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला आहे.
आमदारही फुटणार!
ठाकरे गटाचे काही आमदारंही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. काल शिवससेनेची बैठक झाली. त्यानंतर खासदार कृपाल तुमाने यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना खासदारांची बैठक झाली. त्या बैठकीत निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही १३ खासदार ज्या मतदारसंघातून निवडून आलो, तेच मतदारसंघ आम्ही लढवणार आहोत.
दलालांकडून पक्षाचा सत्यनाश
उर्वरीत लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असे त्यांनी सांगितले. तसेच संजय राऊत इतर पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला. तरी उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला.