मुंबई41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा आक्षेपार्ह मार्फ केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणाच्या तपासासाठी ‘एसआयटी’ची स्थापना केल्याची घोषणा सोमवारी मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.
शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा राज्य समन्वयक विनायक डावरे याने हा व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केला असून, इतर आरोपींनी जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केल्याचे समोर आल्याचे देसाई यांनी सांगितले. त्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणीत भर पडली आहे.
विधानसभेत केले निवेदन
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उपनेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार भारती लव्हेकर, यामिनी जाधव, मनीषा चौधरी यांनी याबद्दल प्रश्न विचारले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही जोरदार हरकत घेतली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजचे कामकाज संपण्यापूर्वी सरकारने निवदेन सादर करावे, असे आदेश दिले. त्यानुसार मंत्री शंभूराज देसाई यांनी निवेदन साजर करून या प्रकरणाचा घटनाक्रम विधानसभेत मांडला.
मिठी नदीवरील कार्यक्रम
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दिनांक ११ मार्च २०२३ रोजी दहीसर हद्दीत श्रीकृष्णनगर येथे मिठी नदीवरील पुलाच्या उदघाटनाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाल शेट्टी, प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश सुर्वे तसेच शिवसेनेच्या उपनेत्या शीतल म्हात्रे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमानंतर श्रीकृष्णनगर जंक्शन येथून अशोकवन जंक्शनपर्यंत बाइक रॅली काढण्यात आली होती.
व्हिडिओत एडिटिंग, मार्फिंग
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, अशोकवन जंक्शन येथे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयासमोर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात बाइक रॅलीमध्ये शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सु्र्वे यांच्यात संवाद चित्रिकरणाच्या वस्तुस्थितीमध्ये एडिटिंग व मॉर्फिंग करून प्रकाश सुर्वे व शीतल म्हात्रे यांच्या व्हिडिओत आरोपीने अशोभनीय बदल करून फेसबुकच्या माध्यमातून अपलोड व व्हायरल केला. याबाबत शीतल म्हात्रे यांनी दहीसर पोलिस ठाण्यात १२ मार्च २०२३ रोजी पहाटे तीन वाजता दाखल केली. त्याअनुषंगाने दहीसर पोलिस ठाण्यात आयपीसी कलम ३५४ अ, ५०९, ५३४ भादवीसह ६७ अ, ६७ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मराठे तपास करत आहेत.
चार जणांना अटक
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, याप्रकरणी चार आरोपी आहेत. अशोक राजदेव मिश्रा (वय ४५), मानस अनंत कुँवर (वय ३०), विनायक भगवान डावरे (वय २६) आणि रवींद्र बबन चौधरी (वय ३४) यांना अटक केली असून, त्यांना पंधरा मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. तसेच राज प्रकाश सुर्वे यांच्या तक्रारीवरून १२ मार्च रोजी चार वाजता २६३/२३ गुन्हा नोंदवलेला आहे. आयपीसी ५३४ व आयटी अॅक्ट ६७ अ व ६७ हे कलम लावण्यात आले आहे. सोशल मीडिया अकाउंटद्वारे वरील प्रमाणे घृणास्पद व्हिडिओ व्हायरल करून स्त्री मनास लज्जा उत्पन्नन होईल असे कृत्य करून त्याद्वारे संबंधितांची बधनामी केल्याचे दिसून येते.
मोबाइल, सिमकार्ड जप्त
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, चार मोबाइल हँडसेट, पाच मायक्रोसिम कार्ड जप्त केले आहेत. चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान यातील आरोपींनी ४६५, ४६९, ४७१ भादवी हे कलम लावण्यात आले आहे. तपासात सद्यस्थितीत असे दिसून येते की, विनायक डावरे हा ठाकरे गटाच्या सोशल मीडियाचा स्टेट कॉर्डिनेटर असून त्याने संबंधित व्हिडिओ मातोश्री या फेसबुक पेजवर अपलोड केला व इतर आरोपींनी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ जाणीवपूर्व काही व्हॉटस्अॅप ग्रुपवर व्हायरल करून फेसबुक पेजवर शेअर केला आहे.
आयपीएस अधिकाऱ्यांकडून तपास
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, सदरचे कृत्य गंभीर असून याबाबत सायबर सेल व इतर अधिकारी यांच्या सहा टीम तपासकामी बनवण्यात आल्या आहेत. या गुन्हाचा तपास मुळापर्यंत जाऊन सूत्रधार शोधणे, हा प्रकार इतरांबाबत घडू नये, त्यावर पूर्ण प्रमाणावर आळा बसावा या दृष्टीने सखोल तपास करण्यात येत आहे. तसेच या गुन्ह्याबाबत सीनियर आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून पुढील गुन्ह्याचा तपास केला जाईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
संबंधित वृत्तः